मराठी सिनेमांमध्ये तरुण-तडफदार नायक, बेरकी खलनायक आणि चरित्र अभिनेता या तिन्ही भूमिका समर्थपणे साकारणारे कलावंत म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार.
मुंबईत आल्यानंतर एका कलाकाराला ‘एक माती अनेक नाती’ या चित्रपटात काम मिळालं. पण, पुढे मार्ग सापडत नव्हता. अखेर ते नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या संपर्कात आले. पणशीकर त्याचवेळेस ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकासाठी ‘संभाजी’च्या भूमिकेसाठी कलाकार शोधत होते आणि त्यांना या कलाकारामध्ये ‘संभाजी’ सापडला. त्यानंतर त्यांना एकामागोमाग एक नाटके मिळत गेली. मग रुपेरी पडद्यावर त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. चित्रपटात काम केल्यावर ते टीव्हीच्या छोट्या पडद्याकडेही वळले. ‘परमवीर’ ही त्यांची भूमिकाही रसिकांच्या स्मरणात राहिली. शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड असलेला, घरच्यांचा विरोध असतानाही हट्टानं मायानगरीत आलेला, तिथे खस्ता खात, धक्के सोसत जिद्दीनं वाटचाल करणारा, कुणीही ‘गॉडफादर’ नसताना आणि अनेक मातब्बर अभिनेते अवतीभवती असताना नाटक-सिनेमात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारा अस्सल कलावंत. नाटकाचा पडदा असो, टीव्हीचा पडदा असो किंवा ७० एमएमचा रुपेरी पडदा, सिनेमा ग्रामीण असो किंवा शहरी, भूमिका नायकाची असो वा खलनायकाची, ती त्यांनी अगदी चोख बजावली होती. अशा एकाहून एक सरस चित्रपट व नाटकांत अभिनय केलेले दिग्गज अभिनेते ‘परमवीर’ म्हणजे अर्थातच कुलदीप पवार.
कुलदीप पवार यांचा जन्म कोल्हापुरचा, व्यक्तिमत्व एकदम देखणे व रुबाबदार. त्यांचे वडीलही मराठी चित्रपटात लहानमोठ्या भूमिका करत होते. तीच आवड त्यांच्यातही निर्माण झाली. अभिनयातच कारकिर्द करायची हे ठरवून ते मुंबईला आले. काही काळ संघर्ष केल्यानंतर त्यांना नाटकात अभिनयाची पहिली संधी मिळाली. मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट तिन्ही माध्यमांतून त्यांनी यशस्वी अभिनय केला. कुठल्याही साच्यात त्यांनी स्वत:ला अडकवले नाही. नायक, खलनायक असो किंवा गंभीर, विनोदी असो किंवा ग्रामीण, शहरी असो सर्व प्रकारच्या, सर्व बाजाच्या भूमिका त्यांनी दमदार व समर्थपणे साकारल्या. ‘गोष्ट धमाल नाम्याची’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘वजीर’, ‘एकापेक्षा एक’, ‘सर्जा’, ‘शापित’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘जावयाची जात’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट, तर ‘अश्रूंची झाली फुले’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘रखेली’, ‘पाखरु’, ‘निष्कलंक’, ‘पती माझे उचापती’ ही त्यांची नाटके गाजली होती. कुलदीप पवार यांनी चित्रपटसृष्टीत येण्याआधी कष्टाचे जीवन पाहिले होते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या विविधांगी लोकांशी त्यांची नाळ जुळली गेली होती. लोकांच्या आवडीनिवडीचा त्यांचा अभ्यास होता. त्यामुळे वैविध्य जपत असतानाच कोणत्या प्रकारच्या भूमिका करायला पाहिजे, याचं एक ज्ञान त्यांच्या ठायी होतं. त्याचा वापर करून पुढे चित्रपट कारकिर्दीत त्यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
