टिळक गेले त्या वेळची गोष्ट...(पूर्वार्ध)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2020
Total Views |

lokmanya tilak_1 &nb



2८ जुलैला रात्री टिळक म्हणाले, “१८१८ साली असे झाले, परवा हे १९१८ साल आले - hundred years history, आम्ही असे दीन झालो. पेशवाई गेली आणि इंग्रज आले.” गोर्‍यांच्या जुलमी पारतंत्र्याचे हे शल्य टिळकांच्या हृदयात अत्यंत खोलवर रुतून बसले होते. अखेरच्या क्षणीही त्यांच्या मनाला खेद वाटत होता तो, या पारतंत्र्याचा. पण, यावर आपण मात करणार, असा दुर्दम्य आशावाद याच महापुरुषाने भारतीयांच्या मनात जागवला होता. २९ जुलैच्या रात्री १ वाजता एखाद्या व्याख्यानाच्या थाटात बोलावे तसे टिळक उसळले आणि म्हणाले, “माझी अशी खात्री आहे आणि आपणही असा विश्वास बाळगा की, हिंदुस्तानला स्वराज्य मिळाल्याखेरीज तरणोपाय नाही.”



लखनौ करारानंतर चिरोलवर खटला भरण्यासाठी टिळक विलायतेला गेले. प्रचंड खटपट करून चिरोलवर खटला भरण्यासाठी आपण जात असलो तरी निकाल आपल्या बाजूने लागेलच, याबद्दल टिळकांना फारशी खात्री नव्हतीच. झालेही तसेच, निकाल त्यांच्या विरुद्ध लागला. या खटल्यात टिळकांचे पदरचे सुमारे दोन अडीच लाख रुपये गेले होते. इकडे भारतात लगेचच हा खर्च भरून काढण्यासाठी फंड गोळा करायला लोकांनी सुरुवात केली. टिळक भारतात परत येईपर्यंत जमलेला निधी होता, तब्बल अडीच लाखांचा...!



टिळक भारतात परत आले आणि त्याच दिवशी मुंबईत शांतारामच्या चाळीत त्यांच्या स्वागतासाठी भव्य सभा भरवण्यात आली. कामगार संघटनांनी त्यांचा सत्कार केला, गिरणी कामगारांनी त्यांना मानपत्रे दिली. शिवाय पुण्यात तर त्यांचे स्वागत हत्ती आणि घोडे यांनी सजवलेल्या ताफ्याने करण्यात आले. पुणे नगरपालिकेच्या वतीने त्यांना जाहीर मानपत्र अर्पण करण्यात आले. एखाद्या नगरपालिकेने एखाद्या नेत्याला जाहीरपणे मानपत्र अर्पण करावे, ही ब्रिटिशांच्या राज्यातल्या पारतंत्र्य भारतात पहिलीच वेळ होती, हे महत्त्वाचे!


टिळकांसाठी भारतात जितका निधी स्वयंस्फूर्तीने लोकांनी गोळा केला, तेवढा निधी इतर कुणासाठी क्वचितच जमा झाला असेल. टिळकांच्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी महाराष्ट्राने एकत्रित जमवून त्यांना दिलेली थैली थोडीथोडकी नव्हती. तब्बल एक लाख रुपयांची रक्कम होती ती! नंतर थोड्याच काळात ही चिरोल केसच्या नुकसानभरपाईची रक्कम! भारतातून परतल्यानंतर हा पैसा स्वीकारताना टिळक म्हणाले होते, “लोकहो, हा निधी गोळा करून आपण मला खरोखर विकत घेतले आहे.”


टिळक आता फक्त ‘बळवंतराव’ किंवा ‘बाळ गंगाधर’ राहिले नव्हते, तर ते ‘लोकमान्य’ झाले होतेच. पण, त्याहीपलीकडे ते लोकांचे ‘टिळक महाराज’ झाले होते. महिला, पुरुष, तरूण पोरं, म्हातारे, बापडे सगळेच जण स्वतःला विसरून टिळक जातील तिथे लाखोंनी गर्दी करत होते. बायका आपापली तान्ही पोरे टिळकांच्या पायावर ठेवत. अमृतसर काँग्रेसच्या वेळी तर टिळकांच्या नुसत्या दर्शनासाठी लाखो स्त्रिया मंडपाच्या बाहेर उभ्या होत्या. टिळक महाराजांचा नुसता पदस्पर्शसुद्धा एखाद्या संजीवनी बुटीसारखा वाटायला लागला होता. हे झाले सामान्यांचे, यावेळी साहित्यिक, कवी, नाटककारांचे काय चालले होते? टिळक महाराजांच्या शौर्यकथा घराघरातल्या आया आपल्या लेकरांना सांगू लागल्या. भारतीय कवींच्या प्रतिभेला देशभक्तीचे पाझर फुटले. टिळकप्रेमाने नटलेल्या बहारदार कविता लिहिल्या जाऊ लागल्या. वीररसाने भारलेली नाटके रचली रचून रंगभूमीवर त्याचे प्रयोग हाऊसफुल झाले. नाटक कंपन्यांनाही टिळकांची नावे दिली जाण्याचा काळ होता तो... किर्लोस्कर नाटक कंपनीतून वेगळे झाल्यानंतर चिंतामणराव कोल्हटकर, दिनानाथ मंगेशकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांनी एकत्र मिळून ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’ ही संस्था काढली, तेव्हा तिला दिलेलं ’बलवंत’ हे नाव टिळकांना समोर ठेवूनच सुचलेलं होतं.


