नाते जुळले शब्दांशी...

11 Jul 2020 23:09:32

vividha_1  H x


‘नवोदित कवी’ म्हणून नावारूपास आलेल्या आणि एक यशस्वी कवयित्री म्हणून ज्यांची वाटचाल सुरु आहे, अशा नवी मुंबईतील कल्पना देशमुख यांचा ’नाते जुळले शब्दांशी’ हा चारोळी संग्रह साहित्य क्षेत्रातील ’साहित्य संपदा’ या संस्थेने डिजिटल स्वरूपात नुकताच प्रकाशित केला आहे.



निसर्ग, प्रेम, विरह आणि अशा विविध विषयांवर आणि भावनांवर आधारित असा हा चारोळी संग्रह आहे.आपल्या जीवनात ’प्रेमाला’ किती महत्त्व आहे, हे या चारोळी संग्रहाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. ’नाते जुळले शब्दांशी’ या चारोळी संग्रहाची सुरुवातच मुळी आपल्या प्रेमाची आठवण करून देणारी आहे. रात्र झाली आहे, कदाचित मध्यरात्रही झाली असेल. रातराणीचा सुगंध सर्वत्र पसरला आहे, या अशा धुंद वातावरणात त्याच्या आणि तिच्या मनातील भावना कवयित्रीने किती छान टिपल्या आहेत, हे समजण्यासाठी ’रातराणी गंधाळलेली’ ही चारोळी वाचलीच पाहिजे. खरं तर चारोळीला शीर्षक असे नसतेच. पण, या ओळीचा उल्लेख केवळ समजण्यासाठीच.अशाच काही प्रेमभावना व्यक्त करणार्‍या चारोळ्यांबरोबरच प्रेमभंगाच्या धक्क्याचे वर्णन करणार्‍या काही चारोळ्यांतून आपल्याला त्या प्रेमिकांच्या भावना समजून घेता येतील. ’त्याच्या आणि तिच्या’ प्रेमात पडल्यापासून प्रेमभंगापर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेम आणि विरह भावनांचे मुखदर्शन घडविणारे एक कथानकच आहे, असे म्हणता येईल.या चारोळी संग्रहाचा दुसरा भाग आहे निसर्ग आणि पाऊस. प्रेमा इतक्याच उत्कटतेने निसर्ग आणि पाऊस हे विषय कवयित्रीने हाताळले आहेत.


खळखळ वाहते नदी
गाते मंजुळ गाणे
आवडते मज तिचे
सागरात एकरूप होणे


अशी एखादी चारोळी वाचल्यानंतर ’ती’ नदी आणि ’तो’ समुद्र यांच्यातील प्रेमभावनेचे दर्शन पुन्हा एकदा घडते. ’निसर्गा’संबंधी त्यांनी व्यक्त केलेल्या भावना कवयित्रीने ज्या स्वरूपात, ज्या पद्धतीने व्यक्त केलेल्या आहेत, त्या लक्षात घेतल्या तर..

कोण चित्रकार तो
रंग भरतो सृष्टीत नवे


या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या चारोळ्यांतून मिळून जाते.निसर्ग आणि पाऊस यांचं अतूट नातं कवयित्रीने आपल्या चारोळ्यांतून कसं जपून ठेवलं आहे, हे आपल्याला या चारोळ्या वाचल्याशिवाय समजणार नाही.’तो’ पाऊस आणि पाऊस अनुभवणारी ’ती’ याचं सुरेख वर्णन पावसाळी चारोळ्यांतून अनुभवता येईल. पावसाच्या चारोळ्या तशा मोजक्या असल्या तरी त्या मनाला भिडणार्‍या आहेत.पावसाविषयीच्या भावना आणि अपेक्षा व्यक्त करताना ’सार्‍यांनाच तू हवा असतोस’ पण कसा तर.. या अपेक्षा पुढील चारोळीत दिसून येतात.


’शांतपणे जलधारा बरसविणारा
प्रेमी, शेतकरी ते सामान्यजन
पृथ्वी लोकांस जीवनदान देणारा
या चारोळी संग्रहाचा तिसरा भाग पहिल्या दोन भागांपेक्षा काहीशा वेगळ्या वाटेवरचा आहे. या भागातील प्रत्येक चारोळीमधून कवयित्रीने काहीतरी सुचवले आहे. त्यांचं हे सुचवणं किंवा काही जाणिवांची आठवण करून देणं म्हणजे एकप्रकारचे संदेशच आहेत. आपण संदेश वगैरे काही देण्याइतपत मोठे नाही, या एका शुद्ध ’कल्पनेनं’ या चारोळ्यांची मांडणी करताना या संग्रहाच्या पृष्ठरचनेकडे विशेष लक्ष दिल्याचे लक्षात येते. प्रत्येक पृष्ठाची रंगसंगती आणि चारोळीला योग्य अशी चित्रसंगतीची जोडणी ही या पृष्ठरचनेच्या सजावटीची वैशिष्ट्ये आहेत. याचे श्रेय मनोमय मीडियाला दिलंच पाहिजे.

- तृप्ती पवार
Powered By Sangraha 9.0