लडाखमध्ये सीमेवरील चिनी अतिक्रमण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2020   
Total Views |

china india_1  


चीनने भारत-चीन सीमेवर आणि तिबेटमध्ये फारसे सैन्य तैनात केलेले नाही आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीच, तर सैन्य त्यांना चीनच्या इतर भागातून आणावे लागेल. यामुळे या भागांमध्ये लगेच सैन्याची तैनाती करणे सोपे नाही आणि जेव्हा चिनी सैन्य चीनमधून तिबेटमध्ये प्रवेश करायला लागेल, तेव्हा आपल्याला सॅटेलाईट आणि विमानाच्या मदतीने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवता येईल.


गेल्या काही दिवसांपासून लडाखमधील चिनी अतिक्रमणाला माध्यमांमध्ये खूप महत्त्व दिले जात आहे. परंतु, माध्यमांतील काही तथाकथित तज्ज्ञ योग्य माहिती देत नाहीत, हे इथे खेदाने नमूद करावे लागेल. त्यांचा सूर असा आहे की, चीनबरोबरची आपली आक्रमकता भारतालाच महागात पडेल. एवढेच नव्हे, तर आपण या भागांमध्ये रस्ते बांधल्यामुळे चीनला राग आला आहे, म्हणून आपण तिथे रस्ते बांधू नये. आपण अमेरिकेच्या जास्त जवळ जातो आहोत, म्हणूनसुद्धा चीनला राग येतो आहे. तसेच चीनची भारतातील गुंतवणूक कोरोनाकाळात आपण थांबवली म्हणून चीनला राग आलेला आहे. त्यांच्या कुठल्याही गुंतवणुकीला, मग ती महत्त्वाच्या सामरिक क्षेत्रात/कारखान्यामध्ये असो, त्याला आपण जास्त विचार न करता परवानगी द्यायला पाहिजे, असेही सल्ले देणारे महाभाग कमी नाहीत.



वाटाघाटी करा आणि माघार घ्या


एवढेच नव्हे, तर चीनविरुद्ध आपण नेहमीच नम्रतेने/दबून वागायला पाहिजे. कारण, चीनचे ‘डिफेन्स बजेट’ हे आपल्या तिप्पट आहे आणि जर युद्ध झाले, तर त्यामुळे आपला ते पुन्हा एकदा पराभव करू शकतात, तर काही सांगतात की, युद्ध आपल्याला परवडणारे नाही म्हणून मुकाट्याने वाटाघाटी कराव्या आणि माघार घ्यावी वगैरे वगैरे... पण, अशा वेगवेगळ्या प्रश्नांना नेमकं कसं उत्तर द्यायला पाहिजे? सध्या भारत-चीन सीमेवरची परिस्थिती नेमकी कशी आहे आणि यापुढे अजून जास्त तणाव निर्माण होऊ शकतो का? तणाव निर्माण झाला तर आपण युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्याकरिता तयार आहोत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भारतीय जनतेसमोर येणे गरजेचे आहे. कारण, चीनबद्दल भीतीची भावना अनेकांच्या मनामध्ये असते आणि मुख्य म्हणजे सैन्यनेतृत्व आणि सरकार पावले उचलते आहे, ती योग्य आहेत अथवा नाहीत, या सगळ्या पैलूंचा आपण या लेखामध्ये विचार करू.



राष्ट्रीय हिताचे भारत-चीन सीमेवर संरक्षण


सर्वप्रथम भारतीयांनी आश्वस्त असावे की, सरकारने उचललेली पावले आणि भारतीय सैन्याची आक्रमक कारवाई, ही भारताच्या राष्ट्रीय हिताचे भारत-चीन सीमेवर संरक्षण करणारी आहे. भारतीय सैन्य सध्या ‘बॅकफूट’वर आहे का? चीनने खोलवर भारतीय सीमेच्या आत अतिक्रमण केले आहे का आणि त्यांना आत येण्यापासून थांबवणे, यामध्ये आपल्याला अपयश आले का? उत्तर सरळ आणि साफ आहे की, भारतीय सैन्याने चिनी आक्रमण लगेचच थांबवले आहे आणि आपले सैन्य नक्कीच ‘बॅकफूट’वर नाही.



