शूSSS....ते झोपले आहेत!

    दिनांक  30-Jun-2020 19:44:59
|


Uddhav Thackeray_1 &चीन आणि पाकिस्तानचे काय करायचे, ते मोदी करतील, ते करण्याची शिवसेनेची औकात नाही. सीमेवरील तणावावरुन शिवसेनेने ‘सामना’त फडफड करण्याऐवजी झोपेतून उठून मानखुर्दच्या आपल्या घरच्या गल्लीत शौर्य गाजवावे नि मशिदींवरील कानठळ्या बसवणारा आवाज करणारे भोंगे काढून दाखवावे.

पहाटेपासून दिवसभर पाच वेळा वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाचा त्रास होत असल्याने एक मुलगी वाघिणीच्या त्वेषाने त्या मशिदीसमोर जाऊन उभी राहिली. ‘मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कमी करा, बंद करा आणि आम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय जगू द्या,’ म्हणत ती तिथे जाऊन कडाडली. मात्र, त्याचवेळी या एकट्या मुलीला धमकावण्यासाठी मशिदीतल्या बायका आणि माणसेही घोळक्याने एकत्र आली. पण, ही मुलगी ना घाबरली ना डगमगली, उलट आपली बाजू रोखठोकपणे मांडत राहिली आणि ही घटना जशी समाजमाध्यमांतून सर्वत्र पसरली, तसा तिला हजारो-लाखोंच्या संख्येने जनतेतून पाठिंबा-समर्थन मिळू लागले. मशिदींवरील भोंग्यांचा आवाज बंद करण्यासाठी एकट्याच्या जीवावर पुढे सरसावलेली ही हिंमतबाज मुलगी म्हणजेच मुंबईच्या मानखुर्दमधील करिश्मा भोसले. करिश्माने उचललेला मुद्दा अत्यंत रास्त असून हा प्रश्न धर्माचा नव्हे, तर लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असल्याचे स्पष्ट होते. कारण, कामासाठी दिवस-रात्र धावणार्‍या मुंबईत कष्टकर्‍यांना क्षणभर विश्रांती मिळते ती फक्त झोपेवेळी आणि तेवढीशी विश्रांतीही जर मशिदींवरच्या भोंग्यांच्या आवाजाने नष्ट होत असेल, तर कोणाही व्यक्तीने त्याविरोधात आवाज उठवणे न्याय्यच म्हटले पाहिजे. पुन्हा झोपच नव्हे, तर करिश्मा आणि तिच्या भावंडांसारखे हजारो विद्यार्थी मुंबईत राहतात आणि चांगला अभ्यास करुन भविष्याची स्वप्ने रंगवत असतात. मात्र, त्या स्वप्नांचा बेरंग करण्याचे कामही मशिदींवरील भोंग्यांचा आवाज सातत्याने करत असतो. असा बेरंग आपल्याही आयुष्याचा होऊ नये म्हणून ‘नीट’च्या परीक्षेचा अभ्यास करणार्‍या करिश्माने मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवला. ती पोलिसांपर्यंतही गेली, पण त्यांनीही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्याऐवजी चालढकल करण्यालाच कर्तव्य समजले. मशिदींवरील भोंग्यांपुढे पोलीसच हतबल झाल्याचे पाहून अखेर करिश्माला स्वतःलाच मोहल्ल्यात उतरावे लागले. अन्याय करणार्‍याला न्यायव्यवस्थेतील घटकानेच अभयदान दिले की, अखेरीस त्या घटकाला बाजूला सारुन न्यायाभिलाषी जनतेलाच पुढाकार घ्यावा लागतो आणि तेच त्यांची प्रतिनिधी म्हणून करिश्माने करुन दाखवले, हे इथे दिसते.


