पायलट पुन्हा ‘उड्डाण’ करणार

    दिनांक  16-Jul-2020 20:40:59   
|vicharvimarsh_1 &nbs


तूर्त जरी राजस्थानच्या गेहलोत सरकारवरील ग्रहण सुटले असले तरीही सचिन पायलट हे संधी मिळताच पुन्हा ‘उड्डाण’ करून गेहलोत सरकारचा घास घ्यायची संधी अजिबात सोडणार नाहीत.काही वर्षांपूर्वी म्हणजे २०१४पूर्वी काँग्रेसची सूत्रे राहुल गांधींकडे देण्याची जोरदार चर्चा सुरू होती. पक्षाध्यक्ष नसले तरीही पक्षावर ‘गांधी’ असल्याने काँग्रेस पक्षावर राहुल यांचे वर्चस्व होते. त्यातच मग राहुल गांधी यांना तरुणांचे नेतृत्व म्हणून पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू होते. तेव्हा अगदी गाजावाजा करून ‘टीम राहुल’ असा शब्दप्रयोग ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, प्रिया दत्त, जितीन प्रसाद, मिलिंद देवरा आदी नेत्यांसाठी वापरला जात होता. मात्र, २०१४ आणि २०१९च्या पराभवाने राहुल गांधी यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच राहुल गांधी यांचे अतिशय विश्वासू समजले जाणारे आणि जवळचे मित्र असणारे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. सिंधिया भाजपमध्ये गेल्याने २०१८साली मिळालेली मध्य प्रदेशची सत्ताही काँग्रेसला गमवावी लागली. तेव्हाच काँग्रेसचे धुरीण सावध झाले असते, तर कदाचित राजस्थानचे नाट्य टाळता आले असते. मात्र, मनोबल पुरते खचलेल्या काँग्रेसपुढे आता हतबल होण्यावाचून दुसरा पर्यायच उरलेला नाही, असे स्पष्ट दिसते.काँग्रेस पक्ष २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून पुरता भांबावला होता. कारण, २०१४च्या लोकसभेपासूनच भाजपची घोडदौड राज्य विधानसभांमध्येही पाहावयास मिळाली होती. मात्र, असे असतानाही २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये सत्ता मिळाली होती. मध्य प्रदेशात अगदी निसटती सत्ता मिळाली असली तरीही राजस्थानात ठोस बहुमत काँग्रेसला मिळाले होते. राजस्थानात यश मिळण्यामागे सचिन पायलट या युवा नेत्याचा फार मोठा वाटा होता. राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ताबदलाचा पॅटर्न असला तरीही काँग्रेसला त्या राज्यात एक नवा आणि आश्वासक चेहरा देण्यात पायलट यांना यश आले होते. कारण, राजस्थानात वसुंधरा राजे हे मोठे प्रस्थ, त्यांच्या प्रभावातून गलितगात्र झालेल्या काँग्रेसला सत्ता प्राप्त करून देण्याची कामगिरी पायलट यांनी साधली होती.


त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा पायलट यांना निर्माण होणे साहजिकच होते. बहुमताचा आकडा गाठल्यानंतर एकीकडे पायलट दिल्लीत ‘१२ , तुघलक क्रिसेंट’ या राहुल गांधी यांच्या घरात बसले होते, तर दुसरीकडे अशोक गेहलोत ‘२३, मदर तेरेसा क्रिसेंट’ या अहमद पटेल यांच्या निवासस्थानी बसले होते. दोन्हीही नेते मुख्यमंत्रिपदासाठी आपापली दावेदारी कशी योग्य आहे, हे अनुक्रमे राहुल गांधी आणि अहमद पटेल यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते. योगायोगाने त्यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा यांच्या मनात तिन्ही राज्यांमध्ये नवे चेहरे देण्याचा विचार होता. त्यामुळे पायलट आणि सिंधिया यांना आपल्यालाच मुख्यमंत्रिपद मिळणार याची खात्री होती. मात्र, राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी अखेर मुरब्बी अशोक गेहलोत यांनीच बाजी मारली, त्यासाठी त्यांना बहुसंख्य आमदारांचे समर्थन आपल्यालाच असल्याचा हुकमी एक्का पक्षनेतृत्वासमोर टाकला (आणि त्यात तथ्य असल्याचे आज सिद्ध झाले आहेच). आणि अखेर अशोक गेहलोत यांच्या गळात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकताना पायलट यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. अर्थात, त्यासाठी राहुल गांधींसह सोनिया गांधी आणि प्रियांका यांनीही पायलट यांच्याशी संवाद साधून त्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास भाग पाडले.

