रझा अकादमीचा ‘इस्लाम खतरे में?’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2020
Total Views |

agralekh_1  H x


‘पैगंबराच्या सन्मानात मरण पत्करेल,’ असे म्हणणारी ‘रझा अकादमी’ आणि ‘जिहाद’साठी ‘फिदायीन’ हल्ले करण्यास प्रवृत्त होणार्‍यांत अजिबात फरक नाही. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘रझा अकादमी’चाही पैगंबराच्या सन्मानासाठी असेच काही करण्याचा उद्देश किंवा तयारी आहे का?



‘रझा अकादमी’ने रविवारी एक पत्रक प्रसिद्धीस देऊन प्रख्यात इराणी चित्रपट दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्या ‘मुहम्मद ः मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. मुंबईतील ‘डॉन सिनेमा’ या संस्थेकडे ‘रझा अकादमी’ने ही मागणी केली असून दि. २१ जुलै रोजी हीच संस्था डिजिटल माध्यमात हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे. ‘मुहम्मद ः मेसेंजर ऑफ गॉड’ हा चित्रपट इस्लामचे अखेरचे प्रेषित मोहम्मद पैगंबराच्या जीवनावर आधारित असून त्यात मोहम्मद पैगंबराला शिशुरुपात दाखवत त्याच्या आई-वडिलांचे चित्रण करण्यात आले आहे. ‘रझा अकादमी’च्या आक्षेपाचे कारण हेच असून, इस्लाममध्ये अल्ला किंवा पैगंबराच्या छायाचित्र, मूर्ती व चित्रीकरणाचा निषेध असल्याने र्ईशनिंदा करणार्‍या या चित्रपटावर बंदी घालावी, असे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात, ‘रझा अकादमी’ केवळ मागणी करुन थांबलेली नाही, तर आपल्या कुख्यात इतिहासाला साजेल अशा प्रकारे संघटनेच्या कर्त्याधर्त्यांनी हिंसाचाराचा इशाराही दिला, मात्र वेगळ्या शब्दांत! ‘रझा अकादमी’ने धमकी देत म्हटले की, ‘एक मुसलमान आपल्या पवित्र पैगंबराचा जरासाही अपमान पाहून वा ऐकून घेण्यापेक्षा त्याच्या सन्मानात मृत्यूला कवटाळील.’ ‘रझा अकादमी’ने वापरलेले हे शब्द अत्यंत आक्षेपार्ह आणि गंभीर असून त्याचा हेतू कायदा-व्यवस्था वार्‍यावर सोडत मुस्लिमांना हिंसाचारासाठी चिथावणी देणे हाच आहे. कारण, पैगंबराच्या सन्मानात मरण पत्करेल, असे म्हणणारी ‘रझा अकादमी’ आणि ‘जिहाद’साठी ‘फिदायीन’ हल्ले करण्यास प्रवृत्त होणार्‍यांत अजिबात फरक नाही. ‘फिदायीन’ हल्ले करणारेही इस्लामच्या सन्मानासाठीच बॉम्बस्फोट करत स्वतःला उडवून घेत असतात. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘रझा अकादमी’चाही पैगंबराच्या सन्मानासाठी असेच काही करण्याचा उद्देश किंवा तयारी आहे का? हा प्रश्न इथे उपस्थित होतो आणि त्याचे उत्तर होय, असेच द्यावे लागेल.

११ ऑगस्ट २०१२ रोजी ‘रझा अकादमी’ने मुंबईच्या आझाद मैदानावर म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांवरील कथित अत्याचाराविरोधात आंदोलन केले होते. मात्र, आंदोलनाचे रुपांतर हिंसाचारात झाले आणि ‘रझा अकादमी’च्या धर्मांध कार्यकर्त्यांनी दंगलीला सुरुवात केली, मुंबई पोलिसांवर हल्ला केला, महिला पोलिसांचा विनयभंग केला, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण केली व छत्रपती शिवाजी महाराज स्थानक परिसरात प्रचंड नासधुस केली. मात्र, ‘रझा अकादमी’चा कृतघ्नपणा, निर्लज्जपणा अथवा मूर्तिपूजेला विरोध म्हणा, पण या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानातील अमर जवान ज्योतीचीही तोडफोड केली, सैनिकांच्या स्मारकावर लाथा घातल्या. हा प्रकार कोणत्याही तयारीशिवाय कसा असू शकेल आणि म्हणूनच ‘रझा अकादमी’ने ‘मुहम्मद ः मेसेंजर ऑफ गॉड’च्या निमित्ताने दिलेल्या धमकीचा विचार केला पाहिजे. तसेच ‘रझा अकादमी’ला आपणच सच्चे मुसलमान असल्याचे दाखवून द्यायचे आहे का, हा प्रश्नही निर्माण होतो. कारण ‘मुहम्मद ः मेसेंजर ऑफ गॉड’ हा चित्रपट इराण या कट्टरपंथी इस्लामी देशात, माजिद माजिदी या इस्लामी दिग्दर्शकाने, ए. आर. रहमान या इस्लामी संगीतकाराने तयार केला.

