वैदिक साहित्यात लढायांचे संदर्भ

    दिनांक  06-Jun-2020 21:50:09
|

arya_1  H x W:वाचकहो, आतापर्यंतच्या लेखांमध्ये ‘आर्य’ शब्दाच्या अर्थाची पाश्चात्त्य विद्वानांनी आपल्या सोयीनुसार पद्धतशीरपणे तोडमोड कशी केली, ते आपण तपशीलवार पाहिले. याच विद्वानांच्या मतानुसार आर्यांचे ते तथाकथित ‘आक्रमण’ झाल्यानंतर पुढच्या काळात त्यांनी वेदांची रचना केली. यातल्या काही वर्णनांवरूनच तर मोर्टिमर व्हीलर (Mortimer Wheeler) या पंडिताने “Indra stands accused” अशा मथळ्याने आपले संशोधन प्रसिद्ध करताना देवांचा राजा इंद्राला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. मग साहजिकच एक प्रश्न पडतो, की या इंद्र देवाने आपल्या बलाढ्य ‘आर्य’ सेनेच्या मदतीने जर असे आक्रमण करून एवढा मोठा विजय संपादन केला असेल आणि त्यानंतरच्या काळात वेदांची निर्मिती झालेली असेल, तर हा सगळा तथाकथित विजयाचा इतिहास आर्यांनी वेदात नोंदवला असेलच ना? मग वेदांमध्ये अशा लढायांची वर्णने कुठे कुठे दिसतात? चला, तर मग शोधूया वेदातल्या लढाया आणि त्यातली आर्यांची आक्रमणे!ऋग्वेदातील लढाया


‘ऋग्वेद’ हा सर्वात प्राचीन वेद. अतिशय लक्षणीय गोष्ट म्हणजे ऋग्वेदापासून पुढच्या सर्व वैदिक वाङ्मयात या तथाकथित ‘आर्य आक्रमणा’चे उल्लेख कुठेच मिळत नाहीत. काही काही ठिकाणी लढायांची वर्णने जरूर आहेत. उदाहरणार्थ इंद्र–वृत्र लढाई, दाशराज्ञ युद्ध, इंद्र-पणि संघर्ष, आर्य-दस्यू संघर्ष, अशी काही उदाहरणे ऋग्वेदात नक्कीच आढळतात. पण आर्यांनी भारताच्या बाहेरून येऊन आक्रमण केले, त्या युद्धात आर्य जिंकले, त्या ठिकाणचे मूलनिवासी हरले, मूलनिवासींना आर्यांनी तिथून हाकलून लावले, इत्यादि दावे सिद्ध करणारे संदर्भ मात्र यांच्यात कुठेही मिळत नाहीत. मग या पाश्चात्त्य विद्वानांनी नेमके कशाच्या आधारावर हे दावे केले, हे सांगणे म्हणजे या पाश्चात्त्य विद्वानांचे उघड असलेले गुपित फोडण्यासारखे आहे! काय सांगतात या युद्धांच्या कथा? क्रमाक्रमाने आढावा घेऊया.


