निसर्ग चक्रीवादळानंतर मंडणगडमध्ये प्रथमच गिधाडांचे दर्शन

    दिनांक  14-Jul-2020 19:40:44
|
vultures _1  H

 

 
वादळानंतर गिधाडे परतू लागली
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कोकण किनारपट्टीला बसलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर प्रथमच मंडणगड तालुक्यात आज गिधाडांचे दर्शन घडले. शिपोळे बंदरानजीक खाडीजवळ ही गिधाडे एका मृत जनावराच्या शरीराजवळ आढळून आली. स्थानिकांच्या मते, साधारण तीस वर्षांनंतर मंडणगड तालुक्यात गिधाडे आढळून आली आहेत.
 
 

vultures _1  H  
 (छायाचित्रे - मोहन उपाध्ये) 
 
 
गेल्या महिन्यात कोकण किनारपट्टीवरील रायगड - रत्नागिरीला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका इथल्या पक्षीवैभवाला बसला होता. रायगड जिल्ह्यातील म्हसाळा आणि श्रीवर्धन तालुक्याच्या आसपासच्या क्षेत्रात गिधाडांचा अधिवास आहे. यापरिसरात पांढऱ्या पाठीची आणि लांब चोचीची गिधाडे आढळतात. नारळ, आंबा, पुनई (जंगली बदाम), साकवीण, वनभेंड, अर्जुन यांसारख्या मोठ्या झाडांवर ते वास्तव्य करतात. मात्र, निसर्ग चक्रीवादळामुळे गिधाडांची घरटी नष्ट झाल्याचे निरीक्षण 'सिस्केप' संस्थेच्या कार्येकर्त्यांनी नोंदवले होते. त्यानंतर आता ही गिधाडे पुन्हा एकदा या परिसरात परतू लागली आहेत.
 
 
 
 
 
आज सकाळी मंडणगड तालुक्यातील शिपोळे बंदराजवळील खाडीनजीक काही गिधाडे वेळासचे कासवमित्र मोहन उपाध्ये यांना आढळून आली. पांढऱ्या पाठीची चौदा ते पंधरा गिधाडे याठिकाणी मृत बैलाचे शरीर खात असल्याची माहिती त्यांनी दिली. मंडणगड तालुक्यातील या परिसरात साधारण तीस वर्षांपूर्वी गिधाडांची घरटी होती. मधल्या कालावधीत गिधाडांचे दर्शन झाले नव्हते. मात्र, आज मृत जनावराचे शरीर खाण्याच्या निमित्ताने ही गिधाडे याठिकाणी आल्याचे त्यांनी सांगितले. 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.