एका गावात टिळक आले आहेत, हे कळल्यानंतर चालू नाटक अर्ध्यावर टाकून सगळे लोक नाट्यगृह सोडून निघाले, ते थेट टिळकांच्या दर्शनाला! नाटक थांबवावे लागले. इतकं पुरेसं नाही म्हणून टिळकांच्या विचारांचं आणि कृतींचं दर्शन व्हावं, या हेतूने त्या काळात दत्तोपंत पटवर्धन यांच्यासारख्या कीर्तनकार मंडळींनी टिळक चरित्राची आख्याने लावायला सुरुवात केली होती. ज्या कीर्तनाच्या संमेलनांना जाऊन टिळकांनी स्वतःच राष्ट्रीय कीर्तनाचा नवा पायंडा आपल्या देशात पाडला होता, त्याच कीर्तन माध्यमाचा महत्त्वाचा विषय टिळक स्वत:च होऊन बसले होते. गोपाळ विनायक उर्फ आप्पासाहेब भोंडे हे नाव आजच्या तरुणांच्या गावीही नसेल, पण ते आपल्याकडचे आद्य नकलाकार. त्या काळामध्ये भोंडे हे पुढार्‍यांच्या हुबेहूब नकला करत. टिळकांची नक्कल करण्यात तर त्यांचा हातखंडा होता किंवा टिळकांची नक्कल करण्यामुळेच ते महाराष्ट्रामध्ये ‘नकलाकार’ म्हणून प्रसिद्ध झाले, असे म्हणायला हरकत नाही. कथा, कविता, कीर्तन, नाटक, नकला या सगळ्याचा विषय ‘टिळक महाराज’ झाला असताना चित्रपट तरी कसा मागे राहील? भारतात चित्रपट कला रुजण्याचा तो काळ. अशातच चित्रमहर्षी बाबूराव पेंटर पुढे सरसावले आणि त्यांनी मुंबईला काँग्रेसच्या विशेष अधिवेशनात लोकमान्यांचे चित्रीकरण केले. पुरेसे भांडवल हाताशी नसतानाही तानीबाई कागलकर यांनी पैसा पुरवला आणि ही फिल्म पूर्ण झाली. लोकमान्य टिळक भाषण करताहेत, या प्रसंगाची ती फिल्म होती. पुढे बाबूराव पेंटर यांनी ‘सैरंध्री’ या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केली. पुण्यात त्याच्या प्रयोगाला खुद्द टिळक आले आणि त्यांनी सुवर्णपदक देऊन बाबूरावांचा सन्मान केला. या सगळ्या कलांचा वापर राष्ट्र्जागृतीकडे करून घेण्याचा टिळकांचा मानस होता हे वेगळे सांगायला नको.


