संत कबीर यांची सर्वसमावेशकता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2020
Total Views |


kabir_1  H x W:



‘कहता आँखन देखी, तू कहता कागद की लेखिन।’ असे म्हणत समाजाला वास्तवतेचा दृष्टिकोन देणारी कबीरवाणी. संत कबिरांचे चरित्र म्हणजे जात-पात-प्रांत-वंश-लिंग-धर्माच्या चौकटीवर समरस मानवतेचे संस्कार करणारे चरित्र आहे. त्यांचे जीवन हिंदू समाजसंस्कृतीचे जागृती आख्यान आहे. आज संत कबिरांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांतली सर्वसमावेशकता आज नव्या अर्थाने समजून घ्यायला हवी.


संत कबिरांच्या जीवनावर ज्या आख्यायिका रूढ आहेत, त्यामध्ये एक सर्वमुख आहे ती म्हणजे ते एका विधवा ब्राह्मण स्त्रीचे अपत्य होते. अर्थात, या बाळाला जन्म देताना त्या आईला १३९८ साली काय दिव्य सहन करावे लागले असेल? शब्दातीत. यावर चटकन मनात येते की, संत कबीररूपी बालकाचा जन्मच स्त्रीच्या दु:खाची धग समाजासमोर आणण्याचे काम करतो. त्यामुळेच की काय स्त्री पुरूष लिंगभेद वगैरे त्यागून, कबीर म्हणू शकतात की,


नारी निन्दा ना करो नारी रतन की खान
नारी से नर होता है ध्रुव प्रल्हाद समान


कबिरांनी असे म्हणणे याला विशेष महत्त्व आहे. स्त्री-पुरूष समानतेच्या पातळीवर स्त्रियांना मानवी सन्मान देताना कबीर हे संत म्हणून कितीतरी पटींनी मोठे वाटतात. कबिरांच्या सर्वसमावेशक विचाराने जगभरात सगळ्यात मोठा असलेला भेद म्हणजे लिंगभेद, तो त्यांनी भेद फेटाळला आहे. तसेच विद्वान किंवा गुणिजंणाची विद्वता किंवा गुणवत्ता डावलून जातपात शोधणार्‍यांना कबीर सांगतात की,


जाति न पुछो साधू की
पुछ लीजिये ज्ञान
मोल करो तलवार का
पडा रहन दो म्यान


आजही जातधर्म, वंश, वर्णभेदाचे धागे सूक्ष्म असले तरी ते कायम आहेत. या अशा पार्श्वभूमीवर संत कबिरांचे विचार तेराव्या शतकातच नव्हे, तर आजही चिंतनीय आहेत. ते विचारतात,


एक बूँद, एकै मल मुतर,
एक चाम, एक गुदा ।
एक जोती से सब उतपना


संत कबीर म्हणतात की, आपण सगळे एका ज्योतीपासून उत्पन्न आहोत, मग कोण श्रेष्ठ, कनिष्ठ? सगळ्यांना एका मानवतेच्या संवेदनेमध्ये गुंफू पाहणार्‍या संत कबिरांचे दोहे समाजाची प्रेरकस्थान आहेत. साखी, शबद आणि रमणीच्या त्रिस्तरावर त्यांच्या दोह्यांचे बिजक प्रसिद्ध आहे. त्यांच्या दोह्यांची भाषा आहे सधुक्कडीची. ती भाषा एकात्मतेची. काय आहे विडंबन आहे की संत कबिरांच्या नावावर अशाही संघटना असाव्यात की त्या कबिरांचे दोहे नाही, तर पोवाडे गाऊन क्रांतीच्या नावावर तरूणांना पथभ्रष्ट करतात. खरे म्हणजे, या संघटनानी संत कबिरांच्या नावाचा वापर केला, हा कबिरांचा अपमान आहे, हा त्यांनी दिलेल्या सर्वसमावेशक मुल्यांचा अपमान आहे. या असल्या संघटनांना संत कबीर कळले का? नाहीच कळले. नाही तर या संघटनांनी जातीपाती उकरत, विद्रोहाच्या गावगप्पा हाणत समाजाला वेठीस धरले नसते. असो, कबिरांचा सर्वसमावेशकता भाव समजून घेताना, त्यांच्या निर्भीड आणि सत्याचे अन्वेषण करणार्‍या चिकित्सक मनोवृत्तीकडेही पाहायला हवे. मुघलांच्या राज्यात मुस्लीम परंपरेत वाढलेल्या कबिरांनी हिंदूंना उपदेश केला तर त्यात तशी सहजता म्हणता येईल, पण ते मुस्लीम प्रथांवरही प्रहार करतात-


कांकर पाथर जोरि के, मस्जिद लई चुनाय।
ता उपर मुल्ला बांग दे, क्या बहरा हुआ खुदाय ॥


मरणोपरांत जन्नत मिळवण्यासाठी मानवबॉम्ब होणारे दहशतवादीही जगाने पाहिले आहेत. या पार्श्वभूमीवर संत कबीर यांच्या जीवनातला उत्तरार्ध महत्त्वाचा आहे. अवघे आयुष्य काशी नगरीत व्यतीत केल्यावर वयाच्या 119व्या वर्षी कबीर मगहर येथे गेले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. आता ते मगहरलाच का गेले असतील? तर लोकांच्या मनात अशी वंदता होती की, काशीला मृत्यू आला तर मोक्ष मिळतो आणि मगहरला मृत्यू आला तर मोक्ष तर मिळत नाहीच, उलट पुढचा जन्म गाढवाचा मिळतो. लोकांच्या ‘स्वर्ग’, ‘जन्नत’ वगैरे कल्पनांना छेद देत आज माणसासारखं वागलात तर इथेच स्वर्ग निर्माण होईल, याची जाणीव संत कबिरांनी करून दिली. एकंदरीत कबीर यांचे जगणे आणि मरणेही शाश्वत मानवी मूल्यांचा जागर करतात. तो जागर हिंदू जीवनपद्धतीच्या धर्मसंस्कारांचा आरसाच आहे.
 
 

- योगिता साळवी

 
 
@@AUTHORINFO_V1@@