पेंच व्याघ्र प्रकल्पात टोळधाड; वन विभागाची माहिती

    दिनांक  09-Jun-2020 19:03:32
|

tiger_1  H x W:पावसामुळे टोळधाडीने मोर्चा वळवला

 
 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - विदर्भातील काही तालुक्यांना बसलेला टोळधाडीचा फटका आता पेंच व्याघ्र प्रकल्पालाही बसला आहे. सोमवारी ही टोळधाड व्याघ्र प्रकल्पात दाखल झाली होती. आज दुपारी पाऊस पडल्याने ही टोळधाड मनसरच्या दिशेने निघून गेल्याचे वन विभागाने सांगितले आहे.pench _1  H x W 
 
 

विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये सध्या टोळधाड पसरली आहे. सोमवारी ८ जून रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिमेकडील कोलीतामारा भागात या टोळधाडीने प्रवेश केला. त्यानंतर दुपारी व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्वेकडील भागात बोरबन, चोर बाहुली, सिलारी, पिपरिया भागात तिने मोर्चा वळवला. कृषी आणि वन विभागाच्या समन्वयामधून टोळधाडीचे सतत निरीक्षण करण्यात आले. पेंच व्याघ्र प्रकल्प हे संरक्षित क्षेत्र असल्याने कीटनाशकांचा वापर केला गेला नाही. तसेच टोळधाडीला हुसकावून लावण्याचाही प्रयत्नही केला नाही. आज दुपारी पाऊस पडल्याने टोळधाडीने आपसूक आपला मोर्चा मनसर भागाकडे वळवला. या टोळधाडीचे योग्य पद्धतीने निरीक्षण करण्याच्या सूचना वनाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मुख्य वन सरंक्षक तथा क्षेत्र संचालक यांनी डाॅ. रविकिरण गोवेकर यांनी आज टोळधाड पडलेल्या भागांना भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत सहायक वन संराक्षक अतुल देवकर व इतर संबंधित क्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी होते. पेंच मधील प्रभावित भागाची पाहणी करण्यात आली असून कुठेही मोठ्या स्वरूपात हानी झालेली नाही. सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे गोवेकर यांनी सांगितले.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.