उन्नत शतायुष्याची मंगलमय यात्रा...

15 Jul 2020 21:16:45

acharya _1  H x





‘पश्येम शरदः शतम्।’ म्हणजेच आम्ही शंभर वर्षांपर्यंत ईश्वरीय बीजतत्त्वाला ज्ञानदृष्टीने पाहावे! सामान्य लोकांप्रमाणे किंवा पशूंप्रमाणे केवळ डोळ्यांनी पाहणे नव्हे, तर सूक्ष्मदृष्टिकोनातून त्या त्या भगवद्निर्मित वस्तूंमध्ये दिव्यत्वाचे दर्शन करावे. वस्तू किंवा पदार्थांच्या अंतरंगात काय दडले आहे, यावर विवेकशक्तीने अवलोकन करावे. अशा या असामान्य पाहण्यालाच ‘दर्शन’ असे नाव पडले आहे.
 


 
तच्चक्षुर्देवहितं पुरस्ताच्छुक्रमुच्चरत्।
पश्येम शरद: शतं जीवेम शरद: शतम्।
श्रुणुयाम शरद: शतं प्रब्रवाम शरद: शतम्।
अदिना: श्याम शरद: शतं भूयश्च शरद: शतात्।
(यजुर्वेद-३६/२४ , ऋग्वेद-७/६६/१६)




अन्वयार्थ


(तत्) त्या उपास्य (चक्षु:) संपूर्ण जगाचे मार्गदर्शक नेत्र असलेल्या परमेश्वराने (पुरस्तात्) अगोदरच, पूर्वीच (देवहितं) दिव्य शक्तींना प्रेरणा देणार्‍या, सर्व विद्वानांचे हित साधणार्‍या (शुक्रम्) मूलभूत बीजशक्तीला (उच्चरत्) अंकुरित केले आहे, उगविले आहे. त्यांना आम्ही (शरद: शतम्) शंभर वर्षांपर्यंत (पश्येम) पाहत राहावे. त्या ज्ञानरुपी बीजशक्तींना विकसित करावे (शरद: शतम् ) शंभर वर्षांपर्यंत (जीवेम) त्या ज्ञानशक्तीला जीवनाचे अंग बनवावे, जगत राहावे. (शरद: शतम्) शंभर वर्षांपर्यंत त्या ईश्वरीय वेदज्ञानाला (श्रुणुयाम) ऐकत राहावे. (शरद: शतम्) शंभर वर्षांपर्यंत (प्र ब्रवाम) वैदिक ज्ञान-विज्ञान सांगत राहावे. (शरद: शतम्) शंभर वर्षांपर्यंत आयुष्यभर (अदिना: स्याम) कोणाच्याही आधीन न राहाता जगावे (भूयश्च) आणि पुन्हादेखील (शरद: शतात्) शंभर वर्षांहूनही अधिक वर्षे जगावे.



विवेचन

समग्र विश्वाचा निर्माता प्रभू परमेश्वर आणि त्याचे अपूर्व ज्ञान व कर्म! त्याची सृष्टीव्यवस्थासुद्धाही परिपूर्णच! ‘सर्वज्ञानमयो स:।’ म्हणजेच तो भगवंत सर्व प्रकारच्या ज्ञान-विज्ञानाने भरलेला आहे. त्याने आज नव्हे, तर अगदी सृष्टीच्या प्रारंभीच सार्‍या ब्रह्मांडामध्ये आपली बीचशक्ती अंकुरित केली आहे. निसर्गातील त्याचे सारे जड पदार्थ व चेतन तत्त्वे ही मानव व इतर प्राण्यांकरिता जगण्याची मोलाची साधने आहेत. नवनवे संशोधन करून त्या त्या साधनांपासून आणखीन काहीतरी नित्य नूतन असे उत्तमोत्तम सृजन करायचे की असलेल्याही बिघडवायचे, हे मात्र माणसाच्या हातात आहे. 


कारण, तो कर्म करण्यात स्वतंत्र आहे. जग हे तर पूर्वीच बनले आहे. मानवाच्या बुद्धीतदेखील सुप्त विचारांची पेरणी त्या ईश्वराकडे पूर्वीच झालेली आहे. या दोन्हींचा योग्य तो विनियोग करून त्यापासून आपल्याला काहीतरी नवे घडवावे लागेल आणि त्याकरिता तशा प्रकारचा प्रयत्नही करावयास हवा. उपरोक्त मंत्रातील पहिले चरण हे ईश्वराच्या कार्याचा बोध करून देते, तर त्यानंतरचे संपूर्ण चरण हे मानवाच्या कर्तव्याचा संकेत करते. त्याकरिता ईश्वरासाठी ‘चक्षु:’ हा शब्द मंत्रात आला आहे. ‘चक्षु’ म्हणजे दीर्घकालीन भविष्यदृष्टा किंवा दूरदृष्टा होय. नेत्र, नयन, अक्षी, डोळा हेदेखील या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. चक्षु हा सर्व इंद्रियांचा नेता (नयन-नयति आणि) आहे. 


