‘इमिटेशन ज्वेलरी’ क्षेत्राला भेडसावणारी आव्हाने आणि अपेक्षा

    दिनांक  02-Jul-2020 22:49:04
|

 


jwellery_1  H x
 

 

 

‘कोविड-१९’च्या विश्वव्यापी साथीनंतर संपूर्ण जगाची रचनाच बदलते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेपश्चात प्रत्येक औद्योगिक क्षेत्र जास्तीत जास्त ‘आत्मनिर्भर’ होण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी ‘इमिटेशन ज्वेलरी’ क्षेत्राला भेडसावणार्‍या समस्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारांनी तातडीने लक्ष घालून या क्षेत्राला दिलासा देणे गरजेचे आहे.

 


 


‘इमिटेशन ज्वेलरी’ला फार मोठी परंपरा आणि इतिहास आहे. अ‍ॅडम आणि ईव्ह, जेथून मानववंशशास्त्र सुरू झाले असे मानतात, त्यांच्या गळ्यात, डोक्यातसुद्धा फुले आणि काटे यांच्यापासून बनवलेले अलंकार आढळतात. अर्वाचीन इतिहासातील कुठल्याही संस्कृतीचा, जसे दक्षिण अमेरिकेतील लयाला गेलेली पगान संस्कृती असो किंवा मेसोपोटेमिया ही तिग्रीस नदीच्या किनार्‍यावर उदयास आलेली संस्कृती असो किंवा ऐन गाझा ही जॉर्डन येथील प्राचीन संस्कृती असो किंवा नाईल नदीच्या किनार्‍यावर उदयाला आलेली इजिप्शियन संस्कृती असो, कुठल्याही संस्कृतीमध्ये त्यावेळचे पुरुष आणि महिला या त्या ठिकाणी आणि त्या काळात मिळणार्‍या अनेक गोष्टींचा उदा. शंख, शिंपले, चामडे, लाकूड, प्राण्यांची शिंगे, दात, नखे आणि दगड यांचा वापर करून बनविण्यात आलेले दागिने वापरत होते. सर्वात प्राचीन काळातील आढळलेले दागिने म्हणजे शूल! इस्रायल येथे एका गुहेत आढळलेले शंखांपासून तयार केलेले मोत्यांचे एक कंगण. भारताचा प्राचीन इतिहास जर तपासला तर सिंधू नदीच्या काठावर जी प्राचीन संस्कृती उदयाला आली, त्या काळातील पुरुष आणि महिलासुद्धा निरनिराळ्या प्रकारच्या दागिन्यांच्या शौकीन होत्या. त्यावेळी उपलब्ध असलेल्या निरनिराळ्या वस्तू उदा. तांबे, पितळ, लोखंड तसेच चामडे, हस्तिदंत, जस्त या पासून बनवलेले दागिने वापरत असल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. आपल्या शास्त्रांमध्ये वेदांमध्ये, पुराणांमध्येसुद्धा अनेक प्रकारच्या साहित्यापासून बनवलेले दागिने वापरत असल्याचा उल्लेख आहे. अशी प्राचीन परंपरा असलेले हे ‘इमिटेशन ज्वेलरी’चे क्षेत्र निरनिराळ्या संस्कृती जशा विकसित होत गेल्या, तसे विकसित आणि लोकप्रिय होत गेले. याचे कारण म्हणजे, सामान्यांच्या आवाक्यात असलेली किंमत, अनेक आकर्षक आणि नव नवीन रचना, तसेच सहज असणारी उपलब्धता हे होय.

 
मानवी संस्कृती जशी अधिकाधिक विकसित होत गेली, तसतसे नवीन आकार, प्रकार, साहित्यसुद्धा वापरले जाऊ लागले. याचा परिपाक म्हणून ‘इमिटेशन ज्वेलरी’ विकसित होत गेल्याचे आढळते. ‘इमिटेशन ज्वेलरी’ आणि मौल्यवान दागिने यातील फरक अधिकाधिक कमी होत गेला. प्रत्येक संस्कृतीमधील सामान्य लोकांमध्ये जास्त कल हा ‘इमिटेशन ज्वेलरी’ वापरण्याकडे असल्याचे दिसून येते. सिंधू संस्कृतीमध्ये तर मौल्यवान दागिने गुंतवणूक म्हणून आणि ‘इमिटेशन ज्वेलरी’ ही एक आवश्यक बाब म्हणून पुढे आल्याचे आढळून येते. औद्योगिक क्रांतीनंतर ‘इमिटेशन ज्वेलरी’चे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाऊ लागले. भारताचा विचार केल्यास प्राचीन काळापासून हाताने तयार (handmade) केलेली ज्वेलरी वापरण्याचा प्रघात आहे. बारा बलुतेदारांमध्ये सोनार, कासार हे महत्त्वाचे कारागीर आढळतात. सोनार हे फक्त सोन्याचे नव्हे, तर सर्व प्रकारच्या साहित्याचे दागिने तयार करण्याच्या कलेमध्ये अतिशय वाकबगार आढळतात. कासारसुद्धा काचेच्या आणि तत्सम साहित्याच्या बांगड्या तयार करणारे कारागीर होते. औद्योगिक क्रांतीनंतरसुद्धा भारतामध्ये हाताने तयार केलेल्या दागिन्यांची लोकप्रियता टिकून राहिली. मशीनने तयार करण्यात आलेले दागिने आपल्या संस्कृतीमध्ये स्वीकारले गेले नाहीत. हाताने तयार करण्यात येणार्‍या दागिन्यांवर त्या कारागिराचा स्वतःचा एक ठसा असतो. त्या दागिन्यांची जडणघडण, कलाकुसर त्या त्या कारागिराप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण असते. आजसुद्धा परदेशात मशीनने बनवलेल्या ज्वेलरीपेक्षा हाताने बनवलेल्या ‘इमिटेशन ज्वेलरी’चे अनेक चाहते आहेत. त्यामुळे भारतीय ‘इमिटेशन ज्वेलरी’ ही परदेशामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
 