कुलदीप पवार हे मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रातलं एक मोठं नाव. हे नाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी अगदी घट्ट जोडलं गेलं होतं. त्यांचा सेटवरचा वावरही असाच काहीसा असायचा. ते जरी सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असले तरी समोरच्याला त्यांचा दराराच वाटत असे. तो दरारा केवळ त्यांच्या वयाचा, ज्येष्ठतेचा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नव्हता, तर त्यांनी या चित्रपटसृष्टीत केलेल्या कामाची ती मूक पावतीच होती. ही पावती त्यांना ते जात तिथे तिथे मिळत असे. त्यांच्यासाठी मात्र चेहर्यावरची बेफिकिरी तशीच राहत असे. आज कुलदीप पवार या जगात नाहीत, हे सांगूनही खरं वाटणार नाही. मराठी चित्रपटांचा एक काळ त्यांच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. काही काही अभिनेत्यांचं रूप असं असतं की, त्यांना कोणताही वेश चढवा ते त्यात शोभून दिसतात. कुलदीप पवार यांना अशा प्रकारची देहयष्टी लाभली होती. आपल्या या नैसर्गिक गुणांचा त्यांनीही चांगलाच उपयोग करून घेतला. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांच्या या देहयष्टीचा मोठा वाटा असायचा. ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकासाठी जेव्हा प्रभाकर पणशीकरांनी त्यांची निवड केली, तेव्हा त्यांच्याकडे या दोन महत्त्वाच्या बाबी होत्या. एक ही देहयष्टी व दुसरा ऐतिहासिक नाटकांना आवश्यक असलेला भारदस्त आवाज. मात्र, केवळ या दोन गोष्टींमुळेच ते मोठे अभिनेते झाले नाहीत. आपल्या अभिनयशैलीचे वारंवार निरीक्षण करून त्यात काळानुरूप बदल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
ऐतिहासिक नाटकांमधून जरी पदार्पण झाले असले तरी तो शिक्का आपल्यावर लागू नये, याचीही त्यांनी पुरेपूर दक्षता घेतली. त्यामुळे ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकानंतर त्यांनी विविधांगी नाटकांचा सपाटा लावला. ‘अश्रुंची झाली फुले’, ‘होनाजी बाळा’, ‘वीज म्हणाली धरतीला’ अशा नाटकांचे त्यांनी अनेक प्रयोग केले. त्यांच्या मुंबई-पुण्यातल्या प्रयोगांना जितका प्रतिसाद मिळत असे, तितकाच त्यांना
दौर्यांवरही मिळे. त्या काळात नाटकांचे दौरे करतानाही त्यांनी अनेक गोष्टी बारकाईने शिकून घेतल्या. महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांतात आढळणार्या बोलीचे सुक्ष्म रूपही त्यांनी अभ्यासले, पुढे त्याचा त्यांनी आपल्या चित्रपटातल्या भूमिकांसाठी उपयोग केला. आपण गंभीर भूमिकांच्या चौकटीत बंदिस्त होतोय की काय, असं वाटल्यावर त्यांनी तातडीने विनोदी नाटकांकडे आपला मोर्चा वळवला. ‘पती माझे उचापती’ या नाटकातली त्यांची विनोदी भूमिकाही लोकांना भावली, आवडली. त्यांच्या या विविधांगी भूमिकांची कीर्ती तत्कालीन चित्रपटसृष्टीपर्यंत गेली नसती तरच नवल! त्यातून त्यांना मग चित्रपटांच्या ऑफर्स यायला लागल्या.