तरीही इराणध्ये कोणीही याविरोधात फतवा काढलेला नाही. पण, ‘रझा अकादमी’ स्वतःला इराणपेक्षाही कडवा मुस्लीम समजते आणि म्हणूनच तिने या चित्रपटाला विरोध केला. इथे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, इराण इस्लाममधील शियापंथीय देश आहे, तर रझा अकादमी सुन्नीपंथीय मुस्लिमांची संघटना आहे. सुन्नींच्या दृष्टीने शियापंथीय काफिरच, म्हणजे इराणही काफिरच आणि त्यामुळे हा चित्रपटही काफिरांनीच तयार केलेला, म्हणूनही ‘रझा अकादमी’ त्याच्यावर बंदीची मागणी करत असेल. तथापि, ‘रझा अकादमी’ने चित्रपटावर बंदीची मागणी करुनही अभिव्यक्तिस्वातंत्र्याची वकिली करणार्‍यांनी या चित्रपटाचे समर्थन केलेले नाही. ‘पद्मावत’, ‘लैला’, ‘सेक्सी दुर्गा’ वगैरे चित्रीकरणांवर हिंदूंनी आक्षेप घेतला, तेव्हा हीच मंडळी अभिव्यक्तिस्वातंत्र्याची प्रवचने देत होती. ज्यांना अडचण असेल त्यांनी हे चित्रपट वा मालिका पाहू नका, असे सांगत होते, मग तोच न्याय ‘मुहम्मद ः मेसेंजर ऑफ गॉड’ चित्रपटालाही का लावला जात नाही? तर त्याचे कारण एकच तेव्हा मुद्दा हिंदू समाजाचा होता आणि आता शांतीप्रिय समाजाचा!

दरम्यान, ‘रझा अकादमी’ने बंदीची मागणी केली ती ‘डॉन’ सिनेमाचे मालक महमूद अली या मुस्लीम व्यक्तीकडे. पण, मागणीला प्रतिसाद मिळाला तो ‘बारामती’ की ‘बाबरमती’च्या साहेबांचे खास अनिल देशमुख यांच्याकडून! गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘रझा अकादमी’ची ‘इस्लाम खतरे में’ची बांग ऐकली आणि ताबडतोब केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठवत सदर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. म्हणजेच, अनिल देशमुखांना सदर चित्रपट प्रदर्शित झाला तर कायदा-व्यवस्था बिघडण्याची धमकी देणार्‍या ‘रझा अकादमी’चा कळवळा आला आणि त्यातून त्यांनी केंद्राला पत्र लिहिले. पण, याच अनिल देशमुखांना मुंबईजवळच्या पालघरमध्ये दोन हिंदू साधूंची जमावाने हत्या केली तरी बोलायलाही सवड नव्हती. साधूंच्या हत्याकांडाला तीन महिने होऊन गेले, दरम्यानच्या काळात सत्यशोधन अहवालही प्रसिद्ध झाले आणि त्यात या हत्येमागे कोण, याबाबतच्या धार्मिक कारणांचा तपशीलही समोर आला. मात्र, अनिल देशमुखांना ते दिसत नाही, म्हणून त्यांचे सरकार न्यायालयात साधूंच्या हत्येमागे धार्मिक कारण नाही, असे सांगते.

तसेच त्यानंतर मुंबईतील मशिदीवरील भोंग्यांच्या कर्कश्श आवाजावरुन घडलेल्या करिश्मा भोसले प्रकरणाकडे आणि नुकत्याच काही स्टॅण्डअप कॉमेडियन्सच्या छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू राम आणि सीता, गणपतीवरील अभद्र विनोदांकडे, त्यावरील तक्रारींकडे पाहायलाही गृहमंत्र्यांना वेळ नसतो. मात्र, तेच गृहमंत्री ‘रझा अकादमी’ने ‘डॉन सिनेमा’च्या मालकाला दिलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेतात. इथेच अनिल देशमुख, त्यांचा पक्ष आणि विद्यमान सत्ताधार्‍यांचे लाडके कोण, हे स्पष्ट होते. हिंदूंच्या देवी-देवतांची, श्रद्धास्थानांची कितीही खिल्ली उडवली तरी आम्ही शांतच बसणार, पण मुस्लिमांनीच तयार केलेल्या चित्रपटाविरोधात कोणी ‘इस्लाम खतरे में’ची आरोळी ठोकली रे ठोकली की, आम्ही दाढ्या कुरवाळायला सज्ज, असा हा देशमुखी कारभार आहे. अर्थात, मुख्यमंत्रीच जिथे ‘रझा अकादमी’च्या सदस्यांशी चर्चा करण्यासाठी मान तुकवतात, तिथे गृहमंत्रीही तसेच काहीतरी करणार म्हणा! विद्यमान सरकारच्या आधी गेली पाच वर्षे भाजप-शिवसेना युतीचे राज्यात सरकार होते. मात्र, त्या काळात ‘रझा अकादमी’सारख्या विघातक तत्त्वांना डोके वर काढण्याची हिंमत झाली नव्हती. आताचे सरकार येऊन सात महिने झाले नाही, तोच ‘रझा अकादमी’ने आपले अस्तित्व धमकी देण्याच्या पद्धतीने दाखवून दिले आणि गृहमंत्र्यांनीही त्यांचे म्हणणे ऐकले. आता या सगळ्याचा अर्थ काय तो, ज्याचा त्याने लावला पाहिजे.
@@AUTHORINFO_V1@@