आधुनिक भारतीय ‘इमिटेशन ज्वेलरी’ क्षेत्राचा विचार केल्यास, हे दागिने आपल्याकडे सर्व ठिकाणच्या आणि प्रकारच्या ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. आज भारतामध्ये मुंबई, राजकोट, जयपूर, इंदोर, दिल्ली, कोलकाता, मोरादाबाद ही ‘इमिटेशन ज्वेलरी’च्या उत्पादनाची प्रमुख केंद्रे मानली जातात. भारतामध्ये ८० टक्के ‘इमिटेशन ज्वेलरी’ ही कारागिरांकडून हाताने बनवली जाते. अत्यंत आकर्षक, अद्वितीय आणि परंपरागत कारागिरी हे भारतीय ‘इमिटेशन ज्वेलरी’चे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे जगभरात या ज्वेलरीचे चाहते आहेत. भारतीय ‘इमिटेशन ज्वेलरी’ क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड रोजगार उत्पादनाची क्षमता. मौल्यवान ज्वेलरीच्या किंमतीमध्ये साहित्याची किंमत ९० टक्के आणि श्रमाचा हिस्सा हा १० टक्के आहे. या उलट ‘इमिटेशन ज्वेलरी’च्या किमतीमध्ये मटेरिअलची किंमत २० टक्के आणि श्रमाचा हिस्सा हा ७० टक्के इतका असतो. तसेच या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होतो. हाताने राखून एक अंदाज जरी व्यक्त करायचा असेल तरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आजच्या घडीला ‘इमिटेशन ज्वेलरी’ क्षेत्र ५० लक्ष रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करत असेल. जर काही गोष्टींमध्ये सरकारची योग्य साथ मिळाली तर पुढील पाच वर्षांत ही रोजगार निर्मिती दुप्पट होऊ शकते. ‘इमिटेशन ज्वेलरी’ क्षेत्राचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची निर्यात क्षमता. जगात दुसर्‍या कुठल्याही देशामध्ये हाताने तयार केलेली ज्वेलरी तयार होत नाही. कारण, हाताने ज्वेलरी बनविण्याची परंपरागत कला दुसर्‍या कुठल्याही देशात नाही. त्यामुळे जगभरातील सर्व थरातील लोकांमध्ये, विशेषत: आफ्रिका खंडामध्ये आणि मध्यपूर्व आशियामध्ये भारतीय हाताने बनवलेली ‘इमिटेशन ज्वेलरी’ लोकप्रिय आहे. सध्या सुमारे पाच ते सहा हजार कोटी रुपयांची वार्षिक निर्यात केली जाते. जगभरातून ‘इमिटेशन ज्वेलरी’चे अनेक व्यापारी भारतातील ‘इमिटेशन ज्वेलरी’च्या प्रमुख बाजारपेठांमध्ये येऊन खरेदी करतात आणि आपापल्या देशात नेतात. ही निर्यात वेगळी. यामुळे भारत सरकारला आवश्यक असे विदेशी चलन मिळते. सरकारने ‘इमिटेशन ज्वेलरी’ क्षेत्राला आवश्यक मदत केल्यास भारत ’आत्मनिर्भर’ होण्यासाठी वेळ लागणार नाही, तसेच असंख्य प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध होऊ शकतील.
 
