'अनलाॅक-१' मध्ये बोरिवली नॅशनल पार्कमधील 'या' अतिक्रमणांवर वन विभागाची धडक कारवाई

    दिनांक  06-Jun-2020 23:39:39
|
national park _1 &nb


साई बांगोडा गावातील अवैध बांधकामांवर हातोडा

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - लाॅकडाऊनचा फायदा घेऊन बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' परिक्षेत्रातील साई बांगोडा गावाजवळ झालेले अवैध बांधकाम वन विभागाने जमीनदोस्त केले आहे. पोलीस संरक्षणाअंतर्गत शनिवारी सकाळी विशेष मोहिम राबवून ही कारवाई करण्यात आली. प्रसंगी अतिक्रमण करणाऱ्यांनी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वनाधिकाऱ्यांनी पाच हेक्टर परिसरात केलेली बांधकामे उद्ध्वस्त केली. 
 
 
लाॅकडाऊन लागल्यानंतर विहार तलावाजवळील साई बांगोडा गावाजवळ अवैधरित्या वृक्षतोड झाल्याची घटना घडली होती. या परिसरात गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यावर हल्ला देखील झाला होता. राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारित येणाऱ्या या भागामध्ये बेकायदा झोपड्या उभारल्याचे समोर आले होते. पाच हेक्टरच्या परिसरात प्लास्टिक आणि फाद्यांचे कुंपन घालून जमिनीच्या मोठ्या भागाची छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली होती. वन कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याने या बांधकामांवर पोलीस संरक्षणाअंतर्गतच कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, लाॅकडाऊनमुळे वन विभागाला पोलीस संरक्षण मिळत नव्हते. त्यामुळे ड्रोनच्या आधारे या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्याचे काम नॅशनल पार्क प्रशासनाकडून सुरू होते. 
 
 
 
लाॅकडाऊनच्या नियमांमध्ये शिथीलता आल्यामुळे बुधवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान नॅशनल पार्कच्या तुळशी वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी साई बांगोडामधील बेकायदा बांधकामावर हातोडा मारला. वन वनकर्माचारी, पोलीस, राज्य राखीव दलातील जवानांच्या मदतीने बुधवारी साई बांगोडा गावातील वन विभागाच्या हद्दीत लाॅकडाऊनच्या काळात उभारलेल्या ५ झोपडीवजा बांधकामांवर कारवाई केल्याची माहिती एका वनाधिकाऱ्याने  'महा MTB'शी बोलताना दिली. तसेच सुमारे ५ हेक्टर परिसरावर घालण्यात आलेले ७ कुंपनही उद्ध्वस्त केल्याचे त्यांनी सांगितले. या कुंपनांमुळे वन्यजीवांच्या भ्रमणमार्गात अडथळा निर्माण झाला होता. या कारवाईच्या वेळेस साई बांगोडा गावातील अंदाजे ६० महिलांनी कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस संरक्षणामुळे त्यांचा हा प्रयत्न उधळून लावण्यात आला. या परिसरातील अजूनही काही बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे, त्या वनाधिकाऱ्याने सांगितले. 
 
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.