राष्ट्रवादीतर्फे नियुक्तीसाठी अधिकृत 'वसुली'

15 Jul 2020 12:37:21

NCP_1  H x W: 0

 
 
 
 
पुणे : राज्य सरकारतर्फे पुण्यात मुदत संपलेल्या ७५० ग्रामपंचायतींमध्ये एक प्रशासक नेमण्याची तरतूद केली आहे. मात्र, प्रशासक पदावर नियुक्ती व्हावी यासाठी अर्ज करत असताना पक्षाला ११ हजारांचा पक्षनिधी द्यावा लागेल, अशी अट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे यांच्यातर्फे घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे नियुक्त असणाऱ्या प्रशासकाच्या नेमणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ११ हजारांचा निधी का द्यावा, असा प्रश्न आता विचारला जात आहे. 
 
पुण्यात १ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकूण ७५० ग्रामपंचायती आहेत. संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातर्फे या प्रत्येक ग्रामपंचायतीत एक प्रशासक नेमावा, असे आदेश राज्य सरकारतर्फे देण्यात आले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयातर्फे प्रत्येक ग्रामपंचायतीत असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी एक अर्जाची प्रत दि. १४ जुलै रोजी करण्यात आली आहे. यात अर्जदाराला त्याचे नाव, पदाचा अनुभव, लोकसभा व विधानसभा मतदार संघ यांच्यासह अन्य तपशील फोटोसह भरायचा आहे. मात्र, या अर्जासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खात्यात जमा केलेल्या ११ हजार रुपये रोख रक्कमेचा पुरावाही जोडायचा आहे, असे पत्रक पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी काढले आहे. 
 
 
 
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धनकवडी शाखेच्या खात्यात इच्छुक उमेदवारांनी ही रक्कम वर्ग करण्याची विनंती केली आहे. प्रशासन नियुक्त उमेदवारासाठी पक्षाला ११ हजारांची रक्कम का द्यावी, असा प्रश्न या पत्रकाबद्दल उपस्थित केला जात आहे. तसेच ७५० ग्रामपंचायतींवर प्रत्येकी एक प्रशासक नेमायचा म्हटल्यास ८२ लाख ५० हजार इतकी रक्कम एक उमेदवाराकडून वर्ग केली जाऊ शकते, तसेच या प्रकरणी गारटकर यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही. 




NCP
NCP
 
 
Powered By Sangraha 9.0