सेवाकार्याचा महामार्ग

14 Jul 2020 22:58:32

सेवाकार्याचा महामार्ग_1&n


सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संकटाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सेवाभावाच्या माध्यमातून बंधुभावाचा आदर्श वस्तुपाठ निर्माण केला आहे. टाळेबंदीच्या काळात अडकलेले ट्रकचालक, तसेच रस्त्याने पायी जाणारे मजूर यांना आपुलकीपूर्ण मदतीचा हात देत त्यांच्या अतीव दु:खावर फुंकर घालण्याचे काम केले आहे. रा. स्व. संंघ नाशिक शहर मुख्य मार्ग प्रमुख विशाल पाठक, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष व रा. स्व. संघ मुख्य मार्ग मंडळ सदस्य राजेंद्र फड, नाशिक विभगाचे मुख्यमार्ग संयोजक पंकज वाकटकर आदींशी चर्चा केल्यावर या सेवाकार्यामागील भावविश्व सहज जाणवते.



लॉकडाऊन’ जाहीर झाल्यावर ट्रकचालक हे ट्रक टर्मिनल्समध्ये दाखल झाले. त्यांना रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून सुरूवातीच्या काही दिवसांत १,१५० अन्नाचे डबे व त्यानंतर शिधावाटप करण्यात आले. पहिल्या ‘लॉकडाऊन’चा कालवधीपर्यंत पुरेल इतके शिधावाटप या काळात करण्यात आले. पहिल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात पायी चालणार्‍या मजुरांची संख्या कमी होती. या पायी चालणार्‍या मजुरांची विचारपूस केल्यावर कळले की, हे नाशिक जिल्ह्यातील मजूर असून त्यांना काम संपल्याने आता त्या ठिकाणी राहू दिले जात नव्हते. रोजंदारीवर काम करणारे मजूर असल्याने शिल्लक अशी काही रक्कम त्यांच्या पाठीशी नव्हती. संघाच्या स्वयंसेवकांना या मजुरांच्या डोळ्यात अपेक्षा सहज दिसून आली. त्यानंतर दुसर्‍या दिवसापासून रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे अनिल चांदवडकर, विशाल पाठक, सुभाष जांगडा, महावीर मित्तल, सुनील बुरड आदींसह स्वयंसेवक यांनी ठरविले की, प्रवाशांसाठी रा. स्व. मुख्य मार्ग विभाग आणि रा. स्व. संघ जनकल्याण समिती यांच्या माध्यमातून अन्न व पाण्याचे वाटप करण्यात यावे.


त्यानुसार १३ दिवसांत २,६००च्या आसपास पायी चालणार्‍या प्रवाशांना अन्न व पाण्याचे वाटप करण्यात आले. मेच्या सुरुवातीच्या कालखंडात पायी चालणार्‍या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने सुरुवातीला प्रा. प्रशांत पाटील यांच्या मदतीने शिजवलेले अन्न व पाणी याची व्यवस्था करण्यात आली. वाढणारे प्रवाशी लक्षात घेता, त्यानंतर स्वतंत्र किचनची व्यवस्थादेखील करण्यात आली. तुळशीराम जोशी यांच्या अंबड येतील हॉटेलमध्ये हे किचन स्थापित करण्यात आले होते. फूड पाकीट वाटप करताना राजूरपाटी येथील गुरुद्वाराचे प्रमुख बाबुजी आणि त्यांचे सुपुत्र हरविंदर सिंग आणि हरणीत सिंग यांच्याशी चर्चा केल्यावर तेथील गुरुद्वारातदेखील किचन चालू करण्यात आले. संघाच्या कामामुळे आधीपासूनच सेवाकार्यात कायम सक्रिय असणार्‍या गुरुद्वारालादेखील सेवाकार्याची सक्षम साथ मिळाली. जेव्हा स्वयंसेवकांनी या मजुरांशी संवाद साधला, बसून मरण्यापेक्षा चालून मरणे योग्य अशी मानवतेला आव्हान देणारी प्रतिक्रिया या मजुरांची होती. चप्पल नसलेल्या लोकांनी पाण्याच्या बाटल्या कापून त्या पायात अडकविल्या होत्या. वयस्कर धाय मोकलून रडत होते. अशा विदारक स्थितीत या मजुरांच्या पाठीवर अन्नपाण्याच्या मदत रूपाने मायेचा हात फिरवला गेला तो संघ स्वयंसेवकांच्या रूपाने.



highway helpinghands_1&nb
याबाबत राजेंद्र फड यांनी सांगितले की, ”घरात ८०वर्षांची आई आहे. त्यामुळे संसर्गाच्या भीतीने घरच्यांचा या कामाला विरोध होता. त्यामुळे मी दोन दिवस काम थांबविले. मात्र, काम थांबविल्याने अस्वस्थता जाणवू लागली, त्यामुळे पुन्हा काम सुरु केले. लोकांच्या व्याकुळ नजरेतील कृतज्ञता जीवनाचे सार्थक करणारी वाटली.” विशाल पाठक सांगतात की, ”राज्य सरकारने या लोकांकडे दुर्लक्ष केल्याचे सहज दिसून आले. राज्य सरकार कल्याणकारी धोरण आखू शकले नाही. मजुरांना पोलिसांची भीती वाटत नाही का ? असे विचारले असता पोलिसांची भीती आम्ही का बाळगू, व्यवस्था कसली नाही, पोलीस तुरूंगात टाकतील तर तिथे खायला तरी मिळेल. अशी भावना लोकांची हेाती.”