कारण, तो सर्वांचे दिशा दर्शन करतो. इतर इंद्रियांना मार्ग दाखवितो. तसेच त्यांना नेहमी सुरक्षितरित्या पुढे नेतो. या एकाच चक्षु इंद्रियांच्या नेतृत्वाखाली सारे शरीर कार्य करते. परमात्मा हा संपूर्ण विश्वाचा सर्वोत्तम नेता म्हणजे चक्षु! तो समग्र देवतांचे (दिव्य तत्त्वांचे) नेतृत्व करतो. सर्वांनाच नवी दृष्टी देतो. समग्र प्राणिमात्रांचे हित साधतो. तसेच सर्व चेतन तत्त्वांना सतत प्रेरणा प्रदान करतो. अशा या प्रभावशाली नेत्याने म्हणजेच चक्षुरुप परमेश्वराने सर्वात अगोदर बीजशक्तीला जन्माला घातले आहे. त्याच्यामुळेच सर्वत्र बीज अंकुरते. हे पहिले कार्य त्या भगवंताने अतिशय सुयोग्य रीतीने पार पाडले आहे. त्याची कृती ही अर्धवट नसून परिपूर्ण आहे. 

अशा या सृष्टी तत्वातील बीजशक्तीला जीवात्म्याने म्हणजेच मानवाने विकसित करण्यासाठी प्रयत्न करावयास हवा. कारण, कर्म व भोग या दोन्हींचा सुरेख संगम केवळ मानवात आहे. ही दोन्ही कामे त्याने बुद्धी व ज्ञानपूर्वक करावयास हवी. कारण, याच अमृतपुत्राकरिता पितारूप भगवंताने समग्र विश्वाचे बहुतेक पदार्थ आणि ज्ञान तत्त्वांचे सृजन केले आहे. या सर्वांना उपभोगण्याचा अधिकारी केवळ मात्र माणूस होय. शास्त्रांमध्ये याच मानवाकरिता ‘इंद्र’ या शब्दानेदेखील संबोधले आहे. इंद्र म्हणजे ऐश्वर्यसंपन्न असा ‘नरश्रेष्ठ’ होय. समग्र जगायला जिंकण्याचे सामर्थ्य याच मानवामध्ये आहे. म्हणूनच तो सर्वांचा राजा होय. इतर पशुपक्ष्यांना तो अधिकार अजिबात मिळालेला नाही. कारण, ते केवळ भोगयोनीतील आहेत. आता परमेश्वराने दिलेल्या बीजरुप जड व चेतन पदार्थांना कसे उपभोगायचे, हे मात्र मानवाला ठरवायचे आहे. कारण, हा त्याचा अधिकार आहे.


त्या विधात्याने तर या सृष्टीत प्रत्येक वस्तूला बीजरूपाने उत्पन्न करून ते कर्मशील अशा मानवासमोर ठेवले आहे. त्याने आपले पहिले कार्य अतिशय उत्कृष्टरित्या केले आहे. पाहा, या जगाकडे! यातील सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, पृथ्वी, समुद्र, नद्या, पर्वत आणि त्यातच पुन्हा सुंदर व मनमोहक असे वृक्ष, लता, वेली, विविध वनस्पती, निरनिराळे धान्य आणि त्यापासून मिळणारी फुले, फळे इत्यादी किती बहारदार आहे सर्व काही? या सर्वांमध्ये अपूर्णता नव्हे, तर पूर्णताच आढळते. भगवंताच्या या प्रथम कार्यानंतर त्याचा विस्तार करण्याचे उत्तरदायित्व मानवावर घेऊन पडते. आपल्या बुद्धीवैभवाच्या बळावर त्याला यात आणखीन भर घालावयाची आहे, पण तीदेखील ईश्वराच्या नियमात राहूनच, अन्यथा दुर्बुद्धीने त्याच्या नियमांचा भंग केला, तर त्याचा दंड मिळाल्याशिवाय राहणार नाही. याकरिता मंत्रातील उर्वरित विस्तीर्ण असे चरण माणसाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणारे आहे.


