रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना मातृशोक

    दिनांक  06-Jun-2020 11:02:01
|

piyush goyal_1  
 
 
 
मुंबई : रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल यांचे शनिवारी निधन झाले. पियुष गोयल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. “माझ्या प्रेमळ आईने, ज्यांनी मला नेहमीच त्यांच्या प्रेमाने मला मार्ग दाखविला, त्यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सेवेत घालवले आणि सेवेसह जगण्यासाठी आम्हाला प्रेरित केले.” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. त्यांच्या मागे पुत्र पीयूष, प्रदीप आणि कन्या प्रतीभा व प्रमिला यांच्यासह सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. भाजपाचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल यांच्या त्या पत्नी होत्या.
 
 
 
 
 
चंद्रकांता गोयल या भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार होत्या. त्या माटुंगा मतदारसंघातील महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या देखील होत्या. त्या तीनवेळा आमदार म्हणून निवडणून आल्या होत्या. भाजपतील सर्वच नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पियुष गोयल यांच्या ट्विटनंतर विविध पक्षातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच या दु:खाच्या प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया अनेकांनी ट्विटरद्वारे दिली.
 
 
 
 
 
भाजप खासदार पूनम महाजन यांनी चंद्रकांता गोयल यांना श्रद्धांजली वाहिली, “चंद्रकांता गोयल यांच्या निधनाची बातमी ऐकून फार दु:ख झाले. त्या विधानसभेदरम्यान भाजपचा एक मजबूत आवाज होत्या. तसेच एक प्रेमळ नेत्याही होत्या. इतकेच नव्हे तर संपूर्ण गोयल परिवार हा महाराष्ट्रासाठी सदैव एक ताकद राहिला आहे.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
 
 
प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी चंद्रकांता गोयल यांना भाजपा, महाराष्ट्रतर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.
 
 
 
 
 
 
ज्येष्ठ नेत्या चंद्रकांता गोयल सर्वप्रथम १९७८ साली मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक म्हणून सायन परिसरातून निवडून आल्या. त्यांनी १९९० साली माटुंगा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ही जागा भाजपाला मिळवून दिली. १९९०, ११९५ व १९९९ अशा सलग तीन वेळा त्या विधानसभा निवडणुकीत माटुंगा येथून विजयी झाल्या. ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेने त्या राजकारणात आल्या होत्या. त्यांनी २००४ साली स्वतःहून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यांच्या जागी त्यांचे पुत्र व देशाचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना माटुंगा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची पक्षाची उमेदवारी देण्यास त्यांनी विरोध केला व आपल्या मुलाने स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल करावी, असा आग्रह धरला.
 
 
त्यांचा तत्वनिष्ठ स्वभाव होता. त्या राष्ट्रीय विचारांच्या होत्या व त्यांचा समाजसेवेचा पिंड होता. आपल्या मुलांवर आणि सहकारी कार्यकर्त्यांवर त्यांनी हेच संस्कार केले. कार्यकर्त्यांमध्ये त्या चंद्रकाताबेन म्हणून परिचित होत्या. पती वेदप्रकाश यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब जनसंघ व भाजपाला समर्पित होते. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना गोयल कुटुंबाने आस्थेने मदत केली. राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतरही त्या सामाजिक कार्यात सहभागी होत्या.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.