रड्याची रडकथा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2020
Total Views |
Sonu Sood And Sanjay Raut
 
 
 
 
जनतेने ज्यांना विरोधात बसायचा कौल दिला, त्यांच्याशी सत्तेच्या सोन्याच्या ताटासाठी उद्धव ठाकरेंनी गाठ बांधली आणि या अभद्र आघाडीचे नाव पहिल्या दिवसापासून बदनाम झाले. ते पुन्हा सोनू सूदच्या कामाने बदनाम कसे होऊ शकेल? फार फार तर आधी १०० टक्के बदनाम होते ते आता एक हजार टक्के बदनाम झाले असेल.



माणूस स्वतः काही करु शकला नाही आणि त्याच्या तुलनेत अन्य कोणी चांगले काम करत असेल, तर त्याला त्रास होणे साहजिकच असते. असाच त्रास शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांना झाला आणि त्यांनी सोनू सूद या हिंदी चित्रपट अभिनेत्यावर टीका केली. त्याला कारण ठरले ते सोनू सूद याने ‘लॉकडाऊन’काळात महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मजूर-कामगारांना स्वखर्चाने त्यांच्या राज्यात पोहोचवण्याचे केलेले काम.


पण, साडेतीन लाख कोटींपेक्षा अधिक मूल्याचा अर्थसंकल्प असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची तुलना सत्ताधारी पक्षाच्याच मुखपत्राने चित्रपट अभिनेत्याशी करणे, त्याच्यावर आरोप करणे यासारखा हास्यास्पद प्रकार दुसरा कुठला असू शकेल? मात्र, ‘सौ दाऊद एक राऊत’ अशा शब्दांत ज्यांच्या नावाने फुशारक्या मारल्या जातात, त्या संजय राऊत यांनी सोनू सूदचे नाव ऐकताच हा उद्योग केला. राऊत यांनी ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरात सोनू सूदवर टीका करणारा एक विशेष लेख लिहिला. त्यांच्या टीकेचा रोख असा आहे की, जसे काही सोनू सूद याने राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठीच स्थलांतरित मजूर-कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवले.


इतकेच नव्हे तर सोनू सूद याने एवढ्या मजूर-कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी पैसा कुठून आणला, असा सवालही राऊत यांनी केला. वस्तुतः संजय राऊत यांनी एक मुद्दा समजून घेतला पाहिजे. सोनू सूद हा गेली कित्येक वर्षे चित्रपटसृष्टीशी निगडित आहे. तिथे तो काम करतो, कष्ट करतो, त्याचा त्याला दामही मिळतो. म्हणजेच मेहनत करुन, परिश्रम करुन सोनू सूद पैसा कमावतो आणि आपल्याच समाजबांधवांवर वाईट वेळ ओढावली तर तो मिळवलेला पैसा खर्च करण्याची दानतही त्याच्यात आहे. संजय राऊत यांचा मात्र, स्वतः अंगमेहनत करुन पैसा कमावता येऊ शकतो, यांवर विश्वास नसावा किंवा लांड्यालबाड्या केल्याशिवाय पैसा मिळवता येऊ शकत नाही, असे त्यांना वाटत असावे. म्हणूनच त्यांनी स्थलांतरित मजूर-कामगारांना गावी पोहोचवण्यासाठी सोनू सूदने पैसा कुठून आणला, असा प्रश्न केला. ‘चोराच्या मनात चांदणे’ किंवा ‘खाई त्याला खवखवे’ या दोन्ही म्हणी इथे लागू पडत असल्याचे सर्वांच्याच लक्षात येईल.


ठाकरे सरकारच्या बदनामीचा मुद्दा तर विचित्रच म्हटला पाहिजे. कारण, ज्याचे काही नाव असते तोच बदनाम होत असतो, पण इथे तर हे सरकारच बदनामीच्या जोरावर सत्तेत आले. जनतेने ज्यांना विरोधात बसायचा कौल दिला, त्यांच्याशी सत्तेच्या सोन्याच्या ताटासाठी उद्धव ठाकरेंनी गाठ बांधली आणि या अभद्र आघाडीचे नाव पहिल्या दिवसापासून बदनाम झाले. ते पुन्हा सोनू सूदच्या कामाने बदनाम कसे होऊ शकेल? फार फार तर आधी १०० टक्के बदनाम होते ते आता एक हजार टक्के बदनाम झाले असेल, म्हणजे बदनामीच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसते आणि संजय राऊत यांच्यासारख्या पक्षनेत्यांमुळे तर त्यात कधी घटही होऊ शकणार नाही. त्यामुळे राऊत यांनी सोनू सूदवर बदनामीचे आरोप करणे सोडून द्यावे, उलट स्वपक्षाच्या नावावर काही चांगले काम करता येईल का ते पाहावे.


