जगभरात भारतीयांचा बोलबाला ; ११ देशांमध्ये ५८ बडे अधिकारी

    दिनांक  10-Jul-2020 13:49:31
|

INDIASPORA LEADERS_1 


वॉशिंग्टन :
जगातील विविध ११ देशांमध्ये आजच्या घडीला ५८ भारतीय वंशाचे अधिकारी अत्युच्च स्थानावर या उद्योजकांनी आपल्या कंपन्यांमध्ये जगभरातील एक-दोन लाख नव्हे तर तब्बल ३६ लाख नागरिकांना रोजगार दिला आहे. या कंपन्यांचे एकूण उत्पन्न १ लाख कोटी डॉलरच्या आसपास (७५ लाख कोटी रुपये) असून या कंपन्यांचे बाजार भांडवल ४ लाख कोटी डॉलर्स आहे.




विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणि त्या देशाच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या भारतीय वंशाच्या उद्योजकांच्या कामगिरीचा आढावा 'इंडियास्पोरा' या संस्थेच्या अहवालात घेण्यात आला आहे. संघटनेने म्हटले आहे की, भारतीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जगभरातील विविध देशांमध्ये असलेले उद्योग चांगली प्रगती करताना दिसत आहेत. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर यांसह ११ विविध देशांमध्ये ५८ उच्चपदस्थ अधिकारी हे विविध कंपन्यांचे नेतृत्व करीत आहेत. या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या कंपन्यांनी वार्षिक सरासरी २३ टक्के वाढ नोंदविलेली आहे.



या यादीमध्ये असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नावे बघितली असता यापैकी बहुतेक हे भारतामधून स्थलांतरित झालेले आहेत, तर काही युगांडा, इथोपिया, इंग्लंड, अमेरिका आदी देशांमध्ये जन्मलेले मूळ भारतीयही आहेत. या यादीमध्ये टेक इंडस्ट्रीजचे प्रमुख सुंदर पिचाई, रोहम अ‍ॅण्ड हॅसचे राज गुप्ता, पेप्सिकोच्या इंद्रा नुई तसेच हरमन इंटरनॅशनलचे दिनेश पालिवाल, मास्टर कार्डचे अजय बंगा या प्रमुखांचा समावेश आहे.या उद्योजकांचे नेतृत्व लाभलेल्या कंपन्यांनी त्यांच्या कार्यकाळात भांडवली बाजारात २३ टक्के परतावा दिला आहे. याच काळात अमेरिकेचा 'एस अँड पी ५००' या निर्देशांकाने १० टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे या कंपन्यांमधील गुंतवणूक फायदेशीर ठरली आहे. गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देणाऱ्या कंपन्यांची सामाजिक भान देखील राखले आहे.



भारतीय उद्योजक जागतिक बाजारपेठेत नवनवीन शिखरे सर करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाने आणि कुशल बुद्धिमत्तेने जागतिक अर्थव्यवस्थेला अनेक फायदे झाले आहेत, असे 'इंडियास्पोरा'चे संस्थापक एम. आर रंगास्वामी यांनी सांगितले. तसेच करोनाच्या संकट काळात या कंपन्यांनी समजाप्रती संवेदनशीलता देखील दाखवली. कर्मचारी आणि ग्राहकांबरोबर मागणी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी या कंपन्यांनी विशेष काळजी घेतली. 'कोव्हीड-१९' च्या संकटालाया कंपन्यांनी चांगल्या प्रकारे हाताळले, असे रंगास्वामी यांनी सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.