सध्या अनेक समस्यांनी हे क्षेत्र ग्रासलेले असूनसुद्धा जास्तीत जास्त उत्पादन, नवनवीन आकर्षक डिझाईन्स, नवीन मटेरियल, नवीन प्रक्रिया, आवश्यक तेथे संगणकाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारताच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आपले स्थान टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘कोविड-19’च्या प्रचंड संकटांच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीशी मुकाबला करताना या क्षेत्राला भेडसावणार्‍या समस्यावर मात करण्यासाठी आता सरकारच्या अनुकूल धोरणांची अपेक्षा या क्षेत्रातील उत्पादक करत आहेत. या क्षेत्रातील भारतभर पसरलेल्या सर्व उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणारी त्यांची Imitation Jewellery Manufacturing Association (IJMA) संस्था आहे. या संस्थेचे सुविद्य मानद सचिव मुंबई येथील नागेंद्र भाई मेहता, जे स्वतः गेली २५ या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांच्या मते या क्षेत्राला भेडसावणारी अनेक आव्हाने आहेत. या क्षेत्रामध्ये मुख्य उणीव भासते ती म्हणजे कुशल कामगारांची. या क्षेत्रामध्ये येऊ इच्छीत कामगारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी कुठलीही अधिकृत प्रशिक्षण संस्था उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन मटेरीयल, डिझाईन्स, आधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये म्हणावे तसे उपलब्ध नाही. याचा परिपाक म्हणजे अत्याधुनिक, आकर्षक डिझाईन, रंगसंगतीचा या क्षेत्रामधील अभाव. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागते. किमतीमध्ये वृद्धी, तयार मालाच्या पुरवठ्यामध्ये दिरंगाई, सुमार दर्जाचे उत्पादन अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याकरिता केंद्रीय/राज्य सरकारच्या मदतीने अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था तसेच संगणकीय तंत्रज्ञानाने चालणारी यंत्रसामग्री उपलब्ध असलेली सुविधा केंद्र जर ठिकठिकाणी उभी करता आली, तर या समस्यांवर मात करता येईल.
 
विपणनासंबंधी सुद्धा अनेक समस्या आहेत. ‘इमिटेशन ज्वेलरी’ उत्पादकांना आपला पक्का मालं विकण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. योग्य रीतीने विकसित झालेली बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे रास्त दर, उत्तम दर्जा आणि योग्य प्रमाणीकरण यंत्रणेचा अभाव या प्रमुख अडथळ्यांचा सामना देशी आणि परदेशी ग्राहकांना करावा लागतो. एका छताखाली उपलब्ध नसलेली बाजारपेठ, योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे निर्यातदार आणि विदेशी ग्राहकांची होणारी कुचंबणा हीसुद्धा एक प्रमुख समस्या आहे. ‘इमिटेशन ज्वेलरी’ उत्पादक हे प्रामुख्याने सूक्ष्म किंवा कुटिरोद्योग या गटामध्ये मोडत असल्यामुळे गुंतवणुकीचा अभाव ही एक प्रमुख समस्या आहे. त्यामुळे अत्याधुनिक संगणकीय यंत्रप्रणालीची अनुपलब्धता हा मुद्दा उत्पादन खर्च वाढविण्यास कारणीभूत ठरतो. बाजारपेठेमध्ये स्पर्धा करण्यासाठी अडचणी उभ्या राहतात. चिनी उत्पादन खर्चाच्या तुलनेत भारतीय उत्पादन खर्च खूपच जास्त असल्यामुळे फक्त विदेशी बाजारपेठेमध्ये नव्हे, तर भारतीय बाजारपेठांमध्येसुद्धा चिनी ‘इमिटेशन ज्वेलरी’च्या स्पर्धेला तोंड देणे कठीण जाते. तसेच भारतीय उत्पादकांना डिझाईन्स तयार करण्याचे शास्त्रोक्त ज्ञान नसल्यामुळे युरोप आणि अमेरिकन बाजारपेठा काबीज करणे अवघड बनते.
 
‘ईजमा’ या संघटनेचे सचिव नागेंद्र भाई मेहता यांच्या मते, ‘इमिटेशन ज्वेलरी’ क्षेत्राला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे चिनी बनावटीचा ज्वेलरीचा कच्चा माल तसेच ‘इमिटेशन ज्वेलरी’चे होणारे डम्पिंग. चिनी कच्चा माल आणि ज्वेलरी ही बोगस/डमी बिलांच्या साहाय्याने अत्यंत कमी किमतीत आयात करून, अत्यंत कमी कस्टम्स ड्युटी भरून भारतामध्ये आणली जाते. त्यामुळे भारतामध्ये तयार होणारी ज्वेलरी आणि कच्चा माल भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धेत टिकू शकत नाही. या समस्येमुळे भारतीय ‘इमिटेशन ज्वेलरी’ क्षेत्र उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण, केवळ आपल्या निर्यातीवर नव्हे, तर अंतर्गत मागणीवरसुद्धा अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. भारतीय बाजारपेठेतील भारतीय पारंपरिक ‘इमिटेशन ज्वेलरी’ची मागणी खूप कमी होऊन अनेक उत्पादकांना आपले काम बंद करण्याची वेळ आली आहे. ‘कोविड-१९’च्या विश्वव्यापी साथीनंतर संपूर्ण जगाची रचनाच बदलते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेपश्चात प्रत्येक औद्योगिक क्षेत्र जास्तीत जास्त ‘आत्मनिर्भर’ होण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी ‘इमिटेशन ज्वेलरी’ क्षेत्राला भेडसावणार्‍या समस्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारांनी तातडीने लक्ष घालून या क्षेत्राला काही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा या उद्योगातील प्रत्येक उद्योजक करत आहे.
 

 

- सुनील आघारकर

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.