‘पश्येम शरदः शतम्।’ म्हणजेच आम्ही शंभर वर्षांपर्यंत ईश्वरीय बीजतत्त्वाला ज्ञानदृष्टीने पाहावे! सामान्य लोकांप्रमाणे किंवा पशूंप्रमाणे केवळ डोळ्यांनी पाहणे नव्हे, तर सूक्ष्मदृष्टिकोनातून त्या त्या भगवद्निर्मित वस्तूंमध्ये दिव्यत्वाचे दर्शन करावे. वस्तू किंवा पदार्थांच्या अंतरंगात काय दडले आहे, यावर विवेकशक्तीने अवलोकन करावे. अशा या असामान्य पाहण्यालाच ‘दर्शन’ असे नाव पडले आहे. यातूनच भारतीय दर्शन शास्त्रांचा उगम झाला. आधुनिक काळात यालाच ‘तत्त्वज्ञान’ किंवा ‘फिलॉसॉफी’ असेही म्हणतात. याच दर्शन परंपरेत न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, वेदांत, मीमांसा या भारतीय सहा शास्त्रांचा समावेश होतो. हेच ते आस्तिक षड्दर्शन होत. म्हणून आपले पाहणे हे पवित्र, शुद्ध, सूक्ष्म आणि महतत्त्वांचा बोध देणारे असावे. तेही थोडेथोडके नव्हे तर शंभर वर्षांपर्यंतचे! आपले ऋषिमुनी व योगीजन हे बाह्यचक्षूंपेक्षा अंतश्चक्षूंनी पाहत असत. म्हणूनच ते अध्यात्म क्षेत्रातील प्रख्यात संशोधक व शास्त्रज्ञ ठरले.


पुढे म्हटले आहे, जीवेम शरदः शतम्। आम्हाला शंभर वर्षांंपर्यंत जगायचे आहे. जगणे म्हणजे काय केवळ कसेही खाणे-पिणे? कोणत्याही मार्गाने धन कमविणे? मौज करणे किंवा झोपा काढणे? इथपर्यंतच सीमित राहणे, याला जगणे म्हणत नाहीत. असे जगणे तर पशुपक्षीदेखील जगतात. महाभारतात म्हटले आहे - ‘आहार, निद्रा, भय, मैथुन या चार गोष्टी पशू आणि मानव यांच्यात समान आहेत. फक्त धर्म हेच तत्त्व माणसांमध्ये अधिक आहे, जे की त्याला पशूंपासून वेगळे करते!’ म्हणून धर्माचरण, दान, परोपकार, दया, सत्चरित्र, सद्गुण या उत्तम बाबींचा अंगीकार करत भगवंताच्या बीजरूप शक्तीशी एकरूप होत आणि सृष्टीतत्त्वांना व नियमांना जीवनाचे अंग बनवीत शंभर वर्षे जगावे, असाच या मागचा भाव आहे.


मंत्रातील ‘श्रुणुयाम शरदः शतम्।’ आणि ‘प्रब्रवाम शरदः शतम्।’ यांचाही भाव असाच व्यापक आहे. सामान्यपणे केवळ एक दुसर्‍याचे सांसारिक विषय ऐकत राहावे आणि इतरांशी गप्पागोष्टी करत किंवा इकडचे काहीतरी बोलत राहावे, असा संकुचित अर्थ इथे अजिबात अपेक्षित नाही, तर आम्ही वेदशास्त्रात व धार्मिक ग्रंथात वर्णिलेले मानवी जीवनाच्या शाश्वत कल्याणासाठीचे तत्त्वज्ञान, शास्त्रातील मौलिक उपदेश, पवित्र व सत्यज्ञान ऐकत राहावे आणि तेच आम्ही आमच्या मुखाने इतरांना सांगत व बोलत राहावे आणि तेदेखील शंभर वर्षांपर्यंत! असे हे आपले जगणे पराधीन होऊन दीनवाणे नको, ते तर स्वाभिमानाचे, आदर्श व इतरांकरिता प्रेरणा देणारे असावे. याकरिता मंत्रात ‘अदिना: स्याम शरद: शतम्।’ असा संदेश शेवटी दिला आहे. असे जर पवित्र व श्रेष्ठ कार्य मानवाकडून होणार असेल, तर वेदांनी शंभर वर्षांची मर्यादा ओलांडून तिच्याही पुढे जात शताधिक्य आयुष्य जगण्याचे मान्य केले आहे. कारण, या उदात्त जगण्यातून समाज, देश, राष्ट्र व विश्वाचे सर्वांगीण कल्याण साधण्याचा महान उद्देश दडला आहे.
- - प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य




Powered By Sangraha 9.0