सुशांत सिंह राजपूत आत्महत्या : शेखर कपूर यांनी इमेलद्वारे नोंदाविला जबाब!

    दिनांक  10-Jul-2020 11:53:13
|

sushant_1  H x


 
‘पानी’ चित्रपट रद्द झाल्याने सुशांत खचला होता; दिग्दर्शक शेखर कपूर यांचा जबाब 


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांना त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवले होते. शेखर कपूर पोलिस स्टेशनमध्ये स्वतः उपस्थित न राहता त्यांनी इमेलच्या माध्यमातून आपला जबाब नोंदवला आहे. 'पानी' हा चित्रपट बंद झाल्यामुळे सुशांतला मोठा धक्का बसला होता आणि तो खचून डिप्रेशनमध्ये गेला होता, असे त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.


शेखर यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट बंद झाल्याचे कळताच सुशांत माझ्या घरी आला आणि माझ्या खांद्यावर डोके ठेवून खूप रडला होता. कारण त्याने या चित्रपटासाठी आपली बरीच वर्षे दिली होती आणि याकाळात बर्‍याच मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या होत्या. याबरोबरच सुशांतने शेखर यांना सांगितले होते की, त्याने यशराजसोबतचा करार तोडल्यानंतर त्याला हिंदी सिनेसृष्टीत चांगली वागणूक दिली जात नाहीये.


मुंबई पोलिसांनी सुशांतची आत्महत्या ही सिनेसृ्ष्टीतील गटबाजीमुळे झाली का? हे तपासण्यासाठी आत्तापर्यंत ३० पेक्षा जास्त लोकांचे जबाब नोंदवले आहेत. शेखर कपूर हे सध्या मुंबईत नाहीत. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी इमेल द्वारे दिली आहेत.


‘पानी’ हा सुशांतचा ड्रीम प्रोजेक्ट होता. तो रद्द झाल्याचे कळताच सुशांत पूर्णपणे कोलमडला. या चित्रपटासाठी त्याने अनेक मोठे चित्रपट नाकारले होते. त्यामुळे तो नैराश्यात जाऊ लागला होता. चित्रपटाचे बजेट जास्त असल्याने इतर कोणीही हा चित्रपट सुशांतसह करण्यास तयार नव्हते. त्यांना या चित्रपटासाठी मोठा कलाकार हवा होता. या गोष्टीने सुशांत आणखी खचला होता, असा खुलासा शेखर कपूर यांनी केला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.