सत्य काय आहे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2020   
Total Views |

india_1  H x W:



युद्धाची सिद्धता कायम ठेवली पाहिजे, त्यात ढिलाई ठेवता कामा नये. येथे नेहरुनीती कामाची नाही. पण, चीन आपल्या आध्यात्मिक, सांस्कृतिक कुळातील देश आहे, हेदेखील विसरता कामा नये. शत्रुत्व कराल तर आमची गदा आहे आणि हृदयाचे नाते जोडणार असाल, तर सहकार्याचा आमचा हात आहे. मला वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच नीतीचे पालन करीत आहेत.



गलवान खोर्‍यातील चकमकीला आता तीन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. या तीन आठवड्यांत या घटनेवर भाष्य करणार्‍या लेखांचा सर्वत्रच पाऊस पडला. दुसरीकडे, राहुल गांधी आणि कंपनी घटनेचे राजकीय भांडवल करण्यात मग्न आहेत. पण, त्यांच्या प्रश्नांची आणि वक्तव्यांची गंभीरपणे दखल घेण्याचे काहीएक कारण नाही. देशाच्या सुरक्षेपेक्षा स्वार्थाची राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल, हे दाखविणारी त्या मंडळींची वक्तव्ये आहेत. ज्या घराण्याने चीनला भारताचा शेकडो चौरस किलोमीटर प्रदेश देऊन टाकला, त्यांच्या वक्तव्याला काही अर्थ राहत नाही. ‘केलेल्या पापांना आधी उत्तर द्या, मग बोला,’ हेच त्यांना उत्तर आहे. चीनबरोबरचा सीमावाद हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, त्यामुळे तो निश्चितच गंभीर आहे. भारत आणि चीनचे संबंध दोन-अडीच हजार वर्षांपासूनचे आहेत. या दोन-अडीच वर्षांत, १९६२चा अपवाद सोडला, तर दोन्ही देशांनी परस्परांवर कधी आक्रमण केलेले नाही. १९६२साली चीनने भारतावर आक्रमण केले. भारताचा काही मुलूख बळकावला. त्यानंतर चीनविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले. जवळजवळ गेल्या साठ वर्षांत सीमेवर छोट्यामोठ्या चकमकी होत राहिल्या. गलवानसारखी चकमक यापूर्वीही झाली होती आणि त्यात दोन्ही बाजूचे सैन्य मारले गेले होते. भारताचा परंपरागत शत्रू पाकिस्तानशी चीनचे दोस्तीचे संबंध आहेत. काराकोरम पर्वत आणि पाकव्याप्त काश्मीरमधून चीन हायवे (सीपेक) बांधण्याचे काम करीत आहे. दक्षिण चिनी समुद्र, हिंदी महासागरातही अधूनमधून चीनची दादागिरी चालूच असते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चीनची भूमिका भारतविरोधी असते. यामुळेदेखील चीनविषयी अविश्वासाचे वातावरण तयार होते.




अशा वातावरणात चीनविषयी आपली भूमिका आणि धोरण काय असावे, यावर सल्ल्यामागून सल्ले दिले जातात. काही जण चीनची लष्करी ताकद आणि भारताची लष्करी ताकद याची तुलना करतात. चीनकडे किती लाख खडे सैन्य आहे, किती हजार विमाने आहेत, नौदल कसे सशक्त आहे, चीनकडे अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब किती आहे आणि त्यापुढे भारताचे संख्याबळ किती कमी आहे, हे सांगितले जाते. पण, कोणतेही युद्ध हे संख्याबळावर जिंकता येत नाही, हे या (एक्सपर्ट) लोकांच्या लक्षात येत नाही. प्लासीच्या लढाईत सिराजउद्धौल्ला याच्याकडे 50 हजार सैन्य होते आणि इंग्रजांकडे केवळ पाच हजार सैन्य होते. तरीही सिराजउद्धौल्ला लढाई हरला. अशा अनेक जागतिक लढाया आहेत, ज्या कमी संख्याबळ असलेल्या सैन्याने जिंकल्या आहेत. त्यामुळे या आकडेवारीला अर्थ नाही.




