मूर्तिमंत अस्मिता

    दिनांक  18-Jul-2020 22:55:25
|


Smita Patil_1  


अत्यंत नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील...विलक्षण बोलके डोळे आणि त्याला धारदार अभिनयाची साथ लाभल्यामुळे या अभिनेत्रीने आपली अल्प कारकिर्द वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने गाजवली. रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन या तिन्ही माध्यमांवर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. अवघ्या दीड दशकाच्या आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिका साकारत हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामधील काही मोजक्या श्रेष्ठ अभिनेत्रींच्या रांगेत जाऊन बसण्याचा मान त्यांनी मिळवला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या कामाचा गौरव करण्यात आला. ’कोस्टा गॅव्हरास’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील श्रेष्ठ दिग्दर्शकाने या अभिनेत्रीच्या नावाने चित्रपटांचा महोत्सव भरवला होता. अशा प्रकारचा मान मिळवणार्‍या त्या पहिल्याच भारतीय अभिनेत्री ठरल्या. माँट्रियल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्यांनी परीक्षकाची भूमिका निभावली होती. १९८५ मध्ये नैरोबी येथे झालेल्या जागतिक महिला परिषदेमध्ये या गुणी अभिनेत्रीने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत जिने आपल्या अभिनयाने सगळ्यांच्याच मनात वेगळंच स्थान निर्माण केलेल्या अशा अत्यंत नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील...
 


राजकीय नेते शिवाजीराव पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई यांच्या पोटी स्मिता पाटील यांचा १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुण्यात जन्म झाला. पुण्यातील ’रेणुका स्वरूप स्मृती हायस्कूल’मध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्या मॅट्रिकला असतानाच त्यांचे वडील शिवाजीराव पाटील मंत्री झाले, पण स्मिता पाटील त्यांच्यासोबत मुंबईला न जाता पुण्यातच आपल्या एका मैत्रिणीकडे राहिल्या. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच काळात त्यांचा थिएटर अकॅडमीच्या ग्रुपशी परिचय झाला. अभिनयातील त्यांचे पदार्पण झाले ते ‘तीव्र मध्यम’ या अरुण खोपकर दिग्दर्शित ‘एफटीआयआय’च्या पदविका फिल्ममधून. त्यानंतर दोन वर्षांनी पुण्याहून मुंबईला आल्यावर दूरदर्शनच्या माध्यमातून त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. तेव्हा नव्यानेच सुरू झालेल्या दूरदर्शन वाहिनीवर स्मिता पाटील ‘वृत्तनिवेदिका’ म्हणून काम करू लागल्या. १९७० मध्ये वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी स्मिता पाटील यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. परंतु, त्यांना उपजत अभिनयाची ओढ होती. अभिनयाच्या आवडीनं त्यांना शांत बसू दिलं नाही. १९७४ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्या अभिनयातला सच्चेपणा प्रेक्षकांना भावला. पडद्यावरील सौंदर्यांच्या साचेबद्ध कल्पना त्यांनी दुय्यम ठरवल्या. हिंदी आणि मराठी दोन्ही सिनेमांमध्ये त्यांनी स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.


