बदलते पर्यावरण आणि आपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2020
Total Views |


nature_1  H x W

 

देशी झाड लावायला आणि वाढायला आपल्या पर्यावरणाला उपयुक्त अशी आहेत, निसर्गाचा समतोल राखणारी आहेत. आपल्या स्थनिक उद्योगांच्या वाढीला ही वृक्ष उपयोगी पडतात.

 



देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे
हिरव्या पिवळ्या माळा वरूनी, हिरवी पिवळी शाल घ्यावी
 

 


आज ही विंदा करंदीकरांनी लिहिलेली आणि शाळेत अभ्यासलेली कविता आठवली आणि जाणवलं की शाळेत शिकवलेल्या या कवितेला आपल्याला पुन्हा शिकायची गरज आहे, थोडसं अंतर्मुख व्हायची गरज आहे. निसर्गानेच या वर्षाच्या सुरुवातीपासूनच पृथ्वीवरील सर्वात हुशार समजल्या जाणार्‍या मानाव जातीसमोर अनपेक्षित आव्हानं आणून ठेवली आहेत आणि ‘मी मी’ म्हणणार्‍या माणसाला त्याची खरी जागा दाखवून दिली आहे. खरंतर आपलं आयुष्य म्हणजे या पृथ्वीवरील वाळूच्या एका कणाइतकं, क्षणभंगूर. पण, विकासाच्या हव्यासात जे जे करू नये, त्या त्या गोष्टी माणसाने प्रगती आणि महत्त्वाकांक्षा यांचा समतोल न राखता केल्या. जास्तीत जास्त भूभाग संपादनासाठी जमिनी, तलाव बुजवले, दळणवळणाचे मार्ग बनवण्यासाठी झाडं, जंगलं तोडून महामार्ग बनवले, समुद्रालगतची जागा मिळवण्यासाठी तिवरांची जंगलं कापली आणि बुजवली आणि हे करत असताना त्याने निसर्गचक्र मोडले आणि त्याचे परिणाम म्हणजे वाढलेले तापमान, दुष्काळ, पूर, अवेळी पडणारा आणि पिकांचे नुकसान करणारा पाऊस, गारपीट, चक्रीवादळ, नवनवीन साथीच्या रोगांची वाढ या संकटांचा सामना करावा लागला आहे, लागत आहे आणि जर वेळीच या वागण्याला आवर घातला नाही, तर पुढेही करावा लागेल! आज आपण नुसत्या दुष्काळावर मात करण्यासाठी वृक्षलागवड करायला सुरुवात केली तरी अनेक प्रश्न सुटतील. प्रत्येक माणसाने आयुष्यात दरवर्षी पाच झाडं लावली आणि ती जगवली तरी हे बिघडलेले पर्यावरण संतुलित करायला मदत होईल, जमिनीचा कस सुधारेल, ओसाड आणि पडिक जमिनी लागवडीसाठी घेता येतील, फुलवता, पिकवता येतील आणि पर्यावरणाचा समतोल ठेवण्याबरोबरच रोजगारनिर्मिती होऊन समाजाचे सबळीकरण होईल.

 
अनेक योजनेंतर्गत दरवर्षी झाड लावली जातात, पण पुढील वर्षी मागील वर्षी लावलेल्या झाडांपैकी किती जीवंत आहेत, याचा आढावा कोणीही घेत नाही. शिवाय बहुतेक करून पावसाळ्यात लावलेल्या वृक्षांची पावसाळ्यानंतर कोणीही काळजी घेत नाही, अशा वेळी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना, सोसायट्यांना हे लागवड केलेले वृक्ष सांभाळायला जोपासायला दिले पाहिजेत. नुसती लागवड नाही, तर त्यांचं संवर्धन होणे गरजेचे आहे आणि मागील आढावा घेऊन, झालेल्या त्रुटीची दुरुस्ती करून नवीन लागवड करायला हवी. जसं हवामान असेल त्याप्रमाणे वृक्षलागवड करावी. कोरडवाहू जमिनीला, नापीक जमिनीला सुपीक बनवण्यासाठी नदीतील गाळ वापरावा. पाण्याच्या पुरावठ्यासाठी तलाव बांधावेत, होईल तेवढं पावसाचे पाणी जमिनीत जिरवावे जमिनीत पाण्याच्या पातळीत वाढ करावी. आपली लोकसंख्या १३० कोटी आहे. विचार करा, प्रत्येक माणसाने स्वखर्चाने दरवर्षी पाच झाडं लावून जगणवण्याची प्रतिज्ञा केली, तर परत आपला देश ‘सुजलाम सुफलाम’ व्हायला वेळ लागणार नाही. मातृभूमीचे खरे ऋण अशाप्रकारे फेडता येईल, अस म्हटले जाते की, वृक्ष लावण्याची योग्य वेळ ही २० वर्षे आधी होती आणि दुसरी योग्य वेळ ही आता आहे.
 