असाच एक आरोप म्हणजे, सोनू सूदच्या महात्मापणाचा! स्थलांतरित मजूर-कामगारांना घरी पोहोचवण्याच्या कामामुळे सोनू सूदला ‘महात्मा’ ठरवण्याचा प्रकार सुरु झाल्याची टीका राऊत यांनी केली. खरे म्हणजे, राज्यातील मजूर-कामगारांची सर्वंकष सोय करण्याची जबाबदारी ठाकरे सरकारची होती. पण, त्या आघाडीवर या सरकारने हात वर करण्याशिवाय अन्य काहीही केले नाही. मजूर-कामगार घरी जाऊ लागले तर यांना आनंद होऊ लागला, बरी ब्याद गेली, अशी यांची वागणूक होती. मात्र, ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत रस्ता तुडवत जाणार्‍या या मजूर-कामगारांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे सुरु होण्याच्या आधी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, अशीही कित्येकांची अवस्था झाली.


रस्त्यावर अनेकांचा जीव गेल्याचे, पायाला फोड आल्याचे, रक्त येत असल्याचे हृदयद्रावक दृश्यही या काळात पाहायला मिळाले. सोनू सूदसारख्याला या मजूर-कामगारांची वेदना-यातना समजली आणि त्याने आपल्या परीने सीमीत संसाधनांच्या साहाय्याने मदतकार्य सुरु केले. वस्तुतः हे काम सोनू सूदच्या तुलनेत प्रचंड आर्थिक क्षमता असलेल्या राज्य सरकारचे होते, पण ते त्यांनी केले नाही, त्यामुळे सोनू सूद ज्यांच्यासाठी झटला त्यांनी त्याला ‘महात्मा’ ठरवले, तर संजय राऊत यांच्या पोटात दुखायचे कारण काय? की ‘मातोश्री’वर आला तरच एखादी व्यक्ती ‘महात्मा’ होते, तशी संजय राऊत यांची अपेक्षा होती का? असेल तर त्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनीही कधी सोनू सूदचे कौतुक का केले नाही?


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इथे उल्लेख करावा लागेल. फडणवीसांच्या काळात ‘जलयुक्त शिवार’ या सरकारी योजनेबरोबरच ‘पाणी फाऊंडेशन’ किंवा ‘नाम फाऊंडेशन’सारख्या संस्थाही काम करत होत्या. पण, फडणवीसांनी कधी त्यावर टीका केली नाही, उलट त्यांचेही कौतुकच केले. कारण, सर्वांच्या प्रयत्नाने संकटावर मात करता येईल, हा समाज आपला आहे आणि सरकारच्या बरोबरीने आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यापुढील समस्या सोडवल्या पाहिजे, यावर त्यांचा विश्वास होता. संजय राऊत यांना मात्र तशी काही शिकवण मिळाली नसावी, म्हणून ते सोनू सूदच्या कामावरही टीका, आरोप करताना दिसतात. सोनू सूद अभिनेता असल्याने तो पैसा किंवा शुल्क घेऊन मदतीचा अभिनय करत असल्याचेही राऊत म्हणाले.


ही मदत भाजपनेच केली, असा त्यांच्या लेखाचा आशय आहे. राऊत यांच्या आरोपातून, चांगले काम करणारी माणसे ही भाजपची असतात, हे स्पष्ट होते. म्हणजेच कोणालाही चांगले काम करायचे असेल वा करत असेल तर तो आपोआप भाजपचा सदस्य होतो, असा संजय राऊत यांचा दावा आहे. तसे असेल तर उत्तमच आणि त्यातूनच वाईट काम करणारे ‘इतर’ हेही समजते. आता त्या इतरांत आपण व आपला पक्षही असल्याची जाहीर कबुली राऊत यांनी एकदाची देऊन टाकावी. म्हणजे हा आरोपबाजीचा प्रकार पूर्ण होईल. दरम्यान, सोनू सूदने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचेही समोर आले. पण ती किती प्रामाणिक होती? कारण, त्यानंतर सोनू सूद याला आ. असलम शेख यांच्या मध्यस्थीने ‘मातोश्री’वर आणण्यात आल्याचेही म्हटले जाते. अशा परिस्थितीत चांगले काम करणार्‍या एखाद्या व्यक्तीला स्वेच्छेने ‘मातोश्री’वर का यावेसे वाटत नाही, याचे चिंतन संजय राऊत यांनी करायला हवे. म्हणजे त्यांच्यावर अशी रडकथा गाण्याची वेळ येणार नाही.





@@AUTHORINFO_V1@@