मनोरंजन अगेन : अभिनेत्री सायली संजीव ‘डबिंग’साठी स्टुडीओत हजर!

    दिनांक  14-Jul-2020 18:23:08
|

sayalee_1  H xअनलॉकचे नियम पाळत आगामी चित्रपट ‘गोष्ट एका पैठणीची’च्या डबिंगला सुरुवात!


मुंबई : राज्य शासनाकडून मनोरंजन क्षेत्राला टप्प्याटप्प्याने काम सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाने पूर्णत्त्वाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या चित्रपटातील कलाकारांकडून सर्व नियमांचे पालन करून, काळजी घेऊन डबिंग सुरू करण्यात आले आहे. नुकतेच अभिनेत्री सायली संजीवने आपले डबिंग पूर्ण केले.


प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे या चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकार आपल्या भेटीस येणार असून अन्य कलाकार मंडळींची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.


कोरोना विषाणू संसर्गापूर्वी गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. मात्र लॉकडाऊनमुळे पोस्ट प्रॉडक्शनचे काम करता येत नव्हते. मात्र आता शासनाकडून काही प्रमाणात निर्बंध शिथिल करून काम करण्यास परवानगी दिली जात आहे. त्यामुळे चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन सुरू झाले आहे. चित्रपटातील कलाकार काळजी घेऊन डबिंग करत आहेत. त्यामुळे आता लवकरच या चित्रपटाचे उर्वरित तांत्रिक कामही पूर्ण होऊन हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज होईल.


काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसादही मिळाला होता. पैठणीच्या एका हळूवार स्वप्नाची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.