या श्रमिकांनो, परत फिरा रेऽऽऽ...

    दिनांक  02-Jul-2020 21:07:52
|


work_1  H x W:


देशभरात सध्या ‘अनलॉक’ची प्रकिया सुरु असून, कित्येक कंपन्या गावी परतलेल्या कामगारवर्गाला पुन्हा शहरात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तेव्हा, यासाठी नेमकी विविध कंपन्यांनी कशाप्रकारे व्यवस्थापकीय धोरणांचा अवलंब केला, त्याची माहिती देणारा हा लेख...


‘कोविड-१९’मुळे देशांतर्गत विविध प्रांतातील कामगारांनी आपल्या गावचा रस्ता धरला. सुरुवातीला ‘लॉकडाऊन’मुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीला आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, कौटुंबिक व प्रसंगी भावनिक समस्या म्हणून पाहिले गेले. पण, ‘गड्या अपुला गावच बरा’ असे म्हणत मिळेल त्या मार्गाने, प्रसंगी पडेल ती किंमत देऊन, या मजुरांनी हजारो किमीचा प्रवास करत आपले गाव गाठले. पण, सध्या या कामगारांनी पुन्हा गावाहून विविध महानगरांमध्ये परतावे, यासाठी मोठ्या प्रमाणात व विविध प्रकारे प्रयत्न सुरु आहेत. गावी गेलेल्या या कामगारांनी ‘लॉकडाऊन’च्या तीन महिन्यांनंतर आता तरी आपापल्या कामावर परत यावे, यासाठी कंपन्यांनी विविध स्तरांवर प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने संबंधित कामगारांशी संपर्क करणे, कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन परिस्थिती समजावून सांगणे, गावातील सरपंचांशी संवाद साधून त्यांना नंतरच्या काळात कामाच्या ठिकाणी झालेली सुधारणा समजावून सांगणे, गावाकडून परत येऊ इच्छिणार्‍या कामगारांसाठी वाहनव्यवस्था करणे, त्यांचे उपचार, निवासाची सोय करण्याची तयारी करणे इत्यादीचा या प्रक्रियेत समावेश केलेला दिसून येतो.


मुंबईतील एका औषध उत्पादन कंपनीने आपल्या कामगारांना परत आणण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था केली. त्यांना कामगारांकडून अपेक्षेनुरूप प्रतिसादही मिळाला. त्यामुळे या औषधी कंपनीचे वापी (गुजरात), इंदोर (मध्य प्रदेश) व बद्दी (हिमाचल प्रदेश) येथील औषधांचे कारखाने कोरोना काळातही अपेक्षेनुसार सुरू राहिले. मुख्य म्हणजे, कंपनीच्या या पुढाकार-उपक्रमामुळे ‘लॉकडाऊन’मध्ये परिस्थिती व गरजेनुरूप शासनाद्वारे शिथीलता दिली. त्यामुळे या कंपनीतील गावी गेलेल्या कामगारांनाही कामावर रुजू होण्याची स्वयंप्रेरणा मिळाली. परिणामी, इतरांच्या तुलनेत कमी वेळात या कंपनीला उत्पादन पूर्ववत क्षमतेने सुरू करता आले. ‘आरपीजी’ उद्योग समूहांतर्गत असणार्‍या ‘केईसी इंटरनॅशनल’ कंपनीच्या विविध ठिकाणी काम करणार्‍या कामगारांपैकी निम्मे कामगार गावाकडे रवाना झाले. त्यामुळे कंपनीपुढे मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली. मात्र, ‘केईसी इंटरनॅशनल’च्या व्यवस्थापनाने आपली हिंमत कायम राखली आणि कामगारांना शहरात आणण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न सुरू केले.


‘केईसी इंटरनॅशनल’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी विमल केजरीवाल यांच्या पुढाकाराने कंपनीत काम करणार्‍या सुपरवायझर्सने आपापल्या विभागातील गावी गेलेल्या मजुरांशी संपर्क साधला. या संपर्काला गावच्या सरपंचासह संवादाची जोड दिली. याद्वारे कामगारांना त्यांच्या सुरक्षेची खातरजमा करून देण्यात आली. सुपरवायझर-सरपंच यांच्या संयुक्त-संवाद उपक्रमाला अपेक्षित यशही मिळाले. परिणामी, ‘लॉकडाऊन’ काळातच ‘केईसी इंटरनॅशनल’मधील गावी गेलेल्या कामगारांपैकी दोनतृतीयांश कामगार कामावर परतले. त्यामुळे कंपनीच्या मुख्य व महत्त्वाच्या कामकाजात फारसा खंड पडला नाही. कंपनी व्यवस्थापनाच्या मते, या तातडीच्या उपाययोजनेसाठी कंपनीकडे कामगारांचे उपलब्ध असणारे संपर्क क्रमांक, मुलाखतीच्यावेळी दिलेली प्रतिष्ठितांची संदर्भ नावे, त्यांच्या कुटुंबातील कर्ते वा वडिलधार्‍या व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी माहितीचा फार उपयोग झाला. ‘जेएसडब्ल्यू’ सिमेंट कंपनीनेही त्यांच्या उद्योगाचे औद्योगिक स्वरुप लक्षात घेता, शासनाची विशेष परवानगी घेऊन आपल्या कामगारांना परत आणण्यासाठी वाहनव्यवस्था केली. पण, त्यात त्यांना अपेक्षित यश आले नाही. पण, आता या प्रयत्नांना पूरक प्रयत्न म्हणून सिमेंट कारखाना परिसरातील ग्रामीण व गरजू युवकांना प्रशिक्षित करण्याचे काम कंपनीने तातडीने हाती घेतले आहे. विशेष म्हणजे, कंपनी व्यवस्थापन आपल्या या नव्या उपक्रमाबद्दल अर्थातच आशावादी आहे.


