अमेरिकेमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

04 Jun 2020 11:11:58

mahatma Gandhi statue_1&n
 
नवी दिल्ली : अमेरिकेमध्ये सध्या जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचारविरुद्ध २५ हून अधिक शहरामध्ये हिंसक आंदोलने सुरु केली आहेत. याचदरम्यान काही समाजकंठकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. याबाबत युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी तपास सुरु केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
जॉर्ज फ्लॉयड या व्यक्तीच्या मृत्यूचा अमेरिकेतूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून निषेध करण्यात आला. कृष्णवर्णीयांवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये निदर्शने काढण्यात आली. या निदर्शनाचा नंतर भडका उडाला आणि संपूर्ण अमेरिकेमध्ये या आंदोलनाचे उग्र स्वरूप पहायला मिळाले. याची तीव्रता तेव्हा जाणवली जेव्हा व्हाइट हाऊसबाहेर आंदोलन सुरु असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरमध्ये आसरा घ्यावा लागला.
 
 
नेमके आंदोलनाचे कारण काय?
 
 
जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा सोमवारी मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लायड यांना अटक करताना त्यांच्या मानेवर गुडघा ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलने सुरु आहेत. अमेरिकाच नव्हे तर पॅरिस, सिडनी, अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा आणि न्यूझीलंड या देशांमध्येही नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आपला निषेध नोंदवला.
 
 
Powered By Sangraha 9.0