रो-रो बोटीतून मुख्यमंत्री रायगड दौऱ्यावर रवाना!

05 Jun 2020 12:42:51
uddhav_1  H x W

उद्धव ठाकरे करणार निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याच्या पाहणी!

मुंबई : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला जबरदस्त फटका बसला. वादळामुळे येथील लोकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेकांची घरे उद्धस्त झाली आहेत. यामुळे येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या पाहणीदौरा करणार आहेत. यासाठी थोड्याच वेळापूर्वी ते मुंबईतील भाऊचा धक्का येथून रो-रो बोटीतून मांडवा अलिबागकडे रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सोबत महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील त्यांच्या सोबत आहे. या पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत ते बैठक करतील.





निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे याबाबत आढावा घेतला होता. यावेळी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करा, म्हणजे शेतकरी आणि गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या.


रायगड जिल्ह्यात घरांचे जे नुकसान झाले आहे, त्यांच्याकडे स्वयंपाक पाण्याची सोय नाही. त्यांना तातडीने अन्न धान्य पोहचवणे गरजेचे आहे. यंत्रणेने ते काम लगेच हाती घ्यावे. महावितरणने अधिकचे मनुष्यबळ या भागात लावून वीज पुरवठा पहिल्यांदा सुरु करावा. रुग्णालये, दवाखाने यांना वीज पुरवठा सुरु राहणे गरजेचे आहे. नुकसान भरपाई देतांना नागरिकांना विश्वासात घ्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
Powered By Sangraha 9.0