टिळक लोकमान्यतेच्या शिखरावर होते. विलायतेच्या टिळकांच्या प्रवासाने त्यांना दिलेला क्षीण फक्त शारीरिक नव्हता, मानसिकही होता. भारतात परतल्यावर सरकारला सहकार्य करण्याच्या मुद्द्यावर टिळकांनी ‘प्रतियोगी सहकारिता’ हा शब्द मोठ्या कल्पकतेने आणि खुबीने वापरला. गांधींचे आणि टिळकांचे यावरून वाजलेही. तरी शौकत अली, महमंद अली टिळकांच्या सोबत होते. शौकत अली तर “टिळक हे माझे राजकीय गुरु आहेत,” असे जाहीरपणे सांगत. अजमेरच्या ख्वाजा दर्ग्यात मुसलमान बंधूंनी ‘टिळक महाराज की जय’ असा जयजयकार करून टिळकांचा सत्कार मोठ्या गर्दीने केला होता. बर्‍याच खटपटीनंतर आतातरी हिंदू-मुसलमान एकत्रित ब्रिटिशांशी लढतील, इथवर टिळकांनी तयारी करून ठेवली होती. शिवाय ब्राह्मणेतर चळवळीला स्वराज्याच्या मार्गाला लावण्यात विठ्ठल रामजी शिंदे टिळकांच्या बाजूने उभे होते.
राजकारण ऐन रंगात आले होते, मतभेदाचे मळभही दूर झाले होते. या सगळ्यात ‘ताईमहाराज’ प्रकरण’ तेवढे टिळकांची पाठ सोडेना. केळकरांच्या म्हणण्याप्रमाणे टिळकांचे रक्त आटवणाराच प्रकार होता तो! त्याचा शेवटचा निकाल लावण्यासाठी टिळक पुण्याहून निघाले. निघताना त्यांना अंमळ ताप होताच, पण अंगाच्या तपापेक्षा ‘ताईमहाराज प्रकरणा’ने त्यांच्या डोक्याला जो ताप दिला होता, त्याचे निवारण महत्त्वाचे होते. त्यासाठी त्यांची धडपड चालली होती. यावेळी मात्र दैवही अनुकूल होते. टिळकांच्या प्रयत्नाला यश आले, सत्व उजळले, ‘ताईमहाराज प्रकरणा’चा निकाल टिळकांच्या बाजूने लागला, टिळक मोकळे झाले, डोक्याचा एक ताप गेला, पण अंगाचा मात्र वाढला.


२० जुलै रोजी दिवान चमनलाल टिळकांना भेटायला आले, तेव्हाही त्यांची तब्येत बरी नव्हतीच. चमनलालांच्या आग्रहावरून टिळक त्यांच्या गाडीत बसले. मोटार मात्र वरून उघडी होती, हवापालटाने टिळकांना बरे वाटेल, या आशेने चमनलाल यांनी टिळकांना कुलाब्याची सफर घडवून आणली खरी. पण, झाले मात्र उलटेच! रात्रीतून टिळकांचा ताप जास्तीच वाढला. न्युमोनियाची लक्षणे स्पष्ट दिसू लागली. तापाने १०४ डिग्री गाठली. हळूहळू टिळकांची शुद्ध हरपू लागली. तरीही इतक्यात आपल्याला काही होत नाही, असेच टिळक आपल्या बोलण्यातून दाखवत होते. पुण्याहून मुलगा श्रीधर आला. टिळक त्यालाही म्हणाले, “मला काही झाले नाही, तुला मात्र मुंबई पाहण्याची भारी हौस. त्यासाठी आलास माझ्या आजाराचे निमित्त करून!” आल्यागेलेल्या लोकांसोबत ते हास्यविनोद करत. भेटायला आलेल्या आपल्या मुलींना पाहून टिळक म्हणाले, “पुन्हा सगळ्या जमल्या का तुम्ही? तुम्हाला उठसूट माहेरी यायची सवयच आहे!” त्यांचे भाचे धोंडोपंतांना तर टिळक म्हणालेच, “काळजी नको करुस धोंडू, अजून पाचेक वर्ष मी मरत नाही.”


कौटुंबिक बाबीत टिळकांचा जीव अजिबात अडकलेला नव्हता, टिळक तर आसुसले होते ब्रिटिशांशी नव्या दमाने दोन हात करण्यासाठी... त्यांची स्वातंत्र्याकांक्षा अत्यंत प्रबळ होती. त्यांचे नातू ग. वि. केतकर यांनी लिहिल्याप्रमाणे टिळक जे बोलत होते, ते देशाच्या राजकारणाचेच होते. आपल्या पारतंत्र्याचीच काळजी त्यांना लागली होती, स्वातंत्र्याची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांची शेवटची काही वाक्ये ग. वि. केतकरांनी आठवणीत दिली आहेत. २८ जुलैला रात्री टिळक म्हणाले, “१८१८ साली असे झाले, परवा हे १९१८ साल आले, - hundred years history, आम्ही असे दीन झालो. पेशवाई गेली आणि इंग्रज आले.” गोर्‍यांच्या जुलमी पारतंत्र्याचे हे शल्य टिळकांच्या हृदयात अत्यंत खोलवर रुतून बसले होते, अखेरच्या क्षणीही मनाला खेद वाटत होता तो या पारतंत्र्याचा. पण, यावर आपण मात करु, असा दुर्दम्य आशावाद याच महापुरुषाने भारतीयांच्या मनात जागवला होता. २९ जुलैच्या रात्री १ वाजता एखाद्या व्याख्यानाच्या थाटात बोलावे तसे टिळक उसळले आणि म्हणाले, “माझी अशी खात्री आहे, आणि आपणही असा विश्वास बाळगा की, हिंदुस्तानला स्वराज्य मिळाल्याखेरीज तरणोपाय नाही.” लगेचच २ वाजता अस्पष्टपणे ते म्हणाले, “आपण व जनता यांनी जे परिश्रम केले, त्याबद्दल मी आपले आभार मानतो.” यापुढचे टिळकांचे बोलणे फारसे नीट आणि स्पष्ट ऐकू येईल, असे राहिले नाही.