लावण्यात येणार्‍या झाडांची निवडसुद्धा आपल्या पारंपरिक झाडांचीच करा, अशी जनजागृती व्हायला हवी. मग तो वृक्ष, झाड, झुडूप कोणतेही असो वड, पिंपळ, उंबर, बकुळ, आकाशनीम, ताड, नारळ, चिंच, कडुनिंब, बेल, सीता अशोक, कवठ, आंबा, फणस, पेरू, आवळा, सीताफळ, लिंबू, संत्री, सीताफळ, रामफळ, कोकम, शेवगा ही झाडं आवर्जून लावली पाहिजेत. वड, पिंपळ, नारळ, ताड, उंबर, बकुळ, आंबा, देशी बदाम, फणस ही झाडे आरामात १०० वर्षे जगतात आणि एकदा लावून सांभाळली की पुढच्या अनेक पिढ्या याच्या छायेचा, फळांचा आनंद घेऊ शकतात. आपले पारंपरिक वृक्ष हे शीतल छायेसोबतच हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवतात. जमिनीची धूप थांबवतात. हवेतील आर्द्रता वाढवतात. अनेक पक्ष्यांचे, कीटकांचे, किड्या मुंग्यांचे आश्रयस्थान होतात. त्यांना अन्न, निवारा देतात. शिवाय झाडाच्या पालापाचोळ्यापासून खतनिर्मिती होऊन जमिनीचा पोत चांगला होते, मातीतील अनेक उपयुक, कीटकांची, सूक्ष्म जीवांची, जिवाणूची वाढ होते, त्यांना अन्न मिळतं. पाचोळ्यातील उपयुक्त घटक विघटनानंतर मातीत दूरवर पसरून मातीला धरून ठेवणार्‍या मुळामार्फत परत झाडांचे पोषण करण्यास उपयुक ठरतात. जमिनीतील पाण्याची पातळी वाढवतात. एकूणच वृक्षलागवड पर्यावरणाची साखळी संपूर्ण करतात आणि स्वतः भोवतालच्या पर्यावरणाचा समतोल राखतात. वृक्षाच्या फुलावर बसलेल्या कीटकांद्वारें परागीकरण होते. वड आणि पिंपळाची फळे खाऊन झाल्यावर पक्ष्यांच्या विष्ठेतून दूरवर वेगवेगळ्या ठिकाणी प्रसार होतो, त्या ठिकाणी त्या बिया रुजतात, त्यांच्या लागवडीसाठी, वाढीसाठी मुद्दाम वेगळे काही प्रयत्न करावे लागत नाहीत. शिवाय त्यांचे औषधी उपाय तर अनेक असतात. झाडाच्या पानांपासून मुळापर्यंत प्रत्यक्ष घटक महत्त्वाचा आणि वापरात येतो, उपयुक्त असतो.
 
पिंपळ आणि वडाच्या झाडाच्या पारंब्या, शिकेकाई, रिठे, तेलात वापरल्यास केस मजबूत होतात. नीमच्या झाडाची पाने अंघोळ करताना वापरल्यास अनेक त्वचारोग बरे होतात, पेरूची कोवळी पाने हिरड्यांना मजबुती देतात, श्वासातील दुर्गंधी घालवतात. चिंचेचा रोजच्या जेवणात वापर केला सांधेदुखी कमी होते. नारळाचे आणि त्याच्या तेलाचे अत्यंत उपयुक्त गुणधर्म तर सगळ्यांनाच माहीत आहेत. देशी बदामातील बुद्धिवर्धक आणि पौष्टिक गुण विसरून कसे चालेल? बेलफळाने पोटातील अनेक कृमी नष्ट होतात. शिवाय देशी झाड लावायला आणि वाढायला आपल्या पर्यावरणाला उपयुक्त अशी आहेत, निसर्गाचा समतोल राखणारी आहेत. आपल्या स्थनिक उद्योगांच्या वाढीला ही वृक्ष उपयोगी पडतात. नारळ, ताडगोळे, आंबे, फणस, बोरे, बेल, कवठ, लिंबोण्याची विक्री केली जाते. झाडांचे लाकूड सुतारकामाला वापरलं जातं. शिवाय या वृक्षांची लाकडं ही कीटकरोधक असतात, टणक आणि मजबूत असतात. झाडांच्या सालीचा, पानांचा, मुळांचा आयुर्वेदिक औषधात वापर होतो, तसेच या झाडांची वाढ फार पटकन होते!

 


सुरंगी, मोह, सीता अशोक, बकुळ, कदंब, कांचन, आकाश, नीम, देवचाफा, पांगारा, पळस, शिरीष, बहावा, भेंडी या फुलझाडांची लागवड वेगवेगळ्या ठिकाणी केली तर निसर्ग रंगीत तर दिसेलच, पण सुगंधितही होईल. या मोठ्या वृक्षांच्या बरोबरीनेच तुळस, कोरफड, कृष्णकमळ, कमळ, ब्राह्मी, ओवा, निर्गुंडी, कोरंटी, गोकर्ण, जास्वंद, मोगरा, जाई, जुई, चमेली, अनंत, तगर, सोनटक्का, लिलीही झाड पण लावायला हवीत. सध्या जपानी मियावकी जंगल बनवण्याचे अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण मुळातच दुसर्‍या देशातील पद्धत अनुकरण्याऐवजी आपल्याकडील पारंपरिक जंगल बनवण्याची आवश्यकता आहे. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष जवळ लावल्यानेच त्यांची वाढ ही क्षितीज समांतर न होता आकाशाच्या दिशेने होऊन झाडे उंच होतात, हा साधा नियम जरी वापरला तरी जंगल माणसाने प्रगतीसाठी तोडलेली जंगलं पुन्हा उभी राहतील. निसर्गातील जैवविविधता जोपासायची असेल तर झाडं लावली पाहिजेत, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे, पक्षी तर आपसूकच येतील, त्यावर बसण्यासाठी आणि निवारा घेण्यासाठी...

 


(लेखिका हॉर्टिकल्चरिस्ट असून त्यांना सरकारी तसेच खासगी प्रकल्पांमध्ये इन्डोअर आणि आऊटडोअर लँडस्केपिंगचा प्रदीर्घ अनुभव आहे.)

 

 

- माया सावरकर

 

@@AUTHORINFO_V1@@