पंढरपूरवासिनी विठाबाई....येई वो!

30 Jun 2020 21:45:56


Pandharpur_1  H

 

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरी वारकरी पंढरीला निर्गुण रूपात पोहोचला आहे. पंढरीनाथ महाराजदेखील आपल्या भक्तांसाठी घराघरात पोहोचतील, असा दृढविश्वास सर्वांना आहे. सार्वभौम, सर्वसत्ताधीश सौख्यसिंधू, दीनवत्सल, दीनदयाघन अशी बिरुदावली लावून देवनाथ महाराज अनंतकरुणाघन पंढरीरायाला पंढरपूरवासिनी माऊली विठाबाई’ म्हणून आर्तपणे हाकारीत आहेत.


पंढरपूर-भूवैकुंठ हे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र! महाराष्ट्रात पंढरपूरचा पांडुरंग हे अत्यंत प्रसिद्ध असे दैवत या भूवैकुंठ नगरीत ‘युगे अठ्ठावीस विटेवरी’ साक्षात उभे आहे. श्रीक्षेत्र पंढरपुरा ‘पंढरी’, ‘पांडुरंगपूर’, ‘पंढरीपूर’, ‘फागनीपूर’, ‘पौंडरिकक्षेत्र’, ‘पंडरंग’, ‘पांडरंग पल्ली’ अशी विविध नावे आहेत. संतजन या क्षेत्राचा ‘भूवैकुंठ’किंवा ‘दक्षिण काशी’ म्हणून उल्लेख करतात. के श्रीक्षेत्र भीमा (भिवरा) नदीच्या तीरावर वसलेले आहे. ती नदी त्या ठिकाणी अर्धचंद्राकृती वाहते, म्हणून तिला ‘चंद्रभागा’ असे नाव मिळाले आहे. पंढरपूरला महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदायाचे, भागवत धर्माचे आद्यपीठ मानले जाते. वर्षभर संत-भक्त-भाविकांची मांदियाळी इथे आपणांस पाहावयास मिळत असली तरी ‘आषाढी’ आणि ‘कार्तिकी’ या दोन यात्राकाळात समस्त भारतभरातून आलेल्या ‘वैष्णवांचा मेळा’ इथे भरतो. पंढरीचा उल्लेख संतसाहित्यात आला आहे. ‘चंद्रभागेच्या काठावर वसलेली पंढरी!’ भक्तीचे पीठ, अध्यात्माची राजधानी! सार्‍या मानवजातीला समतेचा-समरसतेचा संदेश देणारी ही नगरी अलौकिक, अद्वितीय अशा पांडुरंगाच्या भक्ती साम्राज्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या दिमाखात उभी आहे. विठोबा कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत आहे. वर्षभरात एक कोटींपेक्षा जास्त लोक पंढरपूरला भेट देतात. चैत्री, आषाढी, कार्तिकी व माघी अशा चार यात्रा पंढरपुरात भरतात. आषाढी यात्रेस सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरास दाखल होतात व आषाढी पौर्णिमेचा गोपालकाला झाल्यावर त्या परत आपापल्या गावी मार्गस्थ होतात.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे वास्तुशिल्पाचा अद्भुत नमुना आहे. पंढरपूर शहराच्या मध्यभागी टेकडीवर बांधलेल्या या मंदिराची लांबी ३५० फूट व रुंदी १७० फूट इतकी आहे. मंदिराला आठ दरवाजे आहेत. पूर्वद्वाराला ‘महाद्वार’ अथवा ‘नामदेव दरवाजा’ असे म्हणतात. दरवाज्यात पहिल्या पायरीला संत नामदेवांनी समाधी घेतली. जवळच, संत श्री चोखोबांची समाधी आहे. विठ्ठल मंदिरातील गर्भागाराची दर्शनी भिंत चांदीच्या पत्र्याने मढवलेली आहे. कमानीच्या पुढे गर्भागाराचा दरवाजा आहे. विठ्ठलमूर्ती त्या दरवाज्यातून आत, भिंतीला लागून, रुपेरी प्रभावळीच्या आत, विटेवर उभी आहे. विठ्ठल मंदिराच्या पिछाडीला पूर्वाभिमुख रुक्मिणीची मूर्ती आहे. गाभारा, मध्यगृह, मुख्य मंडप व सभामंडप असे मंदिराचे चार भाग आहेत.
विठोबाचे पंढरपुरातील प्रागट्य याविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. सर्वश्रुत कथा ‘पुंडलिक’ या मातृभक्ताशी संबंधित आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव विष्णू हा पंढरपुरात आला. ‘आईवडिलांची सेवा करत आहे, ती पूर्ण होईपर्यंत त्या विटेवर थांब,’ असे देवाला सांगून पुंडलिकाने त्याच्या दिशेने वीट भिरकावली. देव त्याच विटेवर कटिकर ठेऊन उभा राहिला अशी आहे पुराणकथा. म्हणूनच श्रीमत जगद्गुरू शंकराचार्य श्रीपांडुरंगाष्टकम् स्तोत्रात पांडुरंगाची स्तुती करताना त्यास ‘परब्रह्मलिंग’ म्हणत आहेत.


महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीद्रैः।
समागत्य तिष्टंतमानंदकदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम 

भीमानदीच्या तीरावर महायोगाचे अधिष्ठान असलेल्या पंढरपूर क्षेत्रांत भक्त पुंडलिकाला वर देण्याकरिता श्रेष्ठ मुनींसह येऊन तिष्ठत असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
ज्याची वस्त्रे विद्दुलतेप्रमाणे पिवळ्या रंगाची आहेत, ज्याची अंगकांती नीळ्यामेघाप्रमाणे शोभत आहे, जो लक्ष्मीचे निवासस्थान आहे, जो चित्प्रकाश आहे, जो सर्वश्रेष्ठ व भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर उभा आहे, अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
त्याला अनन्यभावाने शरण येणार्‍या भक्तांना भवसागर हा फक्त कमरेइतकाच खोल आहे. तो सहज पार करता येतो. हे सांगण्याकरिता त्याने कमरेवर हात ठेवले आहेत. ब्रह्मदेवाचा सत्यलोक हा कमरेपासून नाभिस्थान जितके उंच आहे, त्यापेक्षा अधिक दूर नाही, हे दाखवण्यासाठी त्याने आपली बोटे नाभिस्थानाकडे वळवली आहेत, अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
आपल्या गळ्यात कौस्तुभमणी घातल्याने जो अतिशय शोभून दिसत आहे, ज्याच्या बाहूंवर केयुर म्हणजे बाजुबंद शोभत आहेत, ज्याच्याजवळ ‘श्री’ म्हणजे लक्ष्मीचा निवास आहे. जो लोकांचा पालनकर्ता आहे, अशा त्या परम शांत मंगलमय सर्वश्रेष्ठ व स्तुती करण्यास योग्य असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो. शरदऋतूंतील चंद्रबिम्बाप्रमाणे अत्यंत रमणीय मुख असलेल्या, मुखावर सुंदर हास्य विलसत असलेल्या, कानांत कुंडले घातल्याने त्यांची शोभा गालावर झळकत असलेल्या, ओठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त वर्ण असलेल्या व कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो. ज्याच्या मस्तकावर असलेल्या मुकुटाच्या प्रभेने मुखाभोवतालच्या सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत, दिव्य आणि अमूल्य रत्ने अर्पण करुन देव ज्याची पूजा करतात, बाळकृष्णरुपाने जो तीन ठिकाणी वाकून उभा आहे, ज्याच्या गळ्यांत वनमाला व मस्तकावर मोरपिसांचा तुरा शोभत आहे, त्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो. सर्व विश्व व्यापून राहणार्‍यात, वेणु वाजवीत वृन्दावनात फिरणार्‍या, ज्याचा कोणाला अंत लागत नाही, लीलेने गोपवेष धारण केलेल्या, गायींच्या कळपाला आनंद देणार्‍या मधुर हास्य करणार्‍या अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो. ज्याला जन्म नाही, जो रुक्मिणीचा प्राणाधार आहे, भक्तांसाठी परम विश्रामधाम व शुद्ध कैवल्य असलेल्या, जागृती, स्वप्न व सुषुप्ति किंवा बाल्य, तारुण्य व वार्धक्य या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे असलेल्या, नेहमी प्रसन्न, शरणागतांचे दुःख हरण करणारा व देवांचाही देव असलेल्या अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो. अत्यंत पुण्यदायक असलेले, पांडुरंगाचे हे स्तोत्र जे कोणी एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक नित्य पठण करतील, ते सर्वजण अन्तकाळी भवसागर सहजपणे तरुन जातील आणि त्यांना परब्रह्मस्वरुप श्रीहरीच्या-पांडुरंगाच्या शाश्वत स्वरुपाची प्राप्ती होईल.


श्रीकृष्णा कमलावरा सुखकरा कारुण्यपूर्णेक्षणा
दीनानाथ दयानिधे भयहरा सद्भक्तसंरक्षणा
गोपाळा गरुडध्वजा गुरुतरा तूं व्याप्त विश्वांतरी
भीमातीरदिगंबरा तुज नमो श्रीपांडुरंगा हरी


संकलदीनांचा दयाळू कनवाळू सद्भक्तांचे रक्षण करणारा आणि जो विश्वव्यापक आहे, अशा भीमातीरी वसणार्‍या पांडुरंगाला नमन असो, असे भावपूर्ण वर्णन पांडुरंगस