काही जण सांगतात, चीनशी शत्रुत्व करु नये. चीनची आर्थिक शक्ती आपल्यापेक्षा अफाट आहे. त्याचा विकासाचा दर दहा टक्के आहे. चीन, जगाला पुरवठा करणारी, बाजारपेठ झाली आहे. केवळ भारतातच नाही, तर जगात असंख्य देशात चिनी वस्तूंचा सुळसुळाट झालेला आहे. इथेही भारताची चीनशी तुलना केली जाते. भारत चीनच्या किती मागे आहे, याची आकडेवारी दिली जाते. नकारात्मक चित्र रंगविण्यात अनेक बुद्धिवाद्यांना धन्यता वाटते. भारताची आर्थिक शक्ती केवळ त्याच्या उत्पादनक्षमतेत नाही, ती त्याच्या काटकसरीच्या राहणीत आहे, पैशाच्या बचतीत आहे, गरजांवर नियंत्रण ठेवण्यात आहे, ही भारताची जीवनशैली आहे. तिच्याशी मुकाबला केवळ आर्थिक आकडेवारीने होऊ शकत नाही. आणखी काही जणांचे म्हणणे असे आहे की, नेहरुंच्या चुका मोदींनी करु नयेत. चीनने ‘अक्साई चीन’वर दावा केला होता. तेव्हाचे चिनी पंतप्रधान चौ एन लाय यांनी नेहरुंशी तशी बोलणी केली. नेहरुंनी ते मानले नाही आणि 1962 साली चीनचे आक्रमण झाले. चीनचे काही दावे आपण स्वीकारले पाहिजेत, असेही सल्ले लोक देतात. अशी एकूण चीन आणि भारत यांची आताची स्थिती आहे. राजकीय लोकांपासून ते एक्सपर्ट लोकांपर्यंत प्रत्येक जण आपापल्या चष्म्यातून पाहत असतो. चीन भारत संबंधांकडे बघण्याचा आणखी एक दृष्टिकोन आहे, त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.




अमेरिकेतील एका चिनी राजदूताने काही वर्षांपूर्वी असे म्हटले की, रक्ताचा एक थेंबही न सांडता भारताने चीनला जिंकले. त्याला असे म्हणायचे आहे की, इसवी सनाच्या पहिल्या शतकात ‘सिल्क रुट’च्या मार्गे अनेक बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. चिनी राजांनी त्यांचे स्वागत केले आणि भगवान गौतम बुद्धांचा मैत्री, करुणेचा धर्म स्वीकारला. भारतीय बौद्ध धर्माला चिनी साज चढवला. चीनचा परंपरागत विचार ‘टाओइझम’चा आहे. त्याचा आणि बौद्ध विचार यांचा संघर्ष झाला नाही, त्याचा समन्वय करण्यात आला. भगवान गौतम बुद्धांनी जीवंत असताना कसे वागायला पाहिजे, याची शिकवण दिली आहे. जग नित्य परिवर्तनशील आहे. कोणतीही गोष्ट आहे त्या स्थितीत कायम राहत नाही. म्हणून अशा गोष्टींच्या मोहात पडू नये. याबद्दल एका चिनी बौद्ध गुरुची कथा आहे. त्यांच्याकडे एक पिता आपल्या मुलाची तक्रार घेऊन येतो. मुलगा वैश्येच्या नादी लागला असून तिच्यावर तो संपत्ती लुटत आहे, त्याला त्यापासून परावृत्त करा, अशी त्याने गुरुंना विनंती केली. बौद्ध गुरु मुलाच्या घरी जातात. मुलगा त्यांचे स्वागत करतो. त्यांना भोजन देतो. विश्रांती झाल्यानंतर ते परत जायला निघतात. मुलाला काही उपदेश करीत नाहीत. आपल्या गवताच्या चपलेचे बंद त्यांना बांधता येत नाहीत. ते मुलाला म्हणतात, “मी आता म्हातारा झालेलो आहे. शरीरातील शक्ती गेलेली आहे. चपलेचे बंद बांधून देतोस का?” मुलगा ते बांधूनही देतो. ‘दिवसभरात गुरुजी एवढे बोलले. माझेही तारुण्य संपणार आहे, माझेही वय होणार आहे, माझ्याही शक्तीचा र्‍हास होईल,’ असा विचार करुन तो वैश्येचा नाद सोडतो. ही घटना चीनमध्ये घडली म्हणून याला ‘चिनी कथा’ असे म्हणायचे, परंतु ही कथा भारतीय जीवनमूल्यांची आहे.