मात्र, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोघांसाठीही ही एक तडजोड होती. कारण, दोघांमध्ये फारसे सख्य कधीच नव्हते. त्यात माझ्या कामांमुळे राजस्थानात सत्ता आल्याचा पायलट यांचा दावा गेहलोत यांना कधीही रुचत नव्हता. त्यामुळे नाईलाजाने शासनाचा कारभार चालत असला तरीही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्ही नेते सोडत नव्हते. पक्ष संघटनेत किंवा अन्य ठिकाणी आपापल्या निष्ठावंतांच्या नेमणुका करण्याचा सपाटा दोघांनीही चालविला होता. त्यात मुख्यमंत्रिपद हाती असल्याने अशोक गेहलोत जमेल तेथे पायलट यांच्या निर्णयांना आडकाठी करीत होते, तर दुसरीकडे पायलट मुख्यमंत्र्यांना न जुमानता मनमानी कारभार करीत होते. त्यामुळे वरवर पाहता राजस्थानात सर्व काही आलबेल असल्याचे चित्र असले तरीही सरकार आणि पक्षसंघटनेत मोठ्या प्रमाणात नाराजी वाढण्यास सुरुवात झाली होती.


अखेर पायलट यांच्या नाराजीनाट्याने बंडखोरीचे रूप घेतले. सुरुवातीला ३० आमदार सोबत असल्याचे चित्र पायलट यांच्याकडून निर्माण करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्यासोबत १० आमदार तरी आहेत की नाही, याविषयी शंका आहे. कारण, गेहलोत यांच्या चालीमुळे बहुसंख्य आमदारांनी गेहलोत यांच्यासोबतच राहणे तूर्तास तरी पसंत केले आहे. त्यातच राहुल गांधी यांच्या ‘ज्याला पक्ष सोडायचा आहे, त्याने खुशाल सोडावा,’ या विधानामुळे काँग्रेस हायकमांड आता पायलट यांच्या बंडास फारशी किंमत देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, पायलट यांच्यात सध्या तरी सरकार पाडण्याची क्षमता नाही, हे काँग्रेसच्या ध्यानात आले आहे. त्यामुळे पायलट यांचे खच्चीकरण करण्यासाठी काँग्रेसने त्यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काढून टाकले, सोबतच त्यांचे समर्थक आमदारांनाही डच्चू दिला. पक्षसंघटनेतील पायलट समर्थकांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे तसे पाहिले तर आता पायलट पूर्णपणे एकटे पडले आहेत. पायलट यांना खरेतर राहुल गांधी यांच्याकडून नेतृत्वबदलाची अपेक्षा होती. कारण, राहुल यांच्या सांगण्यावरूनच नाईलाजाने त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले होते. तेव्हा त्यांनी आपली नाराजी दाबून धरली होती. त्यामुळे आता तरी राहुल गांधी आपल्याला न्याय देतील, ही त्यांची अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही.


दरम्यानच्या काळात गेहलोत यांनी पायलट यांच्या गेल्या सहा महिन्यांतील कथित पक्षविरोधी कारवायांचे, भाजपसोबत जवळीक साधण्याच्या प्रयत्नांचे एक ‘डोसियर’ काँग्रेस हायकमांडकडे सुपूर्द केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे पायलट यांच्या बंडास महत्त्व न देण्याचे काँग्रेसने सुरुवातीपासूनच ठरविले असणार, यात शंका नाही. ‘अशोक गेहलोत म्हणजे आरोग्य सेतू अ‍ॅप्लिकेशनप्रमाणे आहे, ते नेहमीच अलर्ट असतात’ असे गेहलोत यांचे राजस्थानातील एका काँग्रेस नेत्याने केलेले वर्णन सत्य असल्याचेच सिद्ध झाले आहे. कारण, पायलट यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद होते, त्या काळात त्यांना स्वत:चा प्रभाव राज्यात वाढविण्याचा प्रयत्न केला असला तरीही गेहलोत यांच्याएवढे त्यांचे वर्चस्व निर्माण झालेले नाही, हेदेखील यानिमित्ताने पुढे येत आहे. त्यामुळे तूर्त तरी गेहलोत यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याने तरुण तुर्क सचिन पायलट यांना चितपट केल्याचे दिसते.