‘कोरोना-लॉकडाऊन’ काळात खाद्यान्न पदार्थ ही फार गरजेची व अत्यावश्यक अशी सेवा होती. या संदर्भात आपली व्यावसायिक जबाबदारी वेळेवर व सक्षमपणे पार पाडण्यासाठी व जनसामान्यांची धान्यपूर्तता करण्यासाठी आवश्यक असे प्रयत्न ‘आयटीसी’ कंपनीनेही केले. याकामी ‘आयटीसी’ला दुहेरी स्तरावर व दुहेरी स्वरुपात प्रयत्न करावे लागले. एकीकडे त्यांना ‘आयटीसी’च्या खाद्य उत्पादनांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा शेतकर्‍यांना-गावकर्‍यांना, तर दुसरीकडे या उत्पादनांच्या ग्राहकांना अल्पावधीत व प्रभावीपणे विश्वासात घेऊन समजावून सांगायचे होते. यासाठी ‘आयटीसी’ने केवळ जाहिरातींवरच भर न देता, दृक्श्राव्य माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर व चपखलपणे उपयोग केला. आपल्या या माहितीपर उपक्रमांतर्गत ‘आयटीसी’ने विविध प्रकारच्या माहितीपटांद्वारे शेतकर्‍यांना त्यांनी पिकविलेल्या अन्नधान्याची आज देशांतर्गत संपूर्ण समाजाला कशी गरज आहे, हे नव्याने समजावून सांगितले. गाव व छोट्या शहरांपासून सुदूर अंतरापर्यंत धान्यवाहतूक तातडीने व वेळेवर का आणि कशी करावी, ही बाब वाहतूकदारांच्या गळी उतरवली. त्यांची मदत सुनिश्चित करण्यात आली. याशिवाय कोरोनापश्चातच्या काळात विशेषतः शहरी व महानगरीय ग्राहकांमध्ये विशेषतः खाद्यपदार्थांशी निगडीत प्रक्रिया पदार्थांची स्वच्छता व निर्गुंतवणुकीबद्दल साधार भीती होती. त्याचा थेट परिणाम ‘आयटीसी’च्या खाद्यपदार्थ विक्रीवर होणार असल्याने ‘आयटीसी’ कंपनीने आपल्या विशेष प्रबोधनपर चित्रफितींद्वारा मोठ्या संख्येत ग्राहक व जनजागृती केली. त्याचा मोठा व निश्चित असा व्यावसायिक फायदा कंपनीला ‘लॉकडाऊन’च्या आव्हानात्मक व कठीण काळात झाला.


‘डाबर इंडिया’ने कामगारांच्या परगावी जाण्याच्या समस्येवर अगदी स्थानिक स्वरुपातील उपाययोजनेसह मात केली. ‘डाबर’ने कामगारांची कमतरता जाणवल्याने कारखाना परिसरातील ग्रामीण युवकांना विशेषतः विद्यार्थ्यांना कामामध्ये प्राधान्य दिले. त्यामुळे कंपनीला कमी वेळात आवश्यक तेवढे कामगार तुलनेने सहजपणे मिळाले. कंपनीला बाहेरगावी गेलेल्या कामगारांना परत आणण्यासाठी वेळ, वाहन, प्रयत्न यावर खर्च करावा लागला नाही. मुख्य म्हणजे, ‘डाबर’च्या उत्पादन-विक्रीमध्ये खंड पडला नाही. याशिवाय ‘लॉकडाऊन’नंतरच्या काळात एक कल्पक व परिणामकारक प्रयत्न म्हणून ‘जिलेट’ या ब्लेड कंपनीतर्फे घेतलेल्या आगळ्यावेगळ्या पुढाकाराचा उल्लेख इथे करावाच लागेल. कोरोना व ‘लॉकडाऊन’मुळे देशभरातील सलून-केशकर्तनालये तीन महिने बंद होती. यादरम्यान अनेकांचे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. सलूनमधील कामगार गावी जाण्याने या संकटात अधिकच भर पडली. अशा संकटसमयी देशातील केशकर्तनालय चालकांच्या मदतीला ‘जिलेट’ने कल्पकपणे साथ दिली. कोरोनानंतर केशकर्तनालयांसाठी ‘जिलेट’ने तेथील कर्मचार्‍यांसाठी फेस शिल्ड, ग्राहकांसाठी मास्क, निर्जंतुकीकरणाचे साहित्य व एवढेच नव्हे, तर केशकर्तनालयातील कामगारांसाठी ‘जिलेट’ने आपल्याकडून एक लाख रुपयांचा कोरोना विमा उतरविण्याचे प्रशंसनीय व अनुकरणीय काम केले आहे. त्यामुळे ‘कोविड-१९’ वा कोरोनाच्या निमित्ताने कंपनी-कामगार या उभयतांच्या संदर्भातील विविध पैलू अनेकार्थांनी व्यावसायिक शिकवण देणारे ठरले आहेत.
(लेखक एचआर व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
 

- दत्तात्रय आंबुलकर

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.