उद्योजक बहीण-भाऊ

    दिनांक  02-Jul-2020 23:09:58   
|


pramod sawant_1 &nbsकोरोनाने सर्वसामान्यांसमोर सगळ्यात मोठं संकट निर्माण केलं आहे ते म्हणजे पैशाचं. हाताला कामच नसल्याने हाती पैसा येत नाही. मात्र, दैनंदिन गरजा तशाच आहेत. वैद्यकीय सुविधा, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू यासाठी पैसा लागतच आहे. हे लक्षात आल्यानंतर अनेकांनी आपापल्या कौशल्यानुसार व्यवसाय करण्यास सुरुवात केली. यामध्ये भाजीचा व्यवसाय आघाडीवर आहे. कोणी भाजी विकतंय तर कोणी आंबे-फणस, कोणी ऑनलाईन कोर्सेस शिकवून पैसा कमावतंय, तर कोणी ऑनलाईन वस्तू. कोणी सॅनिटायझर तर कोणी सॅनिटायझर स्टॅण्ड. बहुतांश व्यावसायिकांनी नवीन उद्योगसंधी चाचपडण्यास सुरुवातदेखील केली आहे. या सगळ्यांमध्ये कोणी यातून मोठा उद्योजक बनण्याची स्वप्ने पाहतोय असं पण नाही. परंतु, प्रत्येकाला सध्याच्या काळात उदरनिर्वाह होईल एवढे तरी पैसे हवेत. असाच विचार त्या दोन भावंडांना आला आणि त्यातून उभा राहिला मासे पुरविण्याचा व्यवसाय. दीपेश आणि सुगंधा या राऊत बंधू-भगिनीने सुरु केलेल्या कोरोना काळातील ही व्यवसायाची गोष्ट.
 

हे राऊत कुटुंब मूळचं सफाळेमधल्या दातिवरेचं. दीपेशचे आजोबा रेल्वेमध्ये कामाला लागले आणि राऊत कुटुंब माहिम मच्छीमार नगरमध्ये राहायला आले. दीपेशचे वडील मोहन राऊत हे खासगी गाडीवर वाहनचालक होते. दीपेशला दोन बहिणी सुगंधा आणि स्मिता. सुगंधा दीड वर्षांची असताना दीपेशच्या आईचं मीनाक्षी राऊत यांचं निधन झालं. ही कच्ची-बच्ची मुलं अनाथ झाली. या लहानग्यांचा सांभाळ त्यांची आत्या ललिता राऊत यांनी केला. त्या माऊलीने या मुलांची जबाबदारी पेलता यावी, त्यांच्या संगोपनात कुठेही कमतरता राहू नये, यासाठी आयुष्यभर लग्न केले नाही. एकप्रकारे यशोदा बनूनच त्यांनी या तीन मुलांचं गोकुळ फुलविलं.


दादरच्या बालमोहन विद्यालयात या भावंडांचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर दीपेश वाहनचालक बनला. सुगंधाने ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण केला. सुगंधाचं ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणार्‍या विजय सोंडे या तरुणाशी लग्न झालं. लग्नानंतर तिला एक कन्यारत्न झालं. तिचा सांभाळ करण्यासाठी सुगंधा घरीच राहू लागली. ही दोन्ही भावंडं एकाच विभागात राहत असल्याने येणं-जाणं नेहमीचंच होतं. यावर्षी कोरोनाने जगाला आपल्या विळख्यात घेतलं. मार्चमध्ये मुंबईत सरकारने टाळेबंदी जाहीर केली. लोकांना घरातच राहणं अनिवार्य झालं. १४ एप्रिलनंतर या टाळेबंदीच्या नियमांत सरकारने काही अटी शिथील केल्या. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू विकण्याची परवानगी मिळाली, मात्र ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळून! यामध्ये भाजीपाला, मासेविक्री यांचादेखील समावेश करण्यात आला.