धक्कादायक गोष्ट म्हणजे, भोंग्यांवरुन दिल्या जाणार्‍या अजानचा आवाज कमी होणार नाही, असे अरेरावीने बोलत मुस्लीम महिला व इतरांच्या जमावाने उलट तिलाच घर सोडून निघून जा, असेही सांगितले. हे कमी म्हणून की काय, अबू आझमी या समाजवादी पक्षाच्या आमदारानेही तिला इथून निघून दुसरीकडे राहायला जा, असे सांगितले. मात्र, हे सगळे ज्या मुंबईत झाले, तिथेच ‘ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार’ वगैरे करणार्‍या शिवसेनेची महापालिकेत सत्ता आहे आणि मुख्यमंत्रीही याच पक्षाचा आहे. पण, आपल्या जन्मस्थानी एवढे सगळे होऊनही शिवसेनेने या प्रकारावर शब्दही काढला नाही वा करिश्मा भोसलेला पाठिंबाही दिला नाही. हो, राज्य सरकारच्या हाताखालील पोलिसांनी करिश्मा व तिच्या आईला नोटीस पाठवण्याचा शहाणपणा मात्र चोख केला. तिथे राज्य सरकार आणि पोलीस मागे हटले नाहीत आणि न्यायाची नव्हे, तर अन्यायाची साथ द्यायला आम्ही तयार असल्याचे दाखवून दिले. मात्र, हे सगळे मुंबईत घडत असताना आणि त्याचा पत्ता शिवसेना पक्षप्रमुखांना नसताना त्यांचा ‘सामना’ सीमेवर चीनशी कोणी लढायचे, असा प्रश्न तोंड वर करुन विचारत होता. केंद्र सरकारने अमूक करावे, तमूक करावे, असे सांगतानाच काँग्रेस आणि ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ची कड घेत भाजपने त्यांची पापे चव्हाट्यावर आणू नये, म्हणून लेखच्या लेख खरडत होता. मुळात शिवसेनेसारख्या स्थापनेपासून ५४ वर्षांत मुंबई, ठाणे आणि कोकण-मराठवाड्यातल्या सहा-सात जिल्ह्यांपर्यंत मर्यादित असलेल्या पक्षाने राष्ट्रीय व सीमा मुद्द्याबाबत पंतप्रधानांना काही सांगणे हाच मोठा विनोद. कारण, शिवसेनेला साधे स्वतःचे घरही सांभाळता येत नसल्याचे कोरोना महामारी ते करिश्मा भोसले प्रकरणापर्यंत वेळोवेळी सिद्ध झाले. एकेकाळी ‘आवाज कोणाचा...’ असे म्हटले की ‘शिवसेनेचा’, अशी डरकाळी फोडणार्‍यांची मशिदींवरील भोंग्यांचा आवाज बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या करिश्माचे समर्थन करण्याचीही हिंमत झाली नाही आणि अशी शिवसेना मोदी सरकारला चीनवरुन सुनावते, म्हणजे उंटाचा मुका घेण्यासारखेच!

 
विशेष म्हणजे, करिश्मा भोसलेला मशिदीतल्या लोकांपासून ते आमदारानेही ‘इथून निघून जा,’ असे सांगितले आणि तेही राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना. खरे म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अजानसाठी भोंग्यांचा वापर करणे इस्लाममध्ये अनिवार्य नाही किंवा तो धर्माचा भाग नाही. त्यामुळे शिवसेनेला न्यायालयीन निकालानुसार मानखुर्दच नव्हे, तर सर्वत्रचे भोंगे हटवण्याची ही चांगली संधी होती. पण, सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या काँग्रेसने तसेच शरद पवारांनी सत्तेच्या खुर्चीला काठीचा आधार दिल्याने हिंदूंवरील अन्यायाकडे दुर्लक्ष करणे ‘शिवसेना’ नामक ‘लाचारसेने’चे आद्यकर्तव्य झाल्याचे दिसते. सोनिया आणि राहुल गांधींकडे पक्ष गहाण टाकल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा अन्य नेत्यांनाही आता हिंदूंपेक्षा सत्ता महत्त्वाची वाटते. त्यामुळे त्यांना हिंदूंवरील अन्याय-अत्याचार पाहायला आणि ऐकायलाही वेळ नाही. गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे शिवसेनेने हिंदूंबाबत डोळे, कान आणि तोंडही बंद केल्याचे आणि डाराडूर झोप घेत असल्याचे दिसते. तसे नसते तर उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री अनिल देशमुखांना करिश्मा भोसलेला न्याय मिळावा, म्हणून आदेश देण्याची धमक दाखवली असती. पण मुख्यमंत्र्यांनी ते केले नाही आणि वर सीमेवरील तणावावरुन केंद्र सरकारला सुनावण्याची फडफड ‘सामना’तून केली. मात्र, चीन आणि पाकिस्तानचे काय करायचे, ते मोदी करतील, ते करण्याची शिवसेनेची औकात नाही. चीन आणि पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी भारतीय सैन्य आणि भारतीय नेतृत्वही खंबीर आहे, त्याबद्दल शिवसेनेने प्रश्न उपस्थित करण्याची वा शंका घेण्याची आवश्यकता नाही, तर शिवसेनेने आधी झोपेतून उठून मानखुर्दच्या आपल्या घरच्या गल्लीत काय शौर्य दाखवता येईल, ते दाखवावे. मशिदींवरील कानठळ्या बसवणारा आवाज करणारे भोंगे काढून दाखवावे. निदान ते जगाला दिसेल आणि शिवसेना राज्यात अन्यत्र कुठे नाही, पण मुंबईत तरी अस्तित्वात असल्याचे समजेल.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.