मात्र, असे असले तरीही खेळ अद्याप संपलेला नाही. काँग्रेसच्या राजकारणाचे अभ्यासक असलेले ज्येष्ठ पत्रकार राशिद किडवई यांच्या मते, “सचिन पायलट हे एवढ्यात हार मानणार नाहीत. पायलट यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मोठ्या प्रमाणात ‘इगो’ असला, तरीही ते विवेकबुद्धीने विचार करणे कधीही सोडत नाहीत. मात्र, आता त्यांचा ‘इगो’ काँग्रेसने दुखावला आहे. त्यामुळे ते आता योग्य वेळेची वाट पाहतील.” अर्थात, त्यांच्याकडे मोजकेच पर्याय आहेत, पहिला म्हणजे सर्व काही विसरून काँग्रेसमध्ये परत जाणे, दुसरा पर्याय म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करणे आणि तिसरा पर्याय म्हणजे स्वत:चा पक्ष स्थापन करणे. मात्र, तिसर्‍या पर्यायात त्यांना अपरिहार्यपणे भाजपची मदत घ्यावीच लागणार आहे. त्यामुळेच पायलट सध्या अगदी शांतपणे आपले पत्ते टाकत आहेत. कोणत्याही प्रकारचे आततायी विधान करणे त्यांनी टाळले आहे. त्यामुळे पायलट यांच्या मनातील विचारांचा नेमका अंदाज बांधणे कठीण आहे. त्यामुळे सध्या जरी काँग्रेसने आपले सरकार वाचविले असल्याचे चित्र असले तरीही भविष्यात पायलट यांचा तडाखा बसू शकतो, यात शंका नाही. अर्थात, पायलट यांच्यासाठी तिसरा पर्याय फारसा सोपा नाही, कारण मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांच्या राजकारणाचा बाज वेगळा आहे. तेथे दक्षिणेतील राज्ये अथवा प. बंगालप्रमाणे एकाच व्यक्तीचा करिष्मा प्रभावी ठरू शकत नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी किंवा जगनमोहन रेड्डी यांच्याप्रमाणे काँग्रेसला आव्हान देऊन स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणे तुलनेने पायलट यांना कठीण आहे.


या सर्व प्रकारातून नेहमीच बोलली जाणारी एक गोष्ट पुन्हा पुढे आली आहे, ती म्हणजे काँग्रेसचे घसरलेले मनोबल आणि आत्मविश्वास. कारण, २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव पक्षाला जिव्हारी लागला असला तरीही त्यासाठी १०वर्षांचे सरकार, ‘अ‍ॅण्टिइन्कम्बन्सी’ अशी कारणे देण्यात आली. मात्र, २०१९चा पराभव काँग्रेसला अद्यापही विसरता आलेला नाही. कारण, २०१९ची निवडणूक ही ‘राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी’ अशी थेट झाली होती. त्यात खुद्द राहुल गांधींच्या झालेल्या पराभवाने पक्ष पुरता खचला आहे. त्यामुळे पक्षात पुन्हा एकदा ‘ज्येष्ठ नेते विरुद्ध तरुण नेते’ असा संघर्ष सुरू आहे. अर्थात, काँग्रेसच्या या परिस्थितीविषयी अनेकांनी अनेकदा लिहिले आहे, त्यातूनही धडा घ्यायची काँग्रेसची इच्छा नसल्यास पक्षाची पडझड पाहत राहणे, एवढेच काँग्रेसजनांच्या हाती उरणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.