मुलुंडमध्ये १६५० बेड्सचे कोविड सेंटर लोकार्पण होऊनही बंदच !

11 Jul 2020 14:10:04

mulund covid centre_1&nbs
 
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले जात आहेत. मुलुंड येथील रिचर्ड सन्स अँड क्रूडास या कंपनीच्या परिसरामध्ये १ हजार ६५० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात आले. या सेंटरचे लोकार्पण ३० जून रोजी होणार होते पण, ७ जुलैला या सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात याची सुरुवात अजूनही करण्यात आली नाही. आता लोकार्पण झाल्यानंतर सेंटर चालू कधी होणार? असा सवाल स्थानिक आमदार मिहीर कोटेचा यांनी उपस्थित केला आहे.
 
 
एकीकडे मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांसाठी दिलेल्या रूग्णालयामध्ये पुरेसे बेड्स उपलब्ध नाहीत. त्यात दुसरीकडे त्यांच्यासाठी उभारलेले कोविड सेंटर अद्याप चालू केले नसल्याने रुग्णांची गैसोय होत आहे. रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होत नसल्यामुळे मुलुन्द्म्धील हे कोविड सेंटर अजून सुरू झाले नसल्याची माहिती देण्यात येत आहे.
 
 
मुंबईच्या मुलुंड परिसरातील जकात नाक्यावर १२० खाटांचे एक कोविड सेंटर उभारण्यात आले. याची सुरुवातही सेंटर तयार झाल्यानंतर एक ते दीड महिन्याच्या कालावधीनंतर करण्यात आली होती. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता नसताना, १८०० बेड्सचे नवीन कोविड केअर सेंटर उभारण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली. तेव्हाच मेडिकल टीमची व्यवस्था का नाही केली? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. मुलुंड आणि भांडुपमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना, लवकरात लवकर हे कोविड सेंटर सुरू करावेत, अशी मागणी केली जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0