‘त्या’चे तिथे असणे भारतासाठी अनुकूल

07 Jun 2020 19:20:01
Dawood_1  H x W






भारतासंबंधी आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही मुद्दे हे नेहमीच चर्चिले जातात. त्यातील एक मुद्दा म्हणजे कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम. भारतीय म्हणून भारतासाठी सर्वात जास्त त्रासदायक ठरलेला आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी आव्हान ठरलेल्या गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार म्हणजे दाऊद हा होय. दाऊदने भारत सोडल्यावर तो नेपाळमार्गे दुबईत गेल्याची चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो. तसेच, नंतरच्या काळात तो पाकिस्तानात असल्याचेदेखील वारंवार समोर येत गेले. यासाठी अनेकदा ‘रॉ’सारख्या संस्थेने दिलेल्या अहवालाच्या बातम्यादेखील यापूर्वी वाचनात आल्या आहेत. मात्र, दाऊद नेमका कुठे आहे, याबाबत संदिग्धता कायम राहिली. ज्या ज्या वेळी भारताने पाकला दाऊद त्या देशात असल्याबाबतचे पुरावे दिले, विचारणा केली त्या प्रत्येक वेळी पाकिस्तानने ‘आम्ही नाही त्यातले’ हीच भूमिका घेतली. त्यामुळे अधिकृतरित्या दाऊद हा पाकिस्तानमध्ये आहे, हे पाकने कधीही मान्य केले नाही. कोरोना सध्या जगभर फैलावला आहे. कोरोनाला कोण डॉन आणि कोण सामान्य नागरिक याचे सोयरसुतक नाही. त्यामुळे दाऊदला कोरोना झाल्याचे वृत्त मागील काही दिवसात समोर आले आहे. त्यातच दाऊदचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीदेखील बातमी आहे. मात्र, त्याचा भाऊ अनिसने याचे खंडन केले व संपूर्ण कुटुंब सुरक्षित असल्याचे सांगितले. दाऊदला कोरोना झाला किंवा नाही, दाऊदचे कुटुंब सुरक्षित आहे किंवा नाही, त्याचा भाऊ नेमकी काय भूमिका मांडत आहे. हे आपल्यासाठी केव्हाही महत्त्वाचे नाही. मात्र, या सर्व वृत्तात दाऊद पाकिस्तानात नाही, असे पाक सोडून कोणीही म्हटले नाही हे महत्त्वाचे आहे. याचाच अर्थ कोरोनाच्या निमित्ताने का होईना दाऊद हा पाकिस्तानातच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. अशावेळी दाऊदबाबत पाकची नेमकी भूमिका काय असेल हे पाहणे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी भारताची भूमिकादेखील आगामी काळात महत्त्वाची ठरणार आहे. तसेच अमेरिका, चीन या पाकधार्जिण्या देशांनीदेखील आता आपल्या याचकाचा कान धरण्याची वेळ आली असल्याचे जाणून घेणे आवश्यक असणार आहे.

९/११ च्या घटनेनंतर अमेरिकेने दहशदवादविरोधी कडक भूमिका घेणारे राष्ट्र, अशी आपली छबी निर्माण केली. त्याचवेळी दहशदवादाच्या पोशिंदा राष्ट्राबाबतची आपली भूमिका कठोर असल्याचे नमूद केले. तेव्हा आता दाऊद पाकिस्तानात असल्याबाबत पुष्टी मिळत असताना महासत्तेने पाकबाबत कठोर भूमिका घेण्याची हीच ती वेळ आहे. दुसरीकडे आज चीन पाकचा पाठीराखा झाला आहे. अशावेळी केवळ भारताला त्रास देण्यासाठी पाकचा वापर चीन करून घेणार का, हाही प्रश्न समोर आला आहे. झेलम नदीवर विद्युत प्रकल्प बांधण्यास पाकला चीनने नुकतीच मदत देऊ केली आहे. तसेच, अरबी समुद्रात आपले बस्तान बसविण्याच्या तयारीत चीन आहे. अशावेळी दाऊद पाकमध्ये असल्याचे वृत्त समोर आले. तेव्हा आता चीन आपली भूमिका पाकिस्तानबाबत काय घेणार हे महत्त्वाचे आहे. चीनने दाउद प्रकारणावर आळीमिळी गुपचिळी घेतली तर, चीनचा पाकच्या दहशतवाद पाठीराखा भूमिकेस पाठिंबा आहे असे म्हणायचे का? असा प्रश्न आगामी काळात नक्कीच उपस्थित होईल. कोरोनाची स्थिती, कोरोनाला नेमके कोण कसे कारणीभूत आहे. आमच्या देशात कोरोनामुळे विदारक स्थितीचा आम्ही कसा सामना करणार आहोत, दक्षिण आशियाई देशात आगामी काळात कोरोना अमुक एक प्रकारे थैमान घालेल याकडे अमेरिका सध्या जगाचे लक्ष वेधत आहे. तर, कोरोनास्थितीतून आम्ही कसे बाहेर पडत आहोत, कशा उपयोजना केल्या आहेत, जागतिक आरोग्य संघटनेसंबंधीचे विचार, मिळणार्या आर्थिक मदतीसंबंधी आपली मते अशा बाबतीत चीनने आपली आघाडी सध्या उघडली आहे. त्यामुळे कोरोनाच्या आड आपली दहशतवादसंबंधी भूमिका हे राष्ट्र आगामी काळात लपविणार काय? हा प्रश्न आता समोर येत आहे. तेव्हा भारताने आता हीच संधी ओळखून पाकचा चेहरा जगासमोर पुन्हा एकदा उघडा करण्याची वेळ आली आहे. असे झाल्यास अमेरिकेची पाककडे वक्रदृष्टी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनच्या मनसुब्यांनादेखील सुरुंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.







Powered By Sangraha 9.0