ब्रिटीश खासदारांचे पाक प्रेम : काश्मीर दौऱ्यासाठी मिळाले ३० लाख

    दिनांक  19-Jul-2020 13:24:16
|

Imran Khan_1  H


भारतातून परतल्यानंतर ब्रिटनचे खासदार पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर पाकव्याप्त काश्मीरचा दौरा करण्यासाठी मोठी रक्कम मिळाल्याची माहिती उघड झाली आहे. ब्रिटीश खासदार डेबी अब्राहम्स यांच्या नेतृत्वात खासदारांचा गट फेब्रुवारीत पाकव्याप्त काश्मीरात पोहोचला होता. त्यासाठी मोठी रक्कम मिळाल्याची माहिती पाच महिन्यांनी उघड झाली आहे. 

ब्रिटनच्या ऑल पार्टी पार्लमेंटरी ग्रुप आणि ऑल पार्टी पार्लमेंटरी काश्मीर ग्रुपच्या नोंदवही नुसार या दौऱ्यासाठी प्रत्येक खासदाराला ३१ हजार पाऊंड इतका निधी मिळाला. फेब्रुवारीत ही रक्कम त्यांना देण्यात आली. ब्रिटिश खासदार डेबी अब्राहम्स यांना फेब्रुवारीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परत पाठवण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनंतर पाकिस्तानने त्यांच्या अन्य खासदारांना देशात बोलावले होते.डेबी अब्राहम्स दोन दिवसांसाठी भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या. गेल्यावर्षी ७ ऑक्टोबर रोजी व्यावसायिक बैठकीसाठी त्याना ई-व्हीसा जाहीर करण्यात आला होता. ऑक्टोबर २०२० पर्यंत हा व्हीसा वैध होता. देशविरोधी कारवाईची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला. याच कारणास्तव त्यांना भारतातून पुन्हा मायदेशी पाठवण्यात आले होते.


कलम ३७० विरोधात होत्या डेबी

डेबी यांनी भारताच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी कलम ३७० हटवले होते. भारतातील काश्मीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्या आल्या होत्या. एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी आपला अधिकृत व्हिसा असतानाही प्रवेश रोखल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मला आरोपीसारखी वागणूक मिळाली, असेही त्या म्हणाल्या होत्या. 


पाकने डाव साधला

कलम ३७० विरोधात वक्तव्य करणाऱ्या खासदारांना निमंत्रण देऊन पाकिस्तानने डाव साधला. ब्रिटन खासदारांना पाक व्याप्त काश्मीरचा दौरा करवून भारताविरोधात चित्र निर्माण करण्याचा प्रयत्नही केला असावा हे नाकारता येत नाही. तसेच इतकी मोठी रक्कम प्रत्येक खासदाराला मिळाल्याची माहिती पाच महिन्यांनी उघड झाली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.