अनंत माने यांच्या ‘दरोडेखोर’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका महाराष्ट्रातल्या व खासकरून ग्रामीण प्रेक्षकांना भावली. त्यांचं ते रांगडं रूप व कोणताही वेश धारण करण्याची त्यांची क्षमता या जोरावर त्यांनी ही भूमिका अक्षरश: लोकांच्या मनात उतरवली. ‘अरे संसार संसार’ या चित्रपटातला शेतकरी त्यांनी इतक्या शक्तिनिशी उभा केला की, त्यांच्या अभिनयाकडे परीक्षकांचंही लक्ष वेधलं गेलं. कुलदीप पवार यांना केवळ नशिबाने यश मिळालेलं नसून ते त्यांच्या मेहनतीचं फळ आहे, याची साक्ष महाराष्ट्राला मिळाली. ‘नायक’ म्हणून प्रस्थापित होत असतानाच त्यांनी ‘शापित’ या चित्रपटातला खलनायकही अगदी लीलया रंगवला. त्यांच्या काही खास लकबी व त्यांची संवादफेकीची अनोखी शैली याने मराठी चित्रपटातल्या खलनायकालाही एक वेगळं परिमाण लाभलं. पुढे त्यांनी अनेक वेगवेगळी पात्रं रंगवली. प्रत्येक भूमिकेला एक खास लकब व बोलण्याची एक खास शैली देण्याची त्यांची हातोटी चांगलीच लोकप्रिय झाली. मराठी प्रेक्षकांचा विचार करून मग त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात चालणारे चित्रपट केले. त्यांच्या ‘जावयाची जात’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘नवरे सगळे गाढव’, ‘गुपचुप गुपचुप’, ‘खरा वारसदार’ अशी एका पाठोपाठ एक चित्रपटाची फळीच निर्माण केली. त्यातही विनोदी, गंभीर, सामाजिक, शहरी, खलनायिकी अशा प्रकारच्या अनेक भूमिका त्यांनी केल्या.
आपल्या कारकिर्दीत ते चरित्रभूमिकांमध्येही काहीसे लवकर आले, त्यातही त्यांनी आपलं वेगळेपण जपलं. चित्रपट व खासकरून अभिनयकलेवर निस्सीम प्रेम असलेले कुलदीप पवार हे सतत काळाचा वेध घेत असत. दूरदर्शनच्या आगमनानंतर त्यांनी आपला मोर्चा छोट्या पडद्यावर वळवला. ‘आपण चित्रपटातले मोठे कलाकार आहोत, त्यामुळे आपण कशाला टीव्हीवर काम करायचं,’ असा अभिनिवेश त्यांनी बाळगला नाही. ‘परमवीर’ ही मालिका त्या काळात तुफान गाजली. ही मालिका केवळ पोलिसी चातुर्यकथा एवढ्यापुरती मर्यादित न राहता ती त्यांच्या विविधांगी अभिनयाचा एक ‘मास्टरपिस’ बनली. याच काळात त्यांनी आपले लक्ष शहरी चित्रपटांकडे वळवले होते. खासगी वाहिन्यांच्या काळातही आपली ही दादागिरी त्यांनी कायम ठेवली. साखर कारखान्यांच्या राजकारणावर आधारित ‘दौलत’ नावाची मालिका त्यांनी स्वीकारली. त्या मालिकेतली त्यांची ‘दादासाहेब’ ही व्यक्तिरेखा विलक्षण गाजली. आपल्या मोठ्या कुटुंबाचा व त्याचबरोबर कारखान्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या एका पोक्त व्यक्तीची भूमिका त्यांनी अगदी बारकाव्यानिशी रंगवली होती. ही भूमिका त्यांच्या त्या काळापर्यंतच्या अभिनयाचा परिपाक होता, असं म्हणायला हरकत नाही.
