एक होते ‘सुरमा भोपाली’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2020   
Total Views |
Surma Bhopali_1 &nbs





आपल्या विनोदी अभिनय शैलीने ‘शोले’ चित्रपटातील ‘सुरमा भोपाली’ ही व्यक्तिरेखा गाजवणारे अभिनेते जगदीप यांनी ८ जुलै रोजी या जगाचा निरोप घेतला. प्रेक्षकांना खळखळवून हसायला लावणार्‍या या कलाकाराच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...




१९४०-५०च्या दशकात अभिनयाच्या वेडाने झपाटलेले अनेक कलाकार स्वप्ननगरी मुंबईत दाखल झाले. मात्र, याच काळात अपघाताने, ओघाओघानेच या चंदेरी दुनियेत प्रवेश केलेल्या कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. या कलाकारांपैकीच एक म्हणजे अभिनेते जगदीप. आपल्या विनोदी अभिनय शैलीने त्यांनी सगळ्यांना हसवलेच, पण त्यांच्या नकारात्मक भूमिकाही प्रेक्षकांच्या तितक्याच लक्षात राहिल्या.


स्वातंत्र्यपूर्व काळात २३ मार्च १९३९ रोजी मध्य प्रदेशातील दतियामध्ये जगदीप यांचा जन्म झाला. जगदीप यांचे खरे नाव सय्यद इश्तियाक जाफरी! त्यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला होता. जगदीप यांचे वडील बॅरिस्टर होते. १९४७च्या फाळणी दरम्यान त्यांच्या कुटुंबाने भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याच वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. एकेकाळी सधन असणार्‍या जगदीप यांच्या कुटुंबाची एकवेळच्या जेवणाचीदेखील आबाळ झाली. वडिलांच्या जाण्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले. नोकरीच्या शोधात त्यांच्या आईने जगदीप आणि त्यांच्या भावंडांना घेऊन मुंबई गाठली. पोटापाण्यासाठी त्यांच्या आईने मुंबईतील एका अनाथाश्रमात स्वयंपाकी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आपल्या आईची होणारी दगदग पाहून लहानग्या जगदीप यांना रडू येई. आईला मदत व्हावी म्हणून त्यांनी शाळेला रामराम ठोकत, रस्त्यावर साबण, फणी, पतंग विकण्यास सुरुवात केली. ‘जीवंत राहण्यासाठी काम तर करायचे होतेच, पण कुठलेही चुकीचे काम करून जगायचे नव्हते’, असे ते नेहमी म्हणत.


असेच एकेदिवशी रस्त्यावर सामान विकत असताना त्यांच्याजवळ एक व्यक्ती आली आणि तिने “चित्रपटात काम करशील का?” असे विचारले. चित्रपट कधीच न पाहिलेल्या जगदीपने त्यांना “चित्रपट म्हणजे काय?” असा प्रश्न केला. त्या व्यक्तीने त्यांना थोडक्यात अभिनय कसा करतात ते समजावले. अभिनयाचे तीन रुपये मिळतील, हे ऐकल्यावर ते काम करण्यास लगेच तयार झाले. बी. आर. चोप्रांच्या ‘अफसाना’ या चित्रपटातील एका दृश्यासाठी बालकलाकाराची गरज होती. त्यासाठी जगदीप यांची निवड झाली. त्यांना लहान मुलांच्या घोळक्यात बसायचे होते. याच दृश्यात एका मुलाला उर्दूत संवाद म्हणायचा होता. मात्र, काही केल्या त्याला तो उच्चारता येईना. बाजूला बसलेल्या जगदीप यांनी त्याला “मी म्हटला तर मला काय मिळेल?” असा भाबडा प्रश्न केला. त्यावर “माझे तीन रुपयेही तुला मिळतील,” असे उत्तर मिळाल्यावर जगदीप यांनी तो संवाद एका दमात म्हणून टाकला. अशाप्रकारे त्यांचे या चंदेरी दुनियेत पदार्पण झाले. त्यानंतर ‘बालकलाकार’ म्हणून अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. बिमल राय यांच्या ‘दो बिघा जमीन’ या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. जॉनी वॉकर, मेहमूद यांच्यासोबत जगदीप यांचे नावही येऊ लागले.


१९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या पी. एल. संतोषी दिग्दर्शित ‘हम पंछी एक डाल में’ या चित्रपटातील जगदीप यांनी साकारलेल्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनीदेखील जगदीप यांचे विशेष कौतुक केले होते. ‘ब्रह्मचारी’, ‘अनमोल मोती’, ‘दो भाई’, ‘इश्क पर जोर नही’ सारख्या चित्रपटांतून त्यांच्या विनोदी भूमिका खूप गाजल्या. विनोदी भूमिकांबरोबरच ‘रामसे ब्रदर्स’च्या ‘पुराना मंदिर’, ‘एक मासूम’, ‘मंदिर मस्जिद’ या भयपटांतील त्यांच्या नकारात्मक भूमिकादेखील तितक्याच गाजल्या.


१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हा चित्रपट जगदीप यांच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरला. या चित्रपटात जगदीप यांनी ‘सुरमा भोपाली’ हे पात्र साकारले होते. या भूमिकेने जगदीप यांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले. या व्यक्तिरेखेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून त्यांनी ‘सुरमा भोपाली’ नावाचा चित्रपटही तयार केला होता. त्यानंतर १९९४ मध्ये ‘अंदाज अपना अपना’ या गाजलेल्या चित्रपटातही जगदीप यांनी भूमिका साकारली होती.


मनोरंजन करणार्‍या या अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्यदेखील चित्रपटाच्या कथेप्रमाणेच होते. ८१ वर्षीय जगदीप यांचे तीन विवाह झाले, तर स्वतःपेक्षा ३३ वर्षांनी लहान जोडीदार निवडल्याने त्यांच्यावर खूप टीकाही झाली होती. त्यांना सहा अपत्ये असून, त्यापैकी जावेद जाफरी आणि नावेद जाफरी हे सध्या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांची मुलगी मुस्कानदेखील वडिलांच्या पावलावर पऊल ठेवत लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. जगदीप यांनी ५० वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास ४००हून अधिक चित्रपटांतून काम केले. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल २०१९ मध्ये त्यांना ‘आयफा जीवन गौरव’पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आपल्या विनोदी अभिनयशैलीने तब्बल पाच दशकेप्रेक्षकांचे मनोरंजन करण्यार्‍या अभिनेते जगदीप यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून भावपूर्ण श्रद्धांजली!




@@AUTHORINFO_V1@@