'काटेरी’ ते ’रुपेरी’ अभिनयाचा गड...

    दिनांक  06-Jun-2020 20:46:40
|

jayashri gadkari_1 &आपल्या सौंदर्य, अभिनय, नृत्य, सामाजिक बांधीलकी व समंजस वागणूक या गुणांमुळे ओळखल्या जाणार्‍या, तसेच तमाशाप्रधान चित्रपटातल्या मादक, नखरेल कलावंतिणीपासून घरंदाज, कुलवंत ब्राह्मण कन्येपर्यंत अनेक भूमिकांमधून आपले सर्वस्व ओतणारी ही कलावती म्हणजे अभिनयसंपन्न जयश्री गडकर...


चित्रपट तयार होत असतात, त्यावेळी त्यात अनेकांची मेहनत असते. काही दिग्गज कलावंतांचे आत्मचरित्र वाचत असताना सिनेमाच्या मागे असणारी त्यांची प्रामाणिक साधना व त्यावेळी त्यांनी केलेली मेहनत दिसून येते. असाच एक प्रकार माझ्या वाचनात आला. ’मोहित्यांची मंजुळा’ या चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण होते. त्यात काम करणार्‍या मुख्य अभिनेत्री आजारी पडल्या होत्या.अशावेळी काय करायचे, हा मोठा प्रश्न सर्वांसमोर होता. शूटिंग होईल की नाही हे निश्चित नव्हते. भालजींच्या आदेशावरून काहीशा अनिच्छेनेच त्या अभिनेत्री गाणे ऐकायला तयार झाल्या. पण, ते गाणे ऐकताक्षणीच त्यांची अस्वस्थता व आजारपण कुठच्या कुठे पळून गेले. गाणे ऐकून त्या अभिनेत्री एकदम प्रफुल्लित झाल्या आणि तातडीने चित्रीकरणासाठी उभ्या राहिल्या. ते गाणे होते ’बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला...’ या गाण्याने व सिनेमाने पुढे इतिहास घडविला. या गाण्याबरोबरच तीक्ष्ण निरीक्षण आणि अफाट ग्रहणशक्ती तसेच एकांतप्रिय स्वभावामुळे ‘त्या’ भूमिकांवर मनस्वी चिंतन करून
दर्जेदार भूमिका करायच्या. चित्रपटसृष्टीत कोणीच ‘गॉडफादर’ नसल्यामुळे त्यांनी स्वत:च स्वत:ला घडवलं. उपजत साधेपणा, सौंदर्य, नृत्यकुशलता, अभिनयातील सहजता यांमुळे मिळालेल्या सर्व भूमिका एकापेक्षा एक सरस सादर केलेल्या, त्या गुणी अभिनेत्री म्हणजे साक्षात सर्वगुणसंपन्न कलाकार जयश्री गडकर.
जयश्री गडकर यांचा जन्म १९४२ मध्ये कर्नाटकच्या कारवार जिल्ह्यातल्या सदाशिवगड या गावी एका सामान्य कुटुंबात झाला. मूळच्या मीना, नंतर जया व नंतर जयश्री या नावाने त्या ओळखल्या जाऊ लागल्या. त्या पाच वर्षांच्या असतानाच हे कुटुंब मुंबईला आल्यामुळे त्यांचं पुढचं सगळं शिक्षण मुंबईला झालं. मुंबईत खेतवाडीतल्या महानगरपालिकेच्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढे गिरगावच्या राममोहन हायस्कूलमधून त्यांनी शालांत परीक्षा दिली. शिक्षणाची आवड असूनही त्यांना फार शिक्षण घेता आले नाही. मात्र, लहानपणापासून त्यांना गाण्याची आवड होती. ताल-सुरांचे उपजत ज्ञान होते आणि गळाही गोड होता. त्यामुळे मास्टर नवरंग यांच्याकडे त्या गाणे शिकल्या. कॉलेज शिक्षण मात्र त्यांच्या नशिबात नव्हतं. पण, लहानपणापासून आपल्या भविष्याविषयीची स्वप्नं रंगवणं त्यांना खूप आवडायचं. कलाक्षेत्राकडे त्यांचा विशेष ओढा होता. लहान असताना चोरून सिनेमा पाहिल्याच्या आठवणीही जयश्रीबाई सांगतात. खाऊच्या पैशातून आठ-दहा दिवसांतून एक तरी चित्रपट पाहिला जात असे, पण एकदा आईच्या पर्समधून पैसे घेऊन चित्रपट पाहण्याचं धाडस मात्र चांगलंच अंगाशी आलं. कारण, आईनं तापत्या पलित्यानं डागलं आणि तेव्हापासून चोरून सिनेमा पाहणं बंद झालं, पण त्यानंतर नृत्याचं शिक्षण सुरू झालं. जयश्रीबाई गोपीकृष्णांकडून कथ्थक शिकल्या. पुढे त्यांनी गाण्याचेही धडे घेतले. गणेशोत्सवात नाटकं करता करताच जयश्रीबाई हौशी रंगभूमीवर सहजपणे वावरू लागल्या. पण, पुढे मात्र सिनेमा आणि नाटक अशी कसरत न करता केवळ चित्रपटांवर त्यांनी आपलं सारं लक्ष केंद्रित केलं.