आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांबाबत तीन देशांशी चर्चा सुरु : हरदीपसिंग पुरी

16 Jul 2020 19:22:11

hardeepsingh puri_1 

नवी दिल्ली : नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी वंदे भारत अभियानाची माहिती देण्यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असणारी आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत त्यांनी महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, कोविडपूर्वी होणाऱ्या देशांतर्गत उड्डाणांपैकी ५५ ते ६० टक्के उड्डाणे दिवाळीपर्यंत सुरू होतील." पुरी यांनी सांगितले की, "फ्रान्स एअरलायन्स १८ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू तसेच पॅरिससाठी २८ उड्डाणे चालविणार आहेत. याशिवाय १७ ते ३१ जुलै दरम्यान अमेरिकन एअरलाइन्सची १८ उड्डाणे भारतात येणार आहेत.




विमान वाहतूक मंत्री म्हणाले की, या व्यतिरिक्त जर्मन एअरलाइन्सनेदेखील भारताकडे उड्डाणे चालविण्यास परवानगी मागितली आहे. यावर काम सुरू आहे. २३ मार्चपासून देशात कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. पुढे ते म्हणाले, "आम्ही असे गृहीत धरत आहोत की जागतिक महामारी कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापूर्वी देशांतर्गत हवाई वाहतुकीपैकी ५५ ते ६० टक्के देशांतर्गत उड्डाणे यंदा दिवाळीपर्यंत सुरू होतील." वंदे भारत अभियानाबाबत पुरी म्हणाले की, "या अभियानाअंतर्गत आतापर्यंत दोन लाख ८० हजार भारतीयांना परदेशातून परत आणले गेले आहे. दुबई आणि युएईमधून मोठ्या संख्येने भारतीयांना घरी आणले गेले. त्याचवेळी अमेरिकेतून ३० हजार भारतीयांना या मोहिमेअंतर्गत मायदेशी परत आणण्यात आले आहे."
Powered By Sangraha 9.0