निसर्ग पुनर्स्थापनेसाठी - निसर्ग बेट

    दिनांक  04-Jun-2020 22:37:15
|


nature_1  H x W


वृक्षलागवडीसाठी केवळ स्थानिक प्रजातींची निवड, पुरेसा अन्नद्रव्य पुरवठा, जलसंधारण आणि संरक्षण या चतु:सूत्रीवर आधारित पंचस्तरीय लागवडीतून उभे राहणार्‍या ‘निसर्ग बेटां’ची या लेखातून मांडलेली संकल्पना...


आज आपल्या सगळ्यांना लक्षात आले आहे की, विकासाचा वेडापिसा मार्ग मानवजातीला नष्ट करू पाहतोय आणि मानव निसर्गापुढे कसा हतबल होतोय. विकास आणि आधुनिकीकरणाचे जे गारुड मानवी मनावर मागील ५०-६० वर्षांत बसले होते, ते आता कोरोनानिमित्ताने तरी उतरेल असे वाटते आहे. यावर आता उपाय एकच - निसर्ग पुनर्स्थापनेसाठी पुन्हा खेड्याकडे चला. पण, फक्त अंदाधुंद खड्डे व ३३ कोटी झाडे लावायच्या वल्गनांनी हे साध्य होणार का? यासाठीची नेमकी तांत्रिक आवश्यकता कोणती? कसे यशस्वी होईल जलसंधारण व वनीकरण? दिवसेंदिवस जागतिक तापमानवाढीमुळे अवेळी पाऊस, कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडणारा पाऊस, गारपीट, प्रखर ऊन, ढगाळ वातावरण, कीटकांच्या, पक्ष्यांच्या जाती कमी होणे, नष्ट होणे, स्थलांतरित होणे, जास्त वेगाची वादळे, प्रदूषणासारख्या घडामोडींचा पिकांवर वाईट परिणाम होतो व भविष्यात अन्नधान्याची कमतरताही भासू शकते. खरंतर जगात अनेक ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली आहे, पण आपल्यापर्यंत ती पोहोचली नाही म्हणून आपल्याला त्याचे गांभीर्य नाही.
 

वनीकरणामध्ये वन खात्याचा झाडे लावायचा सपाटा, सुबाभूळ, निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ आणि ग्लिरिसिडीया अर्थात गिरीपुष्प ही त्यातील शिरोमणी झाडे. टेकड्या हिरव्यागार दिसू लागल्या. कमी पाण्यामध्ये येणारी, रोग-किडींना बळी न पडणारी, कमी कालावधीत वाढणारी, लवकरात लवकर उत्पन्न देणारी अशी ही झाडे रस्त्याच्या कडेला, बाग-बगीच्यांमध्येदेखील अवतरली आणि लोकप्रियदेखील झाली. वरकरणी यामध्ये वाईट काय आहे, असा प्रश्न आपल्याला पडेल. आपल्याकडच्या यशस्वी लागवडीमध्ये जाऊन बघितल्यावर मात्र डोळे खाडकन उघडतात. याची वाढ इतकी जोमदार आहे की, याच्या खाली कुठले गवतदेखील वाढत नाही. याची पडलेली पाने जागेवरच कुजल्यामुळे गवतदेखील उगवत नाही. गवतच नाही तर प्राणी खाणार काय? याची पाने खावीत तर त्याला प्रचंड उग्र वास! याच्या बिया तर म्हणे उंदीरमार म्हणून वापरल्या जातात. याच्यावर कोणताही रोग पडत नाही. याच्यावर कोणत्याही किडी जगत नाहीत. त्यामुळे पक्ष्यांना काहीच खाद्य मिळत नाही. या झाडांवर पक्ष्यांची घरटीदेखील फारशी पाहण्यात आलेली नाहीत. आपण टेकड्या या झाडांनी झाकल्या. परंतु, त्याखाली आपण आपले सृष्टीवैभवदेखील झाकून टाकले. या नवीन जंगलांमध्ये दुसरे कुठलेच झाड नसते. कठीण परिस्थितीत तग धरणारी बाभूळ, खैर इत्यादी झाडेदेखील या जंगलांमध्ये जगत नाहीत. रायमुनिया किंवा टणटणी किंवा इतर कोणत्याही काटेरी झुडपांचेदेखील अस्तित्व या जंगलामध्ये दिसत नाही. अस्तित्वात असलेली मूळची झाडेदेखील कणाकणाने मरत जातात. म्हणायला जंगल, परंतु एका अर्थाने निर्जीव झाडांचे जंगल! न जाणो आपले सर्व रोग-किडी शत्रू परदेशात ठेऊन आलेल्या या झाडावर भविष्यात काही जीवघेणा रोग अवतरला तर आपल्या टेकड्यांवर दगडांशिवाय काहीच उरणार नाही.
 
याला उत्तर आहे ‘निसर्ग बेट.’ केवळ स्थानिक प्रजातींची निवड, पुरेसा अन्नद्रव्य पुरवठा, जल संधारण आणि संरक्षण या चतु:सूत्रीवर आधारित पंचस्तरीय लागवड करून निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा, आपल्या शेतातला काही भाग तरी जलसंधारण व वनीकरणाचे एकत्रित स्वरूप जे निसर्गपूरक असेल (केवळ उत्पन्नकेंद्रित नव्हे), असा हा प्रकल्प अवलंबिता येईल का?
 
