तब्बल दोन महिन्यांनंतर राज्यात आजपासून बाजारपेठा सशर्त खुल्या!

05 Jun 2020 14:31:12

unlock_1  H x W


अनलॉक-१ च्या दुसऱ्या टप्प्यात काही निर्बंध आणखी शिथिल


मुंबई : तब्बल सव्वादोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर शुक्रवारपासून राज्यातील नागरिकांना आणखी मोकळा श्वास घेता येणार आहे. अनलॉक-१ च्या दुसऱ्या टप्यात औरंगाबाद, नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे, अकोला, अमरावतीसह राज्यातील १४ महापालिका क्षेत्रांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता उर्वरित परिसरांमध्ये दुकाने खुली करण्यात आली आहेत.


‘मिशन बिगीन अगेन’ दुसऱ्या टप्प्यातील पूर्वसंध्येला राज्य शासनाने गुरुवारी काही नवीन उपक्रमांना संमती दिली. त्यानुसार महापालिका क्षेत्र सोडून राज्यातील उर्वरित भागात विद्यापीठे, शाळा या शैक्षणिक संस्थांच्या कार्यालयांना उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन, निकाल जाहीर करणे आदी कामांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र सकाळी व्यायाम करताना बाग-बगिचांमधील व्यायामाचे साहित्य, मैदानांवरील झोपाळे यांसारख्या साहित्याचा वापर करता येणार नाही, असे निर्देश जारी करण्यात आले आहेत.


३१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशातील मार्गदर्शक सूचनांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील सुधारित शासन आदेश गुरुवारी जारी करण्यात आला. तसेच याबरोबर काही उपक्रमांवर काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. त्यानुसार एमएमआर क्षेत्रामधील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील काही भाग या महापालिकांमध्ये आंतरजिल्हा प्रवासास कोणत्याही निर्बंधाशिवाय परवानगी देण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0