अतिक्रमणाला पटकन प्रत्युत्तर


सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण या भागात गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने नवीन रस्ते बांधत आहोत. याचा सर्वात मोठा फायदा आहे की, या आधी भारत आणि चीन सीमेवर पोहोचण्याकरिता रस्ते नसल्यामुळे आपल्या सैन्याला तिथे चीनला प्रत्युत्तर देण्याकरिता खूप वेळ लागायचा आणि अनेक वेळा, चिनी सैन्य येऊन गेले, हेसुद्धा कळायला उशीर लागायचा. परंतु, आता या भागात रस्ते बांधल्यामुळे चीनच्या कुठल्याही अतिक्रमणाला पटकन तोंड देणे आपल्याला सोपे झाले आहे. यामुळे अर्थातच चीनची घुसखोरी आपण लगेच थांबवू शकतो. नेमके हेच लडाख भागामध्ये झाले. याशिवाय कलवान खोरे आणि सिक्कीममध्ये डोकुला येथे आपण त्यांना पटकन थांबवू शकलो. त्याला मोठे यश मानायला पाहिजे.



भारताशी चीनचे मानसिक युद्ध


सध्या नेमके सीमेवर काय होत आहे? भारत-चीन सीमा ही भारत-पाकिस्तान सीमेपेक्षा पुष्कळ वेगळी आहे. पाकिस्तानबरोबर ‘एलओसी’वर सतत वेगवेगळ्या शस्त्राने फायरिंग होत असते, तसे इथे होत नाही. मात्र, जर दोन्ही सैन्य एकमेकांच्या आमनेसामने आली तर एकमेकाला बॅनर दाखवून सांगितले जाते की, तुम्ही आमच्या सीमेमध्ये प्रवेश केला आहे. भारत-चीन सीमा अजूनसुद्धा रेखांकित करण्यात आलेली नाही. कारण, चीनला भारत-चीन सीमा विवाद संपवायचा नाही. उलट, याचा वापर करून वेळोवेळी भारतावर दबाव टाकायचा आहे, ज्याला आपल्याला ‘मानसिक युद्ध’ किंवा ‘प्रचारयुद्ध’ असे म्हणता येईल. परंतु लक्षात असावे की, या चिनी डावपेचाचा भारतीय सैन्यावर परिणाम झालेला नाही आणि त्यांच्या दबावाखाली भारतीय सैन्य आणि सरकार येत नाही, हे गेल्या वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. हाच कणखर कणा आपण डोकलाममध्ये दाखवून दिला होता, जिथे चिनी सैन्याला परत जावे लागले. या वेळचासुद्धा ‘स्टॅण्ड ऑफ’ हा काही दिवसांमध्ये नक्कीच सोडवला जाईल. परंतु, चीन आपल्यावर जितका जास्त दबाव टाकता येईल, तेवढा टाकण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्याकडून काही किंमत वसूल करण्याचा प्रयत्न करेल.