इंद्राची लोकप्रियता


इंद्र ही देवता वैदिक ऋषींची अत्यंत लाडकी असावी, असेच चित्र ऋग्वेदात दिसते. खरे तर त्या काळापासून अग्नी ही सर्वाधिक पवित्र देवता मानली गेलेली आहे. त्यामुळे यज्ञातल्या आवाहनाचा पहिला मान, स्तवनाचा पहिला मान, पहिल्या आहुतीचा मान हा अग्नीलाच मिळालेला दिसतो. त्यानंतर पुढची लोकप्रिय देवता मात्र इंद्रच दिसते. ऋग्वेदात एकूण सुमारे १०२८ सूक्ते आहेत. पैकी २००हून अधिक सूक्ते अग्नीची आहेत. परंतु इंद्राची सूक्ते मात्र त्याहूनही अधिक, म्हणजे सुमारे २५०हून अधिक आहेत. अर्थात सुमारे एक-चतुर्थांश ऋग्वेद हा इंद्राच्याच कौतुकाने भरलेला दिसतो. ऋग्वेदाच्या सर्व मंडलांची सुरुवात ‘अग्नी’ देवतेच्या सूक्तांनी होते. पण त्यानंतर लगेचच पुढची अनेक सूक्ते मात्र इंद्राचीच दिसतात. अग्नी जरी सर्वाधिक पवित्र देवता मानली गेली असली, तरी सर्वाधिक लोकप्रिय देवता मात्र इंद्रच असल्याचे यातून लक्षात येते. आणि का असू नये? इंद्राने केलेले अनेक पराक्रम त्याच्या असंख्य सूक्तांमधून आपल्याला दिसतात. जीवावरच्या मोठ्या संकटांमधून वाचवण्यासाठी इंद्राचा धावा काही मंत्रांमधून जसा केलेला दिसतो, तशी छोट्या छोट्या अडचणींमधून सोडवण्यासाठी सुद्धा इंद्राचीच विनवणी केलेली दिसते. या पराक्रमांच्या यादीतला एक मोठा उल्लेखनीय पराक्रम म्हणजे इंद्राने वृत्रासुराचे केलेले निर्दालन!


इंद्र–वृत्र लढाई

देवांचा राजा ‘इंद्र’ आणि ‘वृत्र’ नावाचा एक असुर यांच्यातील लढाईचे असंख्य उल्लेख सुट्या सुट्या मंत्रांमधून साऱ्या ऋग्वेदात पसरलेले आढळतात. शिवाय या लढाईची तपशीलवार वर्णनेही काही सूक्तांत दिसतात. उदाहरणार्थ म्हणून ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलामधले ‘हिरण्यस्तूप आंगिरस’ ऋषी प्रणीत एक सूक्त घेऊ. यातल्या एकूण १५ ऋचांपैकी निवडक काही ऋचा (मंत्र) पाहूया. ऋषी म्हणतात:


इन्द्रस्य नु वीर्याणि प्र वोचं यानि चकार प्रथमानि वज्री । अहन्नहिमन्वपस्ततर्द प्र वक्षणा अभिनत्पर्वतानाम् ॥ ऋग्वेद १.३२.१ ॥ “वज्रधारी इंद्राने पूर्वी केलेल्या पराक्रमांचे मी वर्णन करतो. त्याने ढगांना फोडले, पर्वतांमध्ये अडकून पडलेले पाणी मोकळे केले, नद्या प्रवाहित केल्या” ॥१॥


अहन्नहिं पर्वते शिश्रियाणं त्वष्टास्मै वज्रं स्वर्यं ततक्ष । वाश्रा इव धेनवः स्यन्दमाना अञ्जः समुद्रमव जग्मुरापः ॥ ऋग्वेद १.३२.२ ॥ “इंद्रासाठी ‘त्वष्टा’ देवतेने आवाजाने चालवले जाईल असे ‘वज्र’ तयार केले. पर्वताच्या आश्रयाने राहिलेल्या ढगांना त्या वज्राच्याच मदतीने इंद्राने फोडले. त्यातून मोकळे झालेले पाणी वेगाने समुद्राकडे प्रवाहित झाले, जशा मोकळ्या झालेल्या गायी हंबरत आपल्या वासरांकडे धाव घेतात” ॥२॥


अहन्वृत्रं वृत्रतरं व्यंसमिन्द्रो वज्रेण महता वधेन । स्कन्धांसीव कुलिशेना विवृक्णाहिः शयत उपपृक्पृथिव्याः ॥ ऋग्वेद १.३२.५ ॥ “इंद्राने अतिशय घातक अशा दिव्य वज्राने वृत्रासुराचा वध केला. कुऱ्हाडीने तोडलेले झाड खाली कोसळावे, तसे इंद्राने वृत्राचे हात-पाय तोडले आणि वृत्रासुर जमिनीवर कोसळला” ॥५॥


