पाकिस्तानमधून अज्ञात फोन; हॉटेल ताज बॉम्बने उडवून देण्याची धमकी!

    दिनांक  30-Jun-2020 10:47:24
|

Hotel taj_1  H


मुंबई पोलीस सतर्क, ताज हॉटेलसह दक्षिण मुंबईच्या सुरक्षा बंदोबस्तात वाढ


मुंबई : कराची स्टॉक एक्सचेंजच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन आला असून हा फोन पाकिस्तानमधून ताज हॉटेलमध्ये करण्यात आला होता. फोनवर एक व्यक्ती बोलत होता. ती व्यक्ती म्हणाली की, 'कराची स्टॉक एक्सेंजमध्ये झालेला दहशतवादी हल्ला सर्वांनीच पाहिला. आता ताज हॉटेलमध्ये २६/११ सारखा हल्ला पुन्हा एकदा होणार.'


ताज हॉटेल व्यवस्थापनाकडून लगेचच मुंबई पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानंतर ताज हॉटेल बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रात्रभर मुंबई पोलीस आणि हॉटेल स्टाफ यांनी मिळून सुरक्षेची पाहणी केली. हॉटेलमध्ये येणारे गेस्ट आणि त्यांच्या हालचालींवरही नजर ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त दक्षिण मुंबई आणि किनारपट्टीवरील गस्त आणि सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


सदर फोन पाकिस्तानमधील कराची येथून आल्याची प्राथमिक माहिती आहे. फोनची सत्यता अद्याप पटली नाही. परंतु, कोणताही धोका न पत्करता मुंबई पोलिसांनी ताज हॉटेल आणि मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा वाढवली आहे. दरम्यान, पाकिस्तानातील कराची येथील स्टॉक मार्केट इमारतीत दहशतवाद्यांनी सोमवारी हल्ला केला. यात ११ नागरिक ठार झाल्याची माहिती आतापर्यंत पुढे आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर या फोनचे गांभीर्य वाढले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.