भारत-चीन सीमेवर सैनिकी परिस्थिती

जर चीनची आक्रमकता अजून वाढली, तर चकमकी, छोटे युद्ध किंवा मोठे युद्ध याकरिता आपण तयार आहोत का? १९६२ च्या युद्धामध्ये त्यावेळेला असलेल्या भारतीय सैन्यापैकी फक्त एक डिव्हिजन अरुणाचल प्रदेशमध्ये आणि एक ब्रिगेड लडाखमध्ये वापरली गेली. म्हणजे त्या वेळच्या असलेल्या सैन्यापैकी आपण पंधरा टक्के सैन्य या युद्धामध्ये वापरलेच नव्हते. त्या युद्धामध्ये ९० टक्के भारतीय सैन्य आणि शंभर टक्केनौदल आणि हवाई दल लढलेच नाही. हा पराभव सैन्याच्या त्यावेळी असलेल्या राजकीय नेतृत्वाचा होता. त्यानंतर १९६७मध्ये भारत आणि चीनमध्ये नाथुलामध्ये एक चकमक झाली. यामध्ये भारतीय सैन्याने शंभरहून जास्त चिनी सैनिकांना ठार करुन चीनला प्रत्युत्तर दिले होते. १९८६ मध्ये अरुणाचल प्रदेशच्या सुमडुरोंचू खोर्‍यामध्ये आपण अतिशय आक्रमक प्रत्युत्तर देऊन चीनला माघार घ्यायला लावली होती. त्यामुळे भारतीय सैन्याच्या शौर्याविषयी, नेतृत्वाविषयी किंवा मनोबलाविषयी अजिबात काळजी नको. भारतीय सैन्याला युद्धाचा अनुभव आहे, जो चिनी सैन्याला अजिबात नाही. भारतीय सैन्य हे सीमेवर तैनात आहे. चिनी सैन्य सीमेवर तैनात नाही. ते केवळ गस्त घालण्याकरिता किंवा पेट्रोेलिंगकरिता सीमेवर येतात. लडाखचा भाग हा १४ हजार फुटांहून जास्त उंचीवर आहे आणि तिथे सैन्य एकदम पाठवता येत नाही. सैन्याला पहिले नऊ हजार फुटांवर कमी प्राणवायूमध्ये आणि अतिथंड जागी शारीरिक आणि मानसिक तयारी करावी लागते.




ही तयारी सात दिवस चालते. नंतर पुन्हा अकरा हजार फूट उंचीवर हीच तयारी सात दिवस करावी लागते आणि त्यानंतर पुन्हा सात दिवस तेरा हजार फूट उंचीवर हीच तयारी केली जाते. त्यानंतरच सैन्य लडाखच्या भागांमध्ये युद्धाकरिता सज्ज असते. भारतीय सैन्याची ही तयारी आहे. सीमेवर आणि तिबेटमध्ये फारसे चिनी सैन्य तैनात नाही. चीनने भारत-चीन सीमेवर आणि तिबेटमध्ये फारसे सैन्य तैनात केलेले नाही आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर सैन्य त्यांना चीनच्या इतर भागातून आणावे लागेल. यामुळे या भागांमध्ये लगेच सैन्याची तैनाती करणे सोपे नाही आणि जेव्हा चिनी सैन्य चीनमधून तिबेटमध्ये प्रवेश करायला लागेल, आपल्याला सॅटेलाईट आणि विमानाच्या मदतीने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवता येईल, ज्यामुळे आपणसुद्धा आपले अजून जास्त सैन्य इथे तैनात करू शकतो. चीनने जर त्या भागांमध्ये सैन्याच्या पोस्ट (चौक्या) किंवा लढण्याकरिता बंकर्स बनवायचे ठरवले, तर त्याला प्रचंड वेळ लागू शकतो. आपले बंकर्स, चौक्या तयार आहेत आणि आपली लढण्याची इतर सामग्री त्या भागांमध्ये साठवली आहे. चीनला तशी तयारी करण्याकरिता पुष्कळ वेळ लागू शकतो. त्यामुळे त्या भागातील आपल्या सीमेच्या रक्षणाची काळजी नसावी. या भागांमध्ये नेमके किती सैन्य तैनात आहे, त्यांची क्षमता काय आहे आणि ते कशा पद्धतीने लढू शकतील, या प्रश्नांची उत्तरे आपण यापुढच्या लेखांमध्ये देण्याचा प्रयत्न करू.


(सूचना : या लेखात सैनिकी गुप्ततेचा भंग केलेला नाही. लक्षात असावे, या लेखामध्ये दिलेली माहिती ही माध्यमांमध्येही उपलब्ध आहे. ती केवळ एकत्रितरित्या मांडण्यात आली आहे.)
@@AUTHORINFO_V1@@