‘ऑनर कीलिंग’वर बोलू काही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2020   
Total Views |

iran_1  H x W:
इराणच्या तलेश शहरातील १४वर्षांची रोमानिया तिच्या ३५वर्षांच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर त्या दोघांनाही शोधण्यात आले. रोमानियाला तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले खरे, पण त्याच रात्री रोमानियाच्या पित्याने तिचा खून केला. यावर इराणमध्ये वादळ उठले.

कोणतीही मुलगी आपल्या बाबांची, भावाची आणि कुटुंबातल्या प्रत्येकाची लाडाकोडाची राजकुमारी असते. हे खरेच आहे. तळहाताच्या फोडासारखे तिला जपले जाते. पण, ‘ऑनर कीलिंग’ आपल्या देशातच घडत असेल का? तर असे मुळीच नाही, इज्जत, समाज मान्यता, रूढी रितीरिवाज या नावाखाली मुलींचा खून जगाच्या पाठीवर होतच आहे.किमान पाच हजार मुलीबाळींची निर्घृण हत्या या ‘ऑनर कीलिंग’च्या नावाने जगभरात होते. खून झाल्यानंतर त्या त्या वेळी मानवी हक्कांच्या नावाने गळे काढले जातात. मात्र, त्यानंतर सगळे शांत होते. इराणमध्ये १४वर्षीय रोमानिया अश्रपी या मुलीचा शेतीसाठी वापरल्या जाणार्‍या कोयत्याने खून झाला. इराणच्या तलेश शहरातील १४वर्षांची रोमानिया तिच्या ३५वर्षांच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर त्या दोघांनाही शोधण्यात आले. रोमानियाला तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले खरे, पण त्याच रात्री रोमानियाच्या पित्याने तिचा खून केला. यावर इराणमध्ये वादळ उठले. इराणच्या सरकारी नियमानुसार मुली तेराव्या वर्षानंतर लग्न करू शकतात. त्या नियमानुसार रोमानिया तिच्या मर्जीने लग्न करू शकत होती.

(१४व्या वर्षी मुलींच्या लग्नाला परवानगी, म्हणजे, मुलींचे शिक्षण वगैरेबद्दल न बोलले बरे) याची दखल घेत इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रूहानी यांनी ‘ऑनर कीलिंग’च्या विरोधात कडक कायदा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ‘आर्टिकल ६३०’च्या अंतर्गत इराणमध्ये या ‘ऑनर कीलिंग’ला संरक्षणच मिळाले आहे. या कायद्यानुसार ‘ऑनर कीलिंग’ हा कोणत्याही खुनाइतका गंभीर गुन्हा नाही. इराण काय किंवा इतर इस्लामिक राष्ट्रांमध्ये काय, कायद्याने ‘ऑनर कीलिंग’ केलेल्यांना जास्त शिक्षा होत नाही. इतकेच नव्हे, तर जगभरात समाजाचा एक गट कायम या ‘ऑनर कीलिंग’ करणार्‍यांचे समर्थन करतो. मे २०२०मध्ये वजिरिस्तान, पाकिस्तानमध्येही १६ आणि १८वर्षांच्या दोन मुलींचा खून झाला. कारण काय तर, दोघीजणींनी समाज माध्यमांवर एका युवकासोबत व्हिडिओ टाकला होता. त्यामुळे या दोघींच्या घरची म्हणे इज्ज्त गेली. त्यामुळे एकीच्या पित्याने आणि एकीच्या भावाने या मुलींचा खून केला.

अमेरिकेमध्येही १९८९ साली ‘ऑनर कीलिंग’ची घटना गाजली होती. पॅलेस्टिना झेना या १७वर्षीय मुलीचा खून तिच्या पालकांनीच केला. कारण, घरचे वातावरण रोमन कॅथलिक. मात्र, पॅलेस्टिनाला डान्स, डिस्कोमध्ये जास्त रस. रोमन कॅथलिक नसलेल्या दुसर्‍या वंशाच्या व्यक्तीबरोबर डिस्को नृत्य करताना तिच्या पालकांनी पाहिले. मुलगी हाताबाहेर गेली, या विचारांनी तिच्या पालकांनी तिचा खून केला होता. या सगळ्यामध्ये कंदिल बलोच या पाकिस्तानी मॉडलेचा खून अगदी चर्चेत होता. कारण, तिच्या भावाने वसिमने तिचा खून केला. का? तर ती तिच्या पतीला सोडून आली हेाती. समाज माध्यमांवर ती प्रसिद्ध झाली होती. खून का केला? यावर वसिमने पत्रकार परिषदही घेतली आणि सांगितले की, “लोकं नाव ठेवत होती. म्हणायचे, तुझ्या घरातली इज्जत जगासमोर उघडी आहे. हे सहन झाले नाही म्हणून मी कंदिलचा खून केला.”


असो, तर मुलींचे असे खून का पडतात? हे पाहून वाटते की, एखादी मुलगी मनाप्रमाणे जगू इच्छित असेल तर इज्जत-अब्रूला लगेच तडा जातो? इज्जत इतकी स्वस्त आहे? ही इज्जत नेमकी मुलींच्या प्रेम आणि लैंगिक प्रकरणाशी जोडलेली का आहे? गौतम बुद्धांची कथा आठवते, एक युवती बुद्धांना भेटायला येते. लोक म्हणतात, “तथागत तिला भेटू नका, तिला इज्जत नाही.” यावर बुद्ध म्हणतात, “एका हाताने टाळ्या वाजवा.” लोक म्हणतात, “एका हाताने टाळी कशी वाजवणार? आणि मुलीच्या गेलेल्या इज्जतीचा आणि याचा काय संबंध?” बुद्ध म्हणतात, “एका हाताने टाळी वाजवता आली नाही ना? मग ही मुलगी एकटीच स्वत:च चारित्र्यहीन कशी झाली? आणि चारित्र्यहीन म्हणजे काय झाली? ती जर दोषी असेल तर तिच्यासोबत असणारा पुरूष दोषी नाही का? तो जर दोषी नाही तर ही मुलगी एकटी कशी काय दोषी?” ‘ऑनर कीलिंग’बाबत बुद्धांचा विचार आठवतो. तसेच सध्या वर्णभेदाविरूद्ध अमेरिकेत दंगल सुरू आहे. जगभरातून वर्णभेदाचा निषेध होतो आहे. मग या लिंगभेदाला विरोध होणार की नाही?

@@AUTHORINFO_V1@@