चमत्कारिक मुख्यमंत्री!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2020   
Total Views |


Uddhav thackeray_1 &


लोकशाही व्यवस्थेत राजपद्धती ही नाकारण्यात आली आहे. लोकनिर्वाचित आमदार हा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळत असतो. (अपवाद विधान परिषद सदस्य मुख्यमंत्री) त्यामुळे अशा मुख्यमंत्र्यांकडून जनतेला आश्वासक कार्याची अपेक्षा असते. नेतृत्व करणारी व्यक्ती ही कणखर आणि निर्णयक्षमता असणारी हवी. असे गुण सध्या दुर्भाग्याने आपल्या राज्याच्या नेतृत्वात दिसत नाही. जनतेला विश्वास देण्याऐवजी मुख्यमंत्री विठ्ठलाला चमत्काराचे साकडे घालत आहे. यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? परमेश्वर हा त्रिकाल आहे. तो शाश्वत आहे. यात वादच नाही. मात्र, ईश्वरी साथ आणि आशीर्वाद हे प्रयत्न करणार्‍यास प्राप्त होतात. हे माननीय मुख्यमंत्री महोदय विसरले काय? राज्यातील व्यवहार चालू-बंद करणे म्हणजे कार्य नाहीच. ठोस उपाययोजना करणे, सर्व साधनांचा उपयोग करणे, मंत्रिमंडळात समन्वय साधणे, शेवटच्या टोकापर्यंत काम पोहोचेल, अशी व्यवस्था करणे व त्याचे नियोजन करणे म्हणजे कार्य होय, हे अजूनही मुख्यमंत्री यांच्या लक्षात आलेले दिसत नाही. मुख्यमंत्री यांनी चमत्काराची भाषा करणे पूर्वी राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आहे. याचे तरी भान बाळगणे आवश्यक होते. जिथे राज्याचे प्रमुखच चमत्काराची भाषा करतात तिथे आता चमत्कार करणार्‍यांचे फावले नाही तरच नवल. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. राज्याच्या जनतेच्यावतीने ‘लोकनिर्वाचित’ नसतानाही साकडे घालताना राज्याला कोरोना महामारीशी दोन हात करण्याचे बळ दे, तुझा कृपाशीर्वाद राज्यातील जनतेवर असू दे, अशी मागणी मुख्यमंत्री या नात्याने करणे आवश्यक होते. मात्र, तोंडाला पट्टी किती काळ बंधून जगायचे, असा लाडिक सवाल नेतृत्व प्रमुखाने करणे म्हणजे अर्धे मुसळ केरात गेल्या सारखेच आहे. त्यामुळे आता राज्यातील जनतेनेदेखील चमत्काराचीच वाट पाहणे मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत आहे काय? असे असेल तर राज्यातील भाळी चमत्कारिक मुख्यमंत्री सहन करण्यापलीकडे काही पर्याय सध्या तरी नाही हेच काय ते मोठे दुर्दैव!
 
जनतेला हवा विश्वास!


कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकार जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याची प्रतिक्रिया आता लोक व्यक्त करत आहेत. सातत्याने होणारे ‘अनलॉक’ आणि ‘लॉकडाऊन’ यामुळे सरकारला नेमके म्हणायचेय तरी काय, हेच लोकांना कळत नसल्याचे दिसून येते. विनाकारण फिरणार्‍या लोकांवर कारवाई करणार असल्याचे धोरण सध्या राबविले जात आहे. मात्र, व्यक्तीच्या लेखी महत्त्वाचे असलेले कारण हे सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करणार्‍या पोलिसांसाठी मात्र ‘विनाकारण’ या सदरात मोडणारे आहे. त्यामुळे सरकारने ‘कोरोना योद्धे’ पोलीस आणि जनता यात संघर्षच निर्माण केल्याचेच चित्र दिसून येते. आज सुरू असणारा बाजार उद्या सुरू राहील किंवा नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे संधी साधून लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. त्यामुळे एका विशिष्ट वेळी गर्दी होते. अशी प्रतिक्रिया जनतेत आता उमटत आहे. सामन्यत: दुकाने उघडी राहिल्यास आणि त्याबाबत शाश्वती मिळाल्यास रस्त्यावर गर्दी होणार नाही. हॉटेल व्यावसायिकांचेदेखील याच स्वरूपाचे म्हणणे आहे. हॉटेल ही चैन नसून आताच्या काळात गरज आहे. मात्र, आम्हाला कोणी विश्वासच देत नसल्याने आम्हालादेखील व्यवसाय करण्यात अडचणी येतात, अशी प्रतिक्रिया आता उमटत आहे. सर्वच बाबतीत नागरिकांना आता विश्वास हवा आहे. कल्याणकारी राज्याचे धोरण म्हणून तसा विश्वास राज्यातील जनतेच्या मनात राज्य सरकारने निर्माण करणे आवश्यक आहे. मात्र, सरकार चमत्कारावर विश्वास ठेवत आहे. तेव्हा राज्यातील जनतेचे वाली कोण? जनतेने कोणाकडे विश्वासाने पाहावे? असाच प्रश्न पडतो. ‘पुनश्च हरीओम’चे ‘स्वाहा’ झाले असल्याने आता विश्वास नेमका कोणावर ठेवावा आणि का ठेवावा, हाच सवाल सामान्य नागरिकांना सतावत आहे. मुख्यमंत्री एकांगी संवाद साधत आहेत. मंत्रिमंडळातील पालकमंत्री काही ठराविक संघटना म्हणजे जिल्हा समजून माहिती संकलित करून आदेश देत आहे. या सर्वात सामान्य नागरिकाला नेमके काय हवे आहे? त्याचे म्हणणे नेमके काय आहे? हे कोण जाणून घेणार की आता विश्वास निर्माण होण्यासाठीदेखील चमत्कार घडण्याची वाट पाहावी लागणार?

 
@@AUTHORINFO_V1@@