जयश्री गडकर यांनी १९५०-१९५४ या काळात हौशी रंगभूमीवर काम केले. याच काळात त्या शास्त्रीय नृत्यही शिकल्या. जयश्री गडकर यांनी सुरुवातीच्या काळात राजकमल कलामंदिरात नोकरी केली. याच काळात व्ही. शांताराम यांना आपल्या ‘झनक झनक पायल बाजे’ (१९५५) या चित्रपटासाठी एका समूहनृत्यात सहनर्तिका हव्या होत्या. संध्या या चित्रपटाची नायिका होत्या. व्ही. शांतारामसारखे दिग्दर्शक आणि सप्तरंगी हिंदी चित्रपट या आकर्षणामुळे त्यांनी या चित्रपटात समूहनृत्यातून आपली नृत्यकला सादर केली. या नृत्याने त्यांना ‘दिसतं तसं नसतं’ या चित्रपटात एका नृत्यासाठी काम मिळाले. मात्र, केवळ नृत्य करण्याइतकी भूमिका करायची नाही, असे त्यांनी या चित्रपटानंतर ठरवले. यानंतर ‘गाठ पडली ठका ठका’ या चित्रपटात नायिका म्हणून त्यांना प्रथमच भूमिका मिळाली. २१ मार्च १९५६ या दिवशी त्या नायिका म्हणून पडद्यावर आल्या, याच दिवशी योगायोगाने त्यांनी वयाची १६वर्षे पूर्ण केली. १९५७ साली फिल्मिस्तानच्या ‘आई मला क्षमा कर’ आणि ‘पहिलं प्रेम’ या चित्रपटातून त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. फिल्मिस्तानचा पहिला चित्रपट होता ‘आलिया भोगासी.’ या चित्रपटात जयश्री गडकर यांनी राजा गोसावींबरोबर प्रमुख भूमिका केली आणि नंतरच्या कारकिर्दीत राजा गोसावींबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांतून नायिकेच्या भूमिका केल्या, त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.‘सांगत्ये ऐका’ (१९५९) या चित्रपटात जयश्री गडकर यांनी तमासगिरीणीची भूमिका रंगवली. हा चित्रपट मराठीतला सर्वात जास्त चालणारा चित्रपट ठरला. त्यातल्या ‘बुगडी माझी सांडली गं..’ या लावणी नृत्याने जयश्री गडकर यांना मराठी चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट ‘नृत्यांगना’ म्हणून कायमचे स्थान मिळाले. चित्रपट रसिकांना ही लावणी अजूनही भुरळ घालते. पुण्यात विजयानंद चित्रपटगृहात हा चित्रपट सलग १३२ आठवडे चालला. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरला. १९५९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अनंत माने. याच चित्रपटातल्या भूमिकेने जयश्रीबाईंना ‘रसरंग फाळके पुरस्कार’ मिळवून दिला. त्यानंतर जयश्री गडकर यांनी जवळपास पन्नास वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवले. तमाशापटांबरोबरच अनेक कौटुंबिक, भावनाप्रधान, विनोदी, ऐतिहासिक चित्रपटांतूनही त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. एक चतुरस्र कलाकार म्हणून त्यांनी मराठी चित्रपटात आपला अमीट ठसा उमटवला. दरम्यानच्या काळात त्यांनी ‘एक अरमान मेरा’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला. अभिनेते अशोककुमार यांच्याबरोबर नायिकेची भूमिका असलेला ‘प्रायव्हेट सेक्रेटरी’ हा त्यांचा चित्रपट रसिकांच्या आजही लक्षात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत धार्मिक, पौराणिक चित्रपटात त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या. तसेच ‘सारंगा’ चित्रपटातील ‘सारंगा तेरी याद में...’ हे गाणेही रसिकांच्या स्मरणात आहे.


