अनलॉक १ ; दुकाने सुरू, मात्र ग्राहकांचा सावध पवित्रा

06 Jun 2020 16:18:28

unlock 1_1  H x
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गेले अडीच महिने सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून सूट घेत शुक्रवारी सर्व प्रकारची दुकाने सुरू झाली. मात्र, मोठ्या उत्साहाने दुकाने सुरू करूनही ग्राहकांनी सावध पवित्रा घेतला. त्यामुळे तुरळक ग्राहकच दुकानांकडे वळले. दुकानदार आणि सेल्समन तोंडावर मास्क आणि हातात गोल्ज घालून हसतमुखाने स्वागतासाठी तयार होते. सोशल डिस्टनसिंग पाळले जावे, यासाठी दुकानाबाहेर चौकोन आखले गेले. पण त्यांच्या इराद्याप्रमाणे ग्राहकांची गर्दी झाली नाही.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून सवलत देत राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने नियम शिथील करायला सुरुवात केली असून मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रे तसेच मॉल आणि व्यापारी संकुल वगळून दुकाने सुरू करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे दुकानदारांमध्ये मोठा उत्साह होता. सम आणि विषम नियम पाळून मोजकीच दुकाने उघडण्यात आली. मात्र, सर्वसामान्य ग्राहक सावध होत दुकानासमोर उभे राहत होते.
 
जी/उत्तर विभागातील दादर, माहीम आणि धारावी सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. मात्र या भागतही प्रतिबंधित क्षेत्रे वगळून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पूर्व आणि दक्षिणेकडील दुकाने तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी पश्चिम आणि उत्तर दिशेकडची दुकाने सुरू राहणार आहेत. आर-नॉर्थ (दहिसर) विभागातही तोच नियम लागू आहे. कंटेन्मेंट झोन वगळून मुंबईच्या सर्वच विभागात अशा प्रकारे दुकाने सुरू झाली आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा देणारी किराणा माल, औषधे आणि दूध विक्रीची दुकाने सोडून इतर दुकाने रविवारी बंद राहणार आहेत. दुकाने उघडल्यामुळे त्याचा फायदा किरकोळ व्यापाऱ्यांना होणार आहे. तसेच ग्राहकांचीही धावपळ थांबणार आहे.
 
 
कोरोना पार्श्वभूमीवर, रात्री ८ नंतर संचारबंदी असल्याने काही ठिकाणी दुकाने ६ वाजताच बंद करण्यात येत आहेत. एकीकडे दुकानात उभे राहतात ग्राहक सावधानता बाळगत असले तरी फेरीवाल्यांकडे खरेदी करताना मात्र बेसावध राहत आहेत. काही ग्राहक मास्कचा वापर करत नाहीत, तर काही ग्राहकांना सोशल डीझटनसिंगचाही विसर पडलेला दिसत आहे. ही बेशिस्तच कोरोनावाढीला कारणीभूत ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0