टिळकांच्या आजाराची बातमी एव्हाना भारतभर पसरली. टिळकांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून लोक प्रार्थना करू लागले. मुंबईच्या ज्या सरदारगृहात टिळक होते, त्यांच्या मालकांनी पूजाअर्चा सुरु केल्या. टिळकांना बरे वाटावे म्हणून लोकांनी उत्स्फूर्तपणे दानधर्म सुरु केला. देवपूजा, रुद्राभिषेक, शांतीपाठ, जप यांतून मिळालेल्या राक्षांच्या पुड्या सरदारगृहाच्या दिशेने निघाल्या. ज्योतिष्यांकडून कुंडल्या पाहून उपाय सांगायला सुरुवात झाली. अच्युत बळवंत कोल्हटकर तर टिळकांच्या तब्येतीची बातमी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांच्या ‘संदेश’ वर्तमानत्राचा संध्याकाळचा अंक काढायला लागले. गेल्या दोन दिवसांत मुंबईच्या तार खात्याला टिळकांची तब्येत कळवणे, याशिवाय दुसरे कामच राहिले नव्हते. मुंबईतले सगळेच्या सगळे डॉक्टर गेल्या आठेक दिवसांपासून आपापली रुग्णालये बंद ठेवून २४ तास टिळकांच्या तब्येतीसाठी सरदारगृहात मुक्काम ठोकून होते. टिळक मात्र फारसा प्रतिसाद देत नव्हते. माणूस ओळखत नव्हते. केव्हा काय होईल, सांगता येत नव्हते. 31 जुलैची ती रात्र होती. टिळक कासावीस झाले होते. त्यांच्या मणक्यातील पातळ पदार्थ काढला तर बरे वाटेल, या आशेने तो द्रवही काढून टाकण्यात आला. दादासाहेब खापर्डेंनी आल्याच्या रसातून हेमगर्भाची मात्रा चाटवली. पण, सारेच व्यर्थ! हळूहळू सगळ्यांचाच धीर सुटत चालला होता. सरदारगृहात मंत्रपठण करणार्‍या ब्रह्मवृंदाने दर्भाचे उच्चासन तयार केले. त्यावर या कर्मयोगेश्वराला ठेवण्यात आले. मंत्रपठण टिपेला पोहोचले असता, एकदम शांतता झाली. दादासाहेब खापर्ड्यांनी तर हंबरडाचं फोडला. आपले दोन्ही हात उंचावत ते मोठ्याने ओरडले, “दुसरे रामदास स्वामी गेले!”


भाबड्या आशेने म्हणा किंवा कशानेही, या सगळ्या धावपळीत ३०तारखेला कुणीतरी टिळकांना जागं करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या गीतेचे रहस्य टिळकांना पुरेपूर उमगले होते, त्या गीताकर्त्याचा म्हणजेच श्रीकृष्णाचा फोटो कुणीतरी टिळकांच्यासमोर धरला आणि “हे काय आहे?” म्हणून त्यांना विचारले. टिळकांना ग्लानी आलेली होती. बराच वेळ निरखून पाहिल्यावर टिळक म्हणाले, “हे श्रीकृष्णाचे चित्र आहे. त्याच्या चरित्राचे सर्वांनी अनुकरण करावे.” नंतर लगेचच त्यांनी हात जोडले आणि त्या ग्लानीत टिळक श्लोक म्हणू लागले. तो श्लोक साक्षात गीतेचा होता. श्लोक म्हणून संपला आणि टिळकांचे डोळेच झाकले गेले. हात खाली पडले. प्रकृती क्षीण झाली. टिळकांचे बोलणेच बंद झाले. नंतरचे अखेरचे दोन दिवस टिळक काहीही बोलले नाहीत. त्यांच्या मुखातून निघालेला शेवटाचा श्लोक होता श्रीकृष्णाचा. या कर्मयोगेश्वराच्या, लोकमान्याच्या मुखातून निघालेले शेवटचे शब्द होते-
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥


- पार्थ बावस्कर
(क्रमशः)
@@AUTHORINFO_V1@@