मराठीत या काळात त्यांनी ‘सवाल माझा ऐका’, ‘साधी माणसं’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘युगे युगे मी वाट पाहिली’, ‘घरकूल’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘पाटलाची सून’, ‘अवघाची संसार’, ‘मोहित्यांची मंजुळा’ इ. महत्त्वाच्या चित्रपटांतून प्रमुख भूमिका केल्या. चित्रपट क्षेत्रातल्या त्यांच्या लोकप्रियतेबरोबर याच चित्रपटातील भूमिकांमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवले. १९६१ साली प्रदर्शित झालेल्या ‘मानिनी’ चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वप्रथम ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला. जयश्री गडकर यांनी यापूर्वी चित्रपटातून विशेषत: तमासगिरीणीच्या भूमिका केल्या होत्या. त्या नृत्यकुशल अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. ‘मानिनी’तल्या सोज्ज्वळ, सात्त्विक, स्वाभिमानी ब्राह्मणकन्येची भूमिका जयश्री निभावेल का, असा प्रश्न त्या काळात चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांना पडला होता. मात्र, या भूमिकेतही आपल्या सात्त्विक सौंदर्याने, मृदू व्यक्तिमत्त्वाने, अभिनयकौशल्याने जयश्री गडकर यांनी अभिनय क्षेत्रातील आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले. १९६४साली ‘सवाल माझा ऐका’, १९६५साली ‘साधी माणसं’, १९६६ साली ‘पवनाकाठचा धोंडी’ या चित्रपटांसाठी सलग राष्ट्रीय पुरस्कार मिळवून त्यांनी ‘हॅट्ट्रिक’ साधली.महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवातही ‘साधी माणसं’, ‘पाटलाची सून’, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘घर गंगेच्या काठी’ या चित्रपटातील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. ‘घरकूल’ चित्रपटासाठी १९७१साली ‘विशेष अभिनेत्री’चा पुरस्कार देऊन राज्य सरकारने त्यांच्या समर्थ अभिनयाची, एकूण चित्रपट कारकिर्दीची वेगळी दखलही घेतली. साधारण १९५० ते १९६०या कृष्णधवल चित्रपटाच्या काळात जयश्रीबाईंनी भालजी पेंढारकर, राजा परांजपे, अनंत माने, दिनकर द. पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजा ठाकूर, गजानन जागीरदार, वसंत पेंटर यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांकडे काम केले. प्रत्येकाची वेगळी दिग्दर्शनशैली त्यांनी अनुभवली. त्यांनी राजा गोसावी, सूर्यकांत, चंद्रकांत, अरुण सरनाईक या सहकलाकारांबरोबर केलेल्या भूमिका विशेष गाजल्या. व्यक्तिरेखेच्या मागणीनुसार शिकत राहणे, परिश्रम घेत राहणे हा त्यांचा स्थायीभाव होता. भालजी पेंढारकरांच्या ‘साधी माणसं’ या चित्रपटासाठी त्यांनी लोहाराचा भाता चालवण्याचे तंत्र अवगत केले आणि मगच त्या कॅमेर्‍यासमोर गेल्या. भाता चालवतानाचे ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे..’ हे गाणे अजरामर ठरले. आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी २५०चित्रपटांतून भूमिका केल्या. स्त्रीचा स्वाभिमान, स्त्रीचा सूड, स्त्रीची माया-ममता अशा सगळ्या भावभावनांना त्यांनी पडद्यावर संवेदनशीलपणे जिवंत केले. याचबरोबर चित्रपट क्षेत्राशी निगडित असणार्‍या ध्वनी, संकलन, चित्रीकरण, प्रकाशयोजना या तांत्रिक बाबीही त्या शिकत गेल्या. हिंदी, गुजराती, मारवाडी, पंजाबी, भोजपुरी, कन्नड, तेलगू या भाषांतील चित्रपटांतूनही त्यांनी अभिनय केला. शहरी तसेच ग्रामीण, मराठमोळ्या मराठी बोलीभाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. ‘जगन्नाथाचा रथ’ या चित्रपटाचे नायक बाळ धुरी यांच्याशी १९७५ साली त्यांनी विवाह केला. राजू या मुलाच्या जन्मानंतरही त्यांनी चित्रपटातून भूमिका केल्या. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या दूरदर्शन मालिकेत या पतिपत्नींनी दशरथ-कौशल्येची भूमिका केली. ही भूमिका देखील विशेष गाजली. मराठी चित्रपटातल्या भूमिका करत असतानाच जयश्री गडकर यांनी अण्णासाहेब घाडगे यांच्या ‘सासर-माहेर’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. चित्रपट यशस्वी झाला आणि दिग्दर्शिका होण्याचे त्यांचे स्वप्नही साकार झाले. त्यानंतर १९९६ साली त्या चित्रपट निर्मिती क्षेत्रातही उतरल्या. निर्मिती, कथा-दिग्दर्शन-अभिनय अशा भूमिका उत्तम सांभाळून त्यांनी चित्रपट बनवला ‘अशी असावी सासू’.भक्तिभावाने ओथंबलेली व्यक्तिरेखा साकार करताना प्राणप्रिय असलेली मासळी आपल्या आहारातून सहा-सहा महिने वर्ज्य करीत शुचिर्भूत अंत:करणाने त्या कॅमेर्‍यासमोर जात. श्रद्धापूर्वक अभिनयाची साधना करणारी शब्दांशिवाय केवळ हावभावातूनच सारे काही सांगून टाकणारी ही समर्थ अभिनेत्री पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतही ताठ मानेनं आणि ताठ कण्यानं वावरली. शूटिंगदरम्यान ओढवलेले अनेक अपघात जयश्रीबाईंनी पचवले. जयश्री गडकर चित्रपटसृष्टीत आल्या तेव्हा अनेकांना वाटत होते की, ही अपर्‍या नाकाची, साध्या सरळ भांगाची ‘काकू’ म्हणूनच जमा होणारी पोरगी नायिका म्हणून प्रभाव तो काय पाडणार, पण जयश्री गडकर सुरुवातीपासूनच सहजी हार मानणार्‍या नव्हत्या. त्यांच्या कलाजीवनाची वाटचाल ‘रुपेरी’ होती, तितकीच ती ‘काटेरी’ देखील होती. त्यांना अनंत यातना भोगाव्या लागल्या, पण कामावरच्या निष्ठेमुळे त्या त्यातून सहीसलामत बाहेर पडल्या. मराठी, हिंदी, पौराणिक अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी काम केले. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार, पाच वेळा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार, २००३सालचा व्ही. शांताराम पुरस्कार, २००५मध्ये ‘समाजदर्पण’, सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्टतर्फे दिला जाणारा ‘सीण्टा’ पुरस्कार आणि २००८ साली ‘चित्रभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २९ऑगस्ट २००८ रोजी अशा दिग्गज अभिनेत्री जयश्री गडकर या कलासृष्टीला सोडून गेल्या, पण आजही त्यांच्या भूमिकेतून त्या आपल्यात जिवंत आहेत. त्यांना मानाचा मुजरा.


- आशिष निनगुरकर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.