‘वृक्षारोपण’ जनचळवळ होणार : पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर

    दिनांक  05-Jun-2020 18:25:02
|
javdekar_1  H x

नवी दिल्ली : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याविषयी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, कार्बन उत्सर्जन तातडीने कमी करण्याची गरज असून त्यासाठी वृक्षलागवड हा महत्त्वाचा उपाय आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी देशासमोरचे वृक्षारोपणाचे लक्ष्य वाढवून ते १४५ कोटी वृक्षलागवडीपर्यंत नेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आगामी काळात वृक्षारोपण ही 'जनचळवळ' करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वने व पर्यावरण, हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.


कोरोनामुळे संपूर्म जगाची हानी झाली असून जग वेठीस धरले गेले आहे. कोरोना संकटाचा सामना करताना पर्यावरणाच्या झालेल्या हानीची पुरेशी कल्पना आता जगाला आली आहे. त्यामुळे यापुढील काळात पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटीबद्ध राहणे अत्यंत महत्वाचे ठऱणार आहे. कारण हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणे आवश्यक आहे, त्यासाठी वृक्षलागवड हा अतिशय महत्वाचा उपाय आहे. यंदाच्या वर्षी देशातील वृक्षारोपणाचे लक्ष्य वाढवून १४५ कोटी करण्यात आले आहे, देशात सर्वदूर नियोजबद्ध पद्धतीने वृक्षारोपण कार्यक्रम रावबिण्यात येणार आहे. त्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमास जनचळवळीचे स्वरूप देण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.


देशभरातील शहरांमध्ये 'नगर वने' योजना सुरु करण्यात येत असल्याची घोषणा जावडेकर यांनी केली. ते म्हणाले, देसभरातील २०० शहरांमध्ये नगर वने विकसित करण्याचा प्रकल्प सुरु करत आहोत. त्यासाठी पुण्यातील वारजे नगर वन मॉडेलचे पालन केले जाणारे आहे. त्यासाठी उपक्रमासाठी 'कॅम्पा' निधीतून अर्थसाह्य केले जाणार आहे. नगरवनांचा किंवा शहरी वनक्षेत्रांचा विकास केल्यास वातावरणातून २.५ ते ३ अब्ज टन कार्बन डाय-ऑक्साइड काढून घेण्याचा भारताचा निर्णय प्रत्यक्षात आणण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे अशी वनक्षेत्रे शहरांची फुप्फुसे म्हणूनही काम करणार असल्याचे जावडेकर यांनी नमूद केले.


वारजे नगर वन
पुण्यात सुमारे ९ हजार एकर वनजमीन असली तरी शहरीकरणामुळे आता हे भाग शहराच्या ऐन मध्यवर्ती भागात आले आहेत. वारजे शहरी वनक्षेत्र हा अतिक्रमणाच्या सावटाखाली असणारा असाच एक भाग होता. २०१५ साली केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निर्देशांनुसार वारजेला पर्यावरण आणि परिसंस्थेच्या दृष्टीने एक 'हरितस्थळ' म्हणून रूपांतरित करण्याचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारी - खासगी (PPP) भागीदारीतून हे 'स्मृतीवन' अस्तित्वात आले असून २०१५ ते २०१७ या काळात वारजे येथे सुमारे साडेसहा हजार झाडे लावली गेली जी आता २० ते २० फूट उंच वाढली आहेत. अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतिनिमित्त झाडे लावली आणि ती दत्तक घेतली. पुण्यातील वारजे शहरी वनक्षेत्र दरवर्षी १.२९ लाख किलो कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेते, तर ५.६२ लाख किलो ऑक्सिजनची म्हणजे प्राणवायूची निर्मितीही करते. अशाच प्रकारची वने आता देशभरातील २०० शहरांमध्ये तयार निर्माण केली जाणार आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.