अपादहस्तो अपृतन्यदिन्द्रमास्य वज्रमधि सानौ जघान । वृष्णो वध्रिः प्रतिमानं बुभूषन्पुरुत्रा वृत्रो अशयद्व्यस्तः ॥ ऋग्वेद १.३२.७ ॥
“हात-पाय तोडले जाऊन सुद्धा वृत्राने इंद्राशी युद्ध करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. इंद्राने मग पर्वताप्रमाणे दिसणाऱ्या त्याच्या खांद्यांवर वज्राने प्रहार केले, तरीही वृत्रासुर डगमगला नाही. पण शेवटी इंद्राच्या आघातांनी तो पुरता ध्वस्त झाला” ॥७॥


नास्मै विद्युन्न तन्यतुः सिषेध न यां मिहमकिरद्ध्रादुनिं च । इन्द्रश्च यद्युयुधाते अहिश्चोतापरीभ्यो मघवा वि जिग्ये ॥ ऋग्वेद १.३२.१३ ॥ “वृत्राने प्रेरित भीषण विद्युल्लता, भयंकर मेघ गर्जना, पाऊस आणि हिमवर्षाव सुद्धा इंद्राला रोखू शकले नाहीत. वृत्राचे जीवघेणे वार सुद्धा निष्प्रभ झाले. या लढाईत वृत्राचा प्रत्येक वार इंद्राने अडवला आणि शेवटी त्याला जिंकले” ॥१३॥


केवळ उदाहरणादाखल म्हणून इथे या सूक्तातले १५ पैकी हे पाचच मंत्र दिलेले आहेत. इच्छुकांनी पूर्ण सूक्त मुळातून अवश्य वाचावे. या संपूर्ण सूक्तात इंद्र आणि वृत्राच्या लढाईचे वर्णन आले आहे. वृत्रासुराने काळ्या डोंगरात पाणी अडवून धरले, तेव्हा इंद्राने आपल्या वज्राने प्रहार करून त्याचा वध केला आणि ते पाणी मोकळे केले. त्यातूनच मग नद्या वाहू लागल्या. अशी ही इतकी साधी आणि सरळ इंद्र–वृत्र लढाईची कथा आहे. त्यातून ‘आर्यांच्या बलाढ्य सेनेने इंद्राच्या नेतृत्वाखाली सिंधू खोऱ्यातल्या नगरांवर हल्ला केला, त्यांचा धुव्वा उडवला, असंख्य मूलनिवासींना मारले आणि उरलेल्यांना तिथून हाकलून दिले’, असा अर्थ कुठून निघतो? अनेक अभ्यासकांच्या मते तर ही कथा म्हणजे, ‘काळ्या ढगांमध्ये पाणी साठून राहते, तेव्हा पर्जन्याचा देव इंद्र आपल्या वज्राने - म्हणजे विद्युल्लतेने त्यावर प्रहार करून ते पाणी मोकळे करतो. त्यातून मग नद्या वाहू लागतात आणि त्या समुद्राला जाऊन मिळतात’, या नैसर्गिक घटनेचेच जणू रूपकात्मक काव्य आहे! ऋग्वेदात पुढेही अजून काही सूक्तांत हीच कथा थोड्याफार फरकाने अशीच आढळते. वेदात वर्णन केलेल्या लढाया आणि आर्यांची आक्रमणे शोधायला आवर्जून निघाल्यावर अशा काही लढाया दिसतात तर खऱ्या, पण वर म्हटल्याप्रमाणे त्यातून आर्यांच्या आक्रमणाचा पुरावा मात्र कुठे मिळताना दिसत नाही. ऋग्वेदातल्या लढायांचा शोध यापुढे असाच चालू ठेवूया आणि बघूया मूलनिवासींच्या विध्वंसाला इंद्र खरेच कितपत दोषी ठरतो ते!


- वासुदेव बिडवे
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.