चीन सैनिकी शक्ती आहे, नाविक शक्ती आहे, आर्थिक शक्ती आहे, तशीच चीन ही आध्यात्मिक शक्ती आहे. ‘कम्युनिझम’मुळे ती थोडी काळवंडली गेली असेलही. परंतु, गौतम बुद्धांचा सिद्धांत लावायचा तर नामरुपात्मक काहीही शाश्वत राहत नाही. चीन हा भारतीय आध्यात्मिक, सांस्कृतिक कुळातील देश आहे, हेदेखील लक्षात ठेवायला पाहिजे. चीन म्हणजे इराक, इराण, तुर्कस्तान नव्हे. गेल्या १५ ते २० वर्षांतील सांस्कृतिक संबंध आणि करार बघितले तर या दिशेने सकारात्मक पावले दोन्ही देशांनी टाकली आहेत, असे लक्षात येईल. नरेंद्र मोदी चीनला गेले असता बौद्ध मंदिराला त्यांनी भेट दिली. मंदिरातील प्रमुख बौद्ध भिक्खूंनी त्यांना गौतम बुद्धांची सोन्याची मूर्ती दिली. ’चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग, बौद्ध भिक्खू, त्यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेली बुद्धांची सोन्याची मूर्ती’ हा फोटो तेव्हा व्हायरल झाला. युद्धाची सिद्धता कायम ठेवली पाहिजे, त्यात ढिलाई ठेवता कामा नये. येथे नेहरुनीती कामाची नाही. पण, चीन आपल्या आध्यात्मिक, सांस्कृतिक कुळातील देश आहे, हेदेखील विसरता कामा नये. शत्रुत्व कराल तर आमची गदा आहे आणि हृदयाचे नाते जोडणार असाल, तर सहकार्याचा आमचा हात आहे. मला वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच नीतीचे पालन करीत आहेत.


याचे सुखद दर्शन चीनचे भारतातील राजदूत सूनवेईडाँग यांच्या एका व्हिडिओ संदेशात बघायला मिळते. गलवान खोर्‍यात त्या रात्री जे काही झाले, तो भारतीय जवानांसोबतचा विश्वासघातच होता. चीनच्या सैनिकांनी असा गनिमी हल्ला करायला नको होता. कारण, यामुळे भारताच्या मनात चीनविषयी अविश्वासाची भावना निर्माण झाली. हे वक्तव्य आणखी मोठे आहे, आता त्यावर भाष्यांचा भडिमार होईल. ‘चीन आपल्याला गाफील ठेवू इच्छित आहे,’ ‘चीनच्या मनात असे नाही,’ ‘वक्तव्याने हुरळून जाण्याचे कारण नाही’ वगैरे वगैरे. असे उलटसुलट विचार आले की सत्य काय आहे, हे समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा चिनी कथेचा आधार घ्यावा लागतो. चिनी बौद्ध भिक्खूचे प्रवचन झाले. दोन शिष्यांमध्ये वाद सुरू झाला. एक म्हणाला, “गुरुजींना असे असे सांगायचे आहे.” दुसरा म्हणाला, “तू चुकतोस, त्यांच्या म्हणण्याचा हा अर्थ नाही.” दोघेही गुरुजींकडे जातात. पहिला म्हणतो की, “गुरुजी, तुम्हाला प्रवचनात असे असे सांगायचे होते ना.” गुरुजी म्हणाले, “एकदम बरोबर.” तो खूश झाला आणि गेला. दुसरा म्हणाला की, “याचे म्हणणे एकदम चूक आहे. तुम्हाला असे असे म्हणायचे होते ना?” गुरुजी म्हणाले, “एकदम बरोबर.” तोही आनंदाने निघून गेला. गुरुजींबरोबर तिसरा शिष्य बसला होता. तो गुरुजींना म्हणाला, “या दोघांचे म्हणणे एकमेकांच्या विरोधी आहे, मग ते दोघेही बरोबर कसे असतील?” गुरुजी त्याला हसून म्हणाले, “तूही बरोबर आहेस.” सत्य काय आहे, हे गुरुजींनाच माहीत होते. चीन-भारत संबंधातील सत्य काय आहे हे चीन आणि भारताचे राज्यकर्तेच जाणून आहेत आणि हे दोघेही बौद्ध भिक्खूप्रमाणे शांत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@