दीपेश यांना १२ वर्षांचा वाहनचालक क्षेत्राचा अनुभव आहे. माहिममध्ये त्यांचं एक गिफ्ट शॉपसुद्धा आहे. टाळेबंदीमुळे सगळंच बंद असल्याने दीपेश यांनादेखील घरीच राहावं लागलं होतं. कोरोनामुळे अजून किती दिवस घरी राहावं लागणार माहीत नव्हतं. एकदा असंच हे भाऊ-बहीण घरात बसून गप्पा मारत असताना त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. आपण मासे विकण्याचा व्यवसाय सुरु केला तर... कोळी समाजाचा तसा मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय. मात्र, शहरीकरणाने नोकर्‍या आणि अन्य व्यवसायांत इतर समाजाप्रमाणे तेसुद्धा गुंतले. दीपेश आणि सुगंधा यांना मात्र कोरोनाच्या या अडचणीच्या काळात आपला हा पारंपरिक व्यवसायच आठवला. पण, टाळेबंदीमध्ये विकणार कसं आणि विकत घेणार कोण, हा प्रश्न उभा ठाकला. आपण फेसबुकवरुन आपल्या व्यवसायाची जाहिरात करायची. मार्केटिंग करायचे. सुगंधाने विक्रीची समस्यादेखील सोडवली. तेव्हा ठरलं. सोशल मीडियावरुन लोकांपर्यंत जाणं, मार्केटिंग करणं ही सुगंधाची जबाबदारी. दीपेश ऑर्डरच्या ठिकाणी मासे नेऊन देणार. याकामी पोलिसांची परवानगी मिळवण्यासाठी मनसेच्या यशवंत किल्लेदारांनी त्यांनी मोलाची मदत केली.


कच्च्या मालासाठी दीपेशने परेशभाईला गाठलं. परेशभाईने दीपेशला उधारीवर मासे दिले. सुगंधाने माशांचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. ‘कोळीवाडा सी फूड’ असं नामकरण झालं. ताजे, स्वच्छ आणि मोठाले मासे पाहून सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे ग्राहकांकडून माशांविषयी विचारणा होऊ लागली. भरपूर ऑर्डर्स येऊ लागल्या. पापलेट, रावस, खेकडे, शिंपल्या, कोळंब्या, सुरमई सारखे ओले मासे आणि बोंबिल, बांगडा, जवळा, करंदीसारखी सुकी मासळीसुद्धा ते विकू लागले. हे मासे डहाणू, येथून बोटीने येतात आणि मग त्यांची खरेदी होते. यामुळे जे मासे खरेदी केले जातात ते एकदम ताजे असतात. कोणत्याही ग्राहकास ताजे मासे मिळाले तर ते खूश होतात, असे समाधानी ग्राहक मग नेहमी यांच्याकडून खरेदी करतात. जर मासे पसंत नाही पडले किंवा जर खराब वाटले, तर त्या माशांच्या ऐवजी दुसरे मासे पाठवले जातात. या अशा सेवेमुळेच ‘कोळीवाडा सी फूड’चा स्वत:चा खास ग्राहकवर्ग निर्माण झाला आहे.


भविष्यात एक फिरतं वाहन घेऊन हा व्यवसाय विस्तारण्याचा दीपेश आणि सुगंधाचा मानस आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार हे मासे कापून स्वच्छ करुन दिले जातात, तर काही माशांना मॅरिनेटसुद्धा केले जाते. ग्राहकास फक्त ते तेलात सोडायचे एवढंच काम असतं. ‘दर्जा, दर्जा आणि दर्जाया त्रिसूत्रीवर व्यवसाय करण्याचे या दोघांनी निश्चित केले. एप्रिलच्या शेवटच्या दिवसांत सुरु झालेला हा व्यवसाय खर्‍या अर्थाने विस्तारतोय. दीपेशला त्यांची पत्नी मोनाली, तर सुगंधा यांना त्यांचे पती विजय यांनीही मोलाची साथ दिली. बहीण-भावाचं नातं हे वेगळंच असतं. एकमेकांवरची माया ते अधोरेखित करत. पण, ते उद्योगात एकत्र आलं तर काय किमया करु शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे दीपेश राऊत आणि सुगंधा राऊत-सोंडे यांचं ‘कोळीवाडा सी फूड’ होय. मराठी समाजात असे अनेक उद्योजक भाऊ- बहीण तयार झाले, तर महाराष्ट्र उद्योगात नेहमीच आघाडीवर राहील.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.