या कार्यात स्वयंसेवकांना जाणवलेले काही अनुभव हे मनाला समाधान देणारे आहेत. त्यातील काही प्रसंग म्हणजे गुरुद्वारात एक सज्जन ताकाचे पाऊच वाटप करत होते, त्यावेळी लोकांच्या चेहर्‍यावर उमटलेले समाधानाचे भाव हे अवर्णनीय होते. घोटी टोल नाक्यापासून रा. स्व. संघ मुख्य मार्गचे कार्यकर्ते किरण फलटणकर, बाळासाहेब सुराणा, तर घोटी येथील वैभव कुमट, महेंद्र तातेड यांनी संपूर्ण ‘लॉकडाऊन’ काळात स्वतः घरुन चहा बनवून आणत त्याचे वाटप केले. नांदेड येथील महिला प्रसूत झाली. असता संघ स्वयंसेवकांनी बहिणीच्या नात्याने शुश्रूषा करून त्या महिलेस नांदेड येथे स्वगृही पाठविले. असे काही अनुभव हे सेवाकार्याचे समाधान देणारे आहे. लोकांनी धन्यवाद दिलेच. मात्र, त्या धन्यवादापेक्षा माणूस म्हणून मिळालेले समाधान हे जीवनात महत्त्वाचे वाटत असल्याचे भाव संघ स्वयंसेवकांच्या मनी आहेत.


जोड माणसांची, निराकरण समस्येचे

चांदवड तालुक्यातील दिघवद येथील स्वयंसेवक बाबासाहेब गांगुर्डे (गुरुजी) यांनी सुरगाणा तालुक्यातील वलगाव येथूक विंचूर येथे पायी जाणार्‍या दाम्पत्याची स्थिती अनुभवली. हे दाम्पत्य पटेल यांच्या शेतात काम करत होतेे. त्यांना संपर्क साधून गाडी पाठविण्याची विनंती केली. माणसे जोडल्याने दु:खितांचे अश्रू सहज पुसता येतात हेच यावरून दिसून येते. याशिवाय चांदवड तालुक्यात मास्क वापराबाबत जनजागृती करणे, शिधावाटप करणे, चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील गुरुद्वाराच्या माध्यमातून पायी जाणार्‍या मजुरांना जेवण देण्यात आले. तसेच, याकामी येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज संयुक्त शाखेच्या स्वयंसेवकांनी साधन सामग्री संकलित करणे व वाटप करणे यात मोलाची भूमिका बजावली.

-बाबासाहेब गांगुर्डे, रा. स्व. संघ मालेगाव जिल्हा सहकार्यवाह


मजुरांमध्ये दिसून आली समज

सिन्नर-घोटीच्या डोंगराळ भागात मजुरी करणारे काही लोकांचा तांडा हा पिंपळगाव बसवंत भागातून मार्गस्थ होत होता. त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी ’मदत नको’ असे सांगितले. कारण, त्यांना ओझर येथे संघविचारांचे अनुसरण करणार्‍या काही नागरिकांनी मदत केली होती. त्यामुळे आवश्यक तितकीच मदत ते घेत आहेत, हे लक्षात आले. संघ स्वयंसेवक म्हणून प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन या काळात काम करता आले. त्यामुळे समाजातील जागरुकता अनुभवता आली. समाजाशी संवाद साधला, तर अडचणींवर मात करता येते. हेच यावरून दिसून आले.

- अरुण मोरे, रा.स्व.संघ जिल्हा सहकार्यवाह, नाशिक ग्रामीण


‘लॉकडाऊन’ सुरू झाले. कामधंदे ठप्प पडले आणि मजुरांचे स्थलांतर सुरू झाले. या सगळ्यांच्या समस्या मोठ्या होत्या. संघ स्वयंसेवक म्हणून या समस्याविषयी सर्वतोपरी काम करण्याचे ठरवले. या मजुरांना अन्न तसेच इतर सुविधा देण्याचा आपण प्रयत्न केला. अन्नवितरण करणे, शिधा वाटप करणे, आरोग्याच्या सेवा पुरवणे यासाठी मदत केली. हे सगळे करण्यासाठी आर्थिक मदत उभी करणे हेदेखील काम होते. पण मालेगाव संघ स्वयंसेवकांनी हे आव्हान पेलले. सेवाभावी संस्थांचे कार्य तर अतुलनीय आहे. कोरोना काळात आपत्ती आली. मात्र, त्याचवेळी समाजातील शुभ सकारात्मक शक्तीचाही परिचय झाला.

- गंगाधर पगार, जिल्हा बौद्धिक प्रमुख,मालेगाव
Powered By Sangraha 9.0