गुंतवणूक गुगली..

    दिनांक  16-Jul-2020 20:10:20   
|

Google CEO _1  
’गुगल’ने भारतात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांनी याविषयीची अधिकृत घोषणा केली. ‘गुगल’ भारतात पुढील सात-आठ वर्षांत साधारणतः ७५ हजार कोटी इतके पैसे गुंतवेल. साधारणतः एक अब्ज डॉलर इतकी रक्कम पुढील काही वर्षांत ‘फॉक्सकॉन’ भारतात गुंतवण्याच्या बेतात आहे.‘फॉक्सकॉन’ या कंपनीला मोबाईल निर्मितीच्या निविदा मिळत असतात. ‘गुगल’द्वारे जी गुंतवणूक आणली जाणार आहे, त्याला तर ‘इंडिया डिजिटलायझेशन फंड’ म्हटले जाते आहे. थोडक्यात जगाच्या डिजिटल अर्थकारणात भारत आता गुंतवणूकदारांचे आकर्षण ठरतोय का? तसेच डिजिटल अर्थकारण देशाच्या आर्थिक उन्नतीत भरीव योगदान देऊ शकणार का, याबाबतीतही भारत केवळ बाजारपेठेच्याच भूमिकेत राहणार? ‘गुगल’च्या घोषणेचा आनंद कितपत साजरा व्हायला हवा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक शोधली पाहिजेत.माहिती-तंत्रज्ञानाने साधलेली प्रगती म्हणजे चौथी औद्योगिक क्रांती आहे, अस म्हणतात. रूढार्थाने सतराव्या शतकापासून पहिली औद्योगिक क्रांती झाली व टप्प्याटप्प्याने आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. परंतु, ज्या प्रकारचे स्थित्यंतर पहिल्या व दुसर्‍या औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात घडवले होते, तितका मोठा धक्का डिजिटल क्रांतीने दिलेला नाही. त्यातील आर्थिक आयाम विशद करायचे म्हटले तर काही बाबी लक्षात येतात. पहिली/दुसरी औद्योगिक क्रांती ही वस्तूंच्या व्यापाराशी/ उत्पादनाशी संबंधित होती. डिजिटल क्रांती ही सेवाक्षेत्राशी संबंधित आहे.


तसेच डिजिटल क्रांतीने माणसाचे जीवन आहे, त्यापेक्षा अधिक सुखकर केले. मात्र, त्यात मूलगामी बदल घडवला असे म्हणता येणार नाही. उदाहरण म्हणून आपण वाफेच्या इंजिनाला विचारात घेऊ. वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यामुळे माणसाला जो प्रवास करायला पूर्वी १० तास लागत होते, तोच प्रवासाचा टप्पा वाफेच्या इंजिनामुळे दोन तासांत गाठणे शक्य झाले. डिजिटल क्रांतीने त्याचे तिकीट आरक्षण, नोंदणी आदी काम सोपे केले आहे.


थोडक्यात मानवाच्या अडचणी, अडथळे, गैरसोयी दूर करण्यात डिजिटल क्रांतीने भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे जसे मानवी जीवनावर सतराव्या-अठराव्या शतकात मोठे परिणाम झाले, तसे आता होणे शक्य नाही. डिजिटल क्रांतीमुळे नव्याने कामगार वर्ग तयार झाला, असेही नाही. कामगारांमध्ये एक नवा वर्ग तयार नक्की झाला आहे. वेगवेगळ्या स्वरूपाची कामे करणारे कामगार वर्ग डिजिटल क्रांतीने गिळंकृत केले. जीवनावर मोठ्या प्रमाणात भौतिक बदल झालेले नसले तरीही गतिमानता वाढवण्यात डिजिटलायझेशनचा हात नक्कीच आहे.त्यामुळे डिजिटलचे अस्तित्व सर्वत्र असले तरीही अर्थव्यवस्था त्याने व्यापून टाकली आहे, असे म्हणता येणार नाही. उद्योगविश्वाचा विचार केला तर डिजिटल उद्योग कमी ग्राहकसंख्येत तग धरणे कठीण आहे. कारण, सेवेचा मोबदला प्रचंड मर्यादित आहे. भाव वाढवायचे म्हटले तर प्रतिस्पर्धी येऊन बाजारपेठ ताब्यात घेण्याची शक्यता जास्त. भांडवलवादी विचार केल्यास सेवाक्षेत्रात नवे उद्योग सुरू करणे सोपे असते. त्यामुळे स्पर्धा भयंकर आहे. भारताचे वैशिष्ट्य की, भारतात ६०-६५ कोटी लोक इंटरनेट वापरू लागले. इतर काही देशांतील लोकांची बेरीज केली तर हा आकडा येऊ शकेल. दुसर्‍या बाजूला भारताने डिजिटल माध्यमांना दिलेले स्वातंत्र्य महत्त्वाचे ठरते.चीन, पाकिस्तान यांसारख्या देशात हेच स्वातंत्र्य उपभोगता येत नाही. म्हणून भारतात ‘गुगल’सारख्या कंपन्यांना गुंतवणूक करावीशी वाटते. परंतु, पहिल्या-दुसर्‍या औद्योगिक क्रांतीत जसे उत्पादन केंद्रस्थानी होते, तसे डिजिटल बाबतीत माहिती आणि तंत्रज्ञान केंद्रस्थानी असेल. त्यावर मालकी त्यांचीच असणार आहे. भारतात ‘गुगल’ची गुंतवणूक येते ही आनंदाची बातमी. पण, भारत या सगळ्यात केवळ बाजारपेठेच्या भूमिकेतच असणार की माहिती व तंत्रज्ञानाचा मालक होणार, याचाही विचार केला पाहिजे. जर आपण निर्मितीच्या भूमिकेत जाण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली तर ही गुंतवणूक अधिक फायद्याची ठरेल!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.