 
भारतात १९७७-७८च्या सुमारास ‘समांतर चित्रपटा’ची लाट आली. ‘समांतर’ चित्रपटांसाठी स्मिता पाटील यांनी आपल्या कारकिर्दीमधील तब्बल पाच वर्षे दिली. १९७५ साली दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चरणदास चोर’ या बालचित्रपटामधील ‘राणी’च्या भूमिकेपासून स्मिता पाटील यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. ‘मंथन’ (१९७७), ‘भूमिका’ (१९७७), ‘जैत रे जैत’ (१९७८), ‘गमन’ (१९७९), ‘बाजार’, ‘आक्रोश’ (१९८०), ‘चक्र’ (१९८१), ‘अर्थ’ (१९८३), ‘आखिर क्यों’(१९८५), ‘अमृत’ (१९८६), ‘मिर्चमसाला’ (१९८७) आदी चित्रपटांमधील व्यक्तिरेखांद्वारे त्यांनी आपल्यातील सशक्त अभिनेत्रीचे दर्शन घडवले. यापैकी ‘मंथन’ या चित्रपटामधील बिंदूच्या व्यक्तिरेखेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराद्वारे गौरवण्यात आले. श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, केतन मेहता, डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकांकडे काम केल्यामुळे स्मिता पाटील यांच्या अभिनयाला आणखी वेगळी झळाळी लाभली. ‘जैत रे जैत’ (१९७८) या चित्रपटातील ‘चिंधी’, तिच्या अंतर्गत ऊर्मीसह आपल्यासमोर येते, ती अर्थातच स्मिता पाटील यांच्या समर्थ अभिनयातून! नवर्‍याने सोडलेली चिंधी नाग्याच्या प्रेमात पडते व त्याला मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करते. राणी माशीमध्ये देवत्व शोधणार्‍या नाग्याचा देवत्वाविषयीचा संघर्ष ती जाणते व नाग्याला मिळवण्यासाठी त्याच्या वेडेपणात सामील होऊन, राणी माशीला शोधण्यासाठी त्याच्यासोबत जाते. नाग्याचा वेडेपणा मनोमन माहीत असला तरी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी करावा लागणारा उघड संघर्ष ती मान्य करते. चिंधीचा प्रेमातला वेडेपणा स्मिता पाटील आपल्या अभिनयातून सकारात्मक पद्धतीने मांडतात व चिंधीच्या भूमिकेला न्याय देतात. डॉ. पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ या चित्रपटामध्ये पाटील यांनी साकारलेली ‘सुलभा महाजनही व्यक्तिरेखा मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामधील सर्वात महत्त्वाची व्यक्तिरेखा मानली जाते. या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्तिगत, सामाजिक पातळीवर अपयशी ठरलेल्या, तरी स्वत:वर विश्वास असणार्‍या स्त्रीची भूमिका रंगवली. सामाजिक कार्य करताना, ती काम करत असलेल्या आश्रमाकडून नाकारली जाते, तर सामाजिक कार्य करायला घराबाहेर पडली म्हणून घरातल्यांकडून नाकारली जाते. या दोन्ही पातळ्यांवरचा नकार ती ज्या ताकदीने पचवते, त्यातूनच तिच्या व्यक्तिमत्त्वातील स्वतंत्रपण व समर्थपण जाणवून जाते. या व्यक्तिरेखेचा प्रवास त्यांनी आपल्या सहज व संयमित अभिनयातून उत्कृष्टपणे रेखाटला आहे.


सावळा रंग, शेलाटी बांधा, पण यावर मात केली तिच्या संवेदनशील चेहर्‍याने! तिचे आत्मनिर्भर पाणीदार काजळलेले टपोरे बोलके डोळे, नाकी डोळ्यातील नीटसता या सार्‍यांमुळे तिच्या ‘क्लोजअप’मधून सारा अभिनय बाहेर यायचा. अभिनयाबाबत तिची आपल्या चेहर्‍यावर सारी भिस्त, तीच अधिक बोलत असे. तिच्याजवळ मधुबालेचं सौंदर्य अजिबात नव्हतं. नर्गिसचा अवखळपणाही नाही, मीनाकुमारीच्या सोज्वळ चेहर्‍याशी मात्र काहीसं साम्य होतं. रुढार्थाने नायिकेला आवश्यक असे आकर्षक काहीच नव्हते, लावण्य नव्हते. अशा या वेगळ्या रसायनामुळेच तिला ’इनग्रिड बर्गमन’ म्हटले गेले. असा कलावंत शतकात एखादाच जन्माला येतो. तिनेच म्हटल्याप्रमाणे, अभिनय कला तिला देवाने दिलेले देणे होते. चेहर्‍यावर कृत्रिमता अजिबात नसल्यामुळे ‘क्लोजअप’चं सामर्थ्य तिला आत्मविश्वासपूर्वक वापरता आलं. नैसर्गिक बुद्धी, भावना, सामंजस्य यांचे बेमालूम मिश्रण तिच्या व्यक्तिकरणात होते. कुठल्याही अभिनयाचा डिप्लोमा वा अभिनयाचे शिक्षण नसूनही, ती ग्रामीण स्त्रीची व्यथा, अन्याय, घुसमट यात घुसत असे; त्यामुळेच तर ती जीवंत, रसरशीत पात्रे उभी करू शकली. स्वतःची स्वतंत्र अभिनय शैलीही तिने निर्माण केली नाही. कारण, एकाच साचेबंद भूमिकेत ती कधीही अडकून पडली नाही. प्रत्येक भूमिका वेगळी. त्यामुळे तिचा प्रत्येक परकाया प्रवेश वेगळा होत होता. ’शक्ती’, ’नमकहलाल’ यात अमिताभ व दिलीपकुमारबरोबर ती समर्थपणे उभी राहिली. भूमिका जगायचे एक वेगळे अभिनय सामर्थ्य तिच्यात होते.


 
मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू अशा आठ भाषांमधील चित्रपटांमध्ये स्मिता पाटील यांनी काम केले. अवघ्या दहा वर्षांच्या सिनेकरिअरमध्ये स्मिता यांनी तब्बल ८० चित्रपट केले. पदार्पणाच्या चार वर्षांनंतर १९७७ मध्ये ’भूमिका’ चित्रपटासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर १९८० मध्ये ’चक्र’साठी पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी १९८५ मध्ये त्यांना ’पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.


 
स्मिता यांचं लग्न हा देखील चर्चेचा विषय ठरला. स्मिता या राज बब्बर यांच्या प्रेमात पडल्या होत्या. याच निर्णयामुळे, स्मिता आणि राज यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. स्मिता यांच्या घरातून देखील राज यांच्यासोबतच्या नात्याला सुरुवातीला विरोध होता. राज बब्बर विवाहित होते. त्यांचा नादिरा बब्बर यांच्याशी विवाह झाला होता. पण, स्मितांसाठी राज यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्मिता आणि राज यांनी लग्न केलं. २८ नोव्हेंबर १९८६ मध्ये प्रतीकचा जन्म झाल्यानंतर काहीच दिवसांतच म्हणजे १३ डिसेंबर १९८६ रोजी स्मिता यांनी अवघ्या ३१व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मृत्यूनंतर मृतदेह एखाद्या सवाष्ण महिलेप्रमाणं सजवला जावा, अशी स्मिता यांची इच्छा होती. त्याप्रमाणं निधनांतर त्यांची अखेरची इच्छा पूर्ण केली गेली. त्यांचे मेकअपमन दीपक सावंत यांनी त्यांच्या मृतदेहाचा सवाष्ण महिलेप्रमाणं मेकअप केला होता.


 
मात्र, ‘स्मिता पाटील’ या नावामागे दडलेली हळवी, मनस्वी, व्यवहार न सांभाळू शकणारी स्मिता पुढे येते. स्मिताची लोकप्रियता, तिच्या वादग्रस्त विवाहामुळे झालेली फरफट, मोठ्या दिग्दर्शकांकडून महत्त्वाचे चित्रपट दुसर्‍याच अभिनेत्रीला दिले गेल्याने आलेली अस्वस्थता, व्यावसायिक चित्रपटांत आलं तरंच आपली ‘मार्केट व्हॅल्यू’ वाढेल, असं वाटून चिकाटीने असे चित्रपट करण्याचा तिचा हट्ट, सरतेशेवटी तिला लागलेली संसार थाटण्याची, मातृत्वाची ओढ आणि अर्ध्यावरच संपून गेलेला तिचा प्रवास हे तुकड्या-तुकड्यातून आपल्या समोर येतं. शबाना आझमीशी तिचं असलेलं ‘लव्ह-हेट’ नातं, दीप्ती नवलशी असलेली मैत्री, रेखाशी मैत्री करण्याची तिची वेडी पण अपूर्ण राहिलेली इच्छा यांतून सामोरी येणारी स्मिता पाटील ही तिच्या पडद्यावरच्या प्रतिमेशी फारकत घेताना दिसते. चारचौघींसारखं चाकोरीतलं आयुष्य जगण्याच्या धडपडीत तिच्यातली मूळची धग कुठेतरी विझत चाललेली जाणवत राहते. स्मिता पाटील वेळेआधी आपल्यातून निघून गेली, तरीही विस्मृतीत कधी गेलीच नाही. उलट तिच्या विचारांचा, भूमिकांचा, अभिनयाचा आदर्श सतत मानला गेला, हे तिच्या कामाचं मोठेपण. तिच्या चाहत्यांची संख्या पिढ्या बदलल्या तरीही कमी झालेली नाही. स्मिताच्या शोकाचं गहिरं सावट कितीही वर्षे उलटली तरीही महाराष्ट्र, देशावरून हटलेलं नाही. तिचा मृत्यू केवळ एक धक्का नव्हता, तर ती एक अविश्वसनीय शोकांतिका होती तिच्या ‘उंबरठा’ चित्रपटातील गाण्यासारखी...


 
सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या,
तुझेच मी गीत गात आहे,
अजूनही वाटते मला की
अजूनही चांदरात आहे.
कळे न पाहशी कुणाला?
कळे न हा चेहरा कुणाचा?
पुन्हा पुन्हा भास होत आहे,
तुझे हसू आरश्यात आहे


सुरेश भटांचे अर्थवाही शब्द, सोबतीला लतादीदींचा काळीज चिरणारा स्वर. गाण्याचा शेवट होताना स्मिता पाटीलचे पाण्याने भरलेले डोळे काही केल्या पिच्छा सोडत नाहीत! ‘अभिनय’ या कलेलाच वेगळे परिमाण देणार्‍या, आपल्या व्यक्तिमत्त्वामधून स्त्रीच्या बंडखोरीला संयमित स्वरूपात साकार करणार्‍या, विविध चित्रपटांमधून अभिनयाचे एक आदर्श उभा करणार्‍या, वैयक्तिक जीवनातही सामाजिक, राजकीय आणि स्त्री स्वातंत्र्याचे भान जपणार्‍या ’स्मिता पाटील’ अशा दिग्गज अभिनेत्रीला मनापासून सलाम.

- आशिष निनगुरकर

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.