कुलदीप पवार यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणीदेखील अप्रतिम होती. ‘जावयाची जात’ या चित्रपटातील ‘आज उन्हात चांदणं पडलं गं’ हे एक थोडं लोभस, नायिकेची थोडीशी छेडछाड करणारे ग्रामीण बाजाचे झक्कास गीत. ग्रामीण पेहरावात देखणे कुलदीप पवार व नऊवारी साडीत सौंदर्यवती पद्मा चव्हाण, मग गाण्याला रंग न चढला तर नवलच! कोल्हापूरचा जन्म असल्यामुळे कुलदीपजींनी गाण्यात ट्रॅक्टर अगदी सफाईने नि आरामात चालवला आहे. आपल्या मस्त नृत्याची पण दखल त्यांनी प्रेक्षकांना घ्यायला लावली. एकंदरीत गाण्याचा माहौल भारीच झाला होता. ‘काळ्या मातीत मातीत’ हे ‘अरे संसार संसार’ या चित्रपटातील गाणे खूपच गाजले. नांगर चालवणारा त्यांचा शेतकरी कोण विसरेल? सोबत नायिका म्हणून रंजना, या दोघांची जोडी छानच दिसायची. गाणेही सुरेख नि त्याचे चित्रीकरणही एकदम साजेसे! जोपर्यंत शेती आहे, शेतकरी आहे, तोपर्यंत हे गाणे कधीही विस्मरणात जाणार नाही, पर्यायाने कुलदीप पवारही! ‘राजा ललकारी’ हे याच चित्रपटातील गोड नि सुरेल गीत. नांगरणी झाली आहे, पिके डौलाने उभी आहेत. मेहनतीचं फळ आता मिळाल्यात जमा आहे अन् त्यामुळे फेटा घातलेले रुबाबदार कुलदीप पवार नि लोभस रंजना यांच्या चेहर्यावर समाधानपूर्तीचे तेज आहे. या गाण्यात दोघेही एकदम छान व देखणे दिसले आहेत. उत्तम अभिनयाने या जोडीने दोन्ही गाण्यांना छानच न्याय दिला आहे. ‘पाहिले न मी तुला’ हे ‘गुपचुप गुपचुप’ चित्रपटातील एक तुफान गाजलेले गीत. या गाण्याने तरुणाईची मने जिंकून घेतली नि त्या काळात कुलदीप पवार तरुणाईचे लाडके अभिनेता झाले होते. आजही ते गाणे तितकेच लोकप्रिय आहे. त्यांचा एका कानात हेडफोन घातलेला चेहरा जबरदस्त लोकप्रिय झाला होता. काहींना पडद्यावरची रंजना आवडली अन् काही जणांना त्यांच्या आयुष्यातील रंजना आठवली. पण, हे मात्र नक्की की मराठी रोमॅण्टिक गाण्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये हे गाणे निर्विवादपणे आहे. या गाण्याचे गीतकार मधुसुदन कालेलकर, संगीतकार अनिल अरुण नि गायक सुरेश वाडकर होते. कुलदीप पवारांना सुरेश वाडकरांचा आवाज अगदी अचूक शोभत होता, हे दोघे एकत्र म्हणजे यशाची हमीच होती. ‘झुंजुरमुंजुर’ हे ‘बिनकामाचा नवरा’ या चित्रपटातील एक पावसाळी, मनाला ओलेचिंब करणारे गीत. हे गाणे तसे पाहिले तर मधु कांबीकर यांचे. ती आपल्या सजणाची वाट पाहतेय. त्यामुळे कुलदीप पवार फार थोडा वेळ गाण्यात दिसतात. पण, जेव्हा दिसतात तेव्हा एकदम रुबाबदार नि देखणे दिसतात. ‘रिमझिम गिरे सावन’च्या तोडीचे हे मराठीतील भिजणारे गीत आहे. ‘झुंजुरमुंजुर’ या शब्दांचा नादही ऐकायला छान वाटतो.
कुलदीप पवार यांची अभिनयाची कारकिर्द एकूण ३६ वर्षांची. एक उत्तुंग नट, मोठा माणूस असलेल्या कुलदीप पवार यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यासाठी ते कोल्हापूर सोडून मुंबईत आले. मात्र, हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. कराड, पुणे, असे मुक्काम गाठत त्यांनी मुंबई गाठली. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या हरहुन्नरी अभिनयाने अभिनेता, खलनायक आणि विनोदी अशा वैविध्यपूर्ण त्रिसुत्री भूमिका उत्कृष्टरित्या वठवणारे ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार हे भन्नाट व्यक्तिमत्त्व होते. आपल्या अभिनयी जोरावर रसिकांच्या मनात वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले. कुलदीप पवार हे शेवटपर्यंत कार्यरत राहिले. आपल्या कामाविषयीची निष्ठा त्यांनी जपली. त्यांच्या आजारपणाचाही त्यांनी कधी बाऊ केला नाही. सतत नव्या आव्हानांना सामोरे जाणारा हा अवलिया त्याच निधड्या छातीने मृत्यूलाही सामोरा गेला. अशा दिग्गज अभिनेत्यास विनम्र अभिवादन.
- आशिष निनगुरकर