: जलसंधारण : एकरी पाण्याची गरज ठरवून, ‘निसर्ग बेटा’च्या माथ्याकडील भागात पुनर्भरण तलाव/कुंड, माथा ते मध्य पुनर्भरण स्तंभ व पुनर्भरण चर आणि पायथ्याचा भाग बांधबंदिस्ती.
 
: एकजातीय वृक्षारोपणास फाटा देत, एकरी किमान पाच मुख्य वृक्षजाती व शक्य तितके पोटप्रकार.
मिश्र पद्धतीने रोपण : पहिल्यांदा संपूर्ण परिसराकरिता मुख्यवृक्षीय जागा निश्चिती (एकरी ०५), मग उत्पन्न दृष्टीनं फळझाडे/ वनझाडे ( पाच जाती प्रत्येकी ५० प्रमाणे २५० मिश्र लागवड), कुंपण/संरक्षक झाडे (एकरी २५०-३००), मधल्या मोकळ्या जागांवर झुडूपवर्गीय + भाजीपाला + वेलवर्गीय + गवतवर्गीय लागवण. साधारण एकरी ५००च्या पुढे, टप्प्याटप्प्याने १५०० पर्यंत.
 
यामध्ये


. मुख्य वृक्ष : वड-पिंपळ-बेल-उंबर-करंज-पळस-लिंब-नांद्रुक-कवठ.
 
. फळझाडे : जांभूळ, आंबा, पेरू, चिकू, रामफळ, जांभूळ, बोर, पपई, केळी.
 
. संरक्षक झाडे : चिंच, करवंद, निवडुंग, सीताफळ, बांबू, सुबाभूळ, शेवगा, केकताड.
 
. फुलजाती : जाई-जुई, झेंडू, मोगरा जास्वंदी, शेवंती, गुलाब आणि गवत जाती : कन्हेर, पवना, कुंदा, कुसळी, हरळ, शिपरुट, पाथरी, दुधावणी, कोंबडा, कुसमुड, तांदुळचा, कुंजीरचा, दिवाळी, लालडोंगा, मोळ, पानकनीस, राजहंस.
 
. औषधी वनस्पती व इतर : मुसळी, शतावरी, अश्वसगंधा, सर्पगंधा, सोनतरवड, अर्जुनवेल, गुळवेल, अमृतवेल, बेल, भुईसल, अमोनी, निरधामना, हेकुळी, धावडा, घेटुळी, सापकांदा, रानकांदा, चिबूकाटा, सराटा, रिंगणी, काटेरी रिंगणी, साबर, तरवड, रुई, तांदुळचा, तुळस, रानतुळस, पानकनीस, आपाटा, एरंडी, तेलतुकडी, महादूत, निवडुंग, मेडसिंग, पाचुंदा, दुधी, गुग्गुळ, घाणेरी, रानमटकी, बिबवा, महाडूक, सौंदड, अर्जुनसाल, सागर, पाथरी, पांगारा, सिंद, चिल्हर, सिसम, लोखंडी, पांढरी, रिठा, बहावा, निमोणी, हिवर, खिरणी, कोरफड, चिकणी, घायपती, साजरगोंडा, दवणा.

‘निसर्ग बेट’एका दमात, एका टप्प्यात व्हावे असा आग्रह नको, कुवतीनुसार डोळ्यापुढे निसर्ग बेट आराखडा ध्येय ठेवून सुरुवात तरी करावी. यात एकच लक्षात ठेवायचे ते म्हणजे यशस्वी निसर्ग बेटाची गुरूकिल्ली आहे, मिश्र प्रजातींची घन लागवड, पहिली दोन वर्षे पुरेशी अन्नद्रव्यं, सुयोग्य जलसंधारण (फक्त वरून पाणी घालणे नव्हे) आणि संरक्षण-संगोपन. ‘निसर्ग बेट’म्हणजे माती-जमीन-वृक्ष-पाणी आणि सजीव यांच्यातील समतोल साधण्यासाठीची संरचना, उपलब्ध जागेत, आपापल्या कुवतीनुसार जलसंधारण + वनीकरण = निसर्ग पुनर्स्थापन.


मला खात्री आहे, जे कुणी या कार्यक्रमात सहभागी होतील, ते निश्चितच इतरांनाही ‘निसर्ग बेट’ संकल्पना राबविण्यासाठी मार्गदर्शक ठरतील. होय, पर्यावरण दिनानिमित्ताने ‘निसर्ग बेट’ संकल्पना समजून घेण्यासाठी प्रयत्नरत अशा सर्व जिज्ञासू अभ्यासकांचे स्वागत असेल. गेली दोन वर्षे आमचा ‘निसर्ग बेट’ संकल्पना प्रचार-प्रसार सुरू आहे, पुढेही सुरू राहील. अनेकजण जोडले जात आहेत, ही संख्या वाढणार आहेच. भविष्य आशादायी वाटते ते यामुळेच. निसर्गाचे झालेले नुकसान भरून तर येणार नाही पण वेळ मात्र गेलेली नाही.


(लेखक सहज जलबोध अभियान, पुणेचे राज्य समन्वयक आहेत.)

- मयुर बागुल

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.