कसे आवरावे ‘कोरोना’ला?

17 Jul 2020 21:10:24

corona mumbai_1 &nbs


मुंबईत हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित सापडत असताना त्यांच्यासाठी अद्ययावत साधनांनी सुसज्ज कोरोना सेंटर उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिरीष दीक्षित यांनाच कोरोनाने शिकार करावे हे मुंबईतील जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल. दुसरे बळी पडले ते वॉर्ड ऑफिसर अशोक खैरनार.



कोरोना या सूक्ष्म विषाणूने भल्याभल्यांना अगदी हैराण करून सोडले आहे. संपूर्ण जगाने या विषाणूमुळे निर्माण झालेल्या महामारीसमोर शरणागती पत्करली. याला कसा आवर घालावा, याच विवंचनेत सर्वजण आहेत. सर्वसामान्य लोक उदरभरणाची विवंचना म्हणून घराबाहेर पडतात. पण, ज्याच्या दिमतीला गाडीघोडे, नोकरचाकर आहेत, जे घराबाहेरही पडत नाहीत, त्यांना कोरोनाने शिकार करावे, हे अकल्पित, अतार्किक आहे. मुंबईत हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित सापडत असताना त्यांच्यासाठी अद्ययावत साधनांनी सुसज्ज कोरोना सेंटर उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिरीष दीक्षित यांनाच कोरोनाने शिकार करावे हे मुंबईतील जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल. दुसरे बळी पडले ते वॉर्ड ऑफिसर अशोक खैरनार. सुरुवातीपासून ‘एच पूर्व’ विभागात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत होते.

मात्र, पोलिसांच्या मदतीने ध्वनिक्षेपकावरून विनंती करून, विषाणूचा धोका समजावून सांगून, ड्रोनच्या साहाय्याने गर्दीची ठिकाणे शोधून त्यांनी रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याचे फलित म्हणून रुग्णसंख्या नियंत्रणात आणणारा ‘एच पूर्व’ विभाग प्रथम ठरला. यात अशोक खैरनार यांचे योगदान मोठे होते. पण, कोरोनाने त्यांनाच शिकार करावे याहून तेथील जनतेचा दैवदुर्विलास कोणता असू शकेल! जे रोजच्या जगण्यातही फार मोठी काळजी घेतात, अशा अभिनेत्यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव करण्यात हयगय केली नाही. अनुपम खेर यांची आई, भाऊ, वहिनी, पुतणी यांना कोरोनाने घेरले, तर अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या यांनाही कोरोनाची बाधा झाली. त्याहूनही काळजाला भिडणारी गोष्ट म्हणजे, माजी सनदी अधिकारी, राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे झालेले निधन. शिवाय त्यांचे पती, मुलगा आणि मुलगी कोरोना बाधित आहेत. त्यांचा मुलगा ‘विशेष’ आहे. त्याचे शल्य न बाळगता, त्या मुलाचे सर्वकाही आनंदाने करत होत्या. अशी मुले असणार्‍यांसाठी त्या आदर्श होत्या. मात्र, समस्त मातांचा आदर्शच कोरोनाने हिरावून नेला आहे. कोरोना कसा आहे, केवढा आहे हे सिद्ध झालेले नाही. पण सूक्ष्म विषाणू आहे. त्याला आवरायचे कसे, हाच जगापुढे प्रश्न आहे.


संदिग्धता कशासाठी?


मुंबईतील ‘एच पूर्व’ विभागाबरोबरच त्याचा शेजारी विभाग असलेल्या ‘जी-उत्तर’ विभागातील धारावीत कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात पालिका प्रशासनाला यश येत असतानाच तेथे पुन्हा वाढणारे रुग्ण ही पालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. धारावीत दररोज आढळणारी रुग्णसंख्या एकवर आली होती. तो खरेतर आनंदाचा दिवस होता. एवढ्या लवकर रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने धारावीची गणना रुग्णसंख्या आटोक्यात येणार्‍या देशांबरोबर होऊ लागली. हा खरेतर धारावीकरांचा आणि पालिका प्रशासनाचा गौरव आहे. पण, पुन्हा वाढणारी संख्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय ठरत आहे. त्याचबरोबर त्याच विभागात असणार्‍या दादर आणि माहीममध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. धारावीला मागे टाकत दादर हे कोरोनाचे केंद्रबिंदू ठरत आहे. दादरमध्ये कोरोनाबाधितांची दररोजची संख्या ५९पर्यंत पोहोचली आहे. धारावीत रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना माहीम-दादरमध्ये नियंत्रण का येत नाही? तसेच एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असताना मृत्यूंची संख्या मर्यादित आहे, हे चांगले आहे.


पण, यात मृत्यूंची संख्या दडवली तर जात नाही ना, असाही संशय निर्माण होत आहे. तीच संदिग्धता ‘बेस्ट’च्या कर्मचार्‍यांची आहे. ‘बेस्ट’चे एक हजारांहून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित आहेत आणि ९३ कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याचे ‘बेस्ट’ कामगार संघटनेचे म्हणणे आहे. प्रशासन मात्र नऊ मृत्यू झाल्याचे म्हणत आहे. बाधित रुग्ण आणि मृत्यू यांच्या संख्येबाबत तफावत का? धारावीत रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. प्रशासनाची पाठ थोपटली जात आहे. ते कौतुक कमी होऊ नये म्हणून मृत्यूसंख्या दडवली जात आहे का? मग धारावीसारखे प्रयत्न त्याच विभागातल्या माहीम-दादरमध्ये का होत नाहीत, असे प्रश्न निर्माण होत आहेत. तोच प्रश्न ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांच्या बाबतीत निर्माण होत आहे. ‘बेस्ट’ उपक्रमाकडून सांगितली जाणारी मृत्यूसंख्या निश्चित असेल, तर कामगार संघटनेकडून दावा करण्यात येत असलेली मृत्यूसंख्या उपक्रमाने खोडून काढायला हवी. पण, तसे होत नाही. त्यामुळे या प्रकरणातील संदिग्धता वाढत जात आहे. त्यामुळे संशयाला बळकटी येत आहे.


- अरविंद सुर्वे
Powered By Sangraha 9.0