सुशांतप्रकरणी सीबीआय चौकशीस महाराष्ट्र सरकारचा नकार!

17 Jul 2020 17:10:43
sushant_1  H x


मुंबई पोलीस हे प्रकरण हाताळण्यास सक्षम : अनिल देशमुख

मुंबई : महाराष्ट्र सरकारने अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी सांगितले की, सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिस सखोल तपास करत आहेत. केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयला या प्रकरणात चौकशी करण्याची गरज नाही.


सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीला महाराष्ट्र सरकारने नकार दिला आहे. गुरुवारी रिया चक्रवर्तीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ट्विटकरुन सुशांतप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.


या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सुशांतच्या चाहत्यांनी देखील केली. गेल्या महिन्यात १४ जून रोजी सुशांतसिंग राजपूत याने मुंबईत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. बॉलीवूडमधील घराणेशाहीने त्याचा बळी घेतल्याची टीका सर्व स्तरांतून केली गेली.


गेल्या सहा महिन्यांत त्याच्याकडून एकेक करून अनेक चित्रपट काढून घेण्यात आले होते. एक चांगला अभिनेता असूनही तो चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या टोळ्यांमुळे त्रस्त झाला होता. त्याच्या निधनानंतर मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित बर्‍याच जणांची चौकशी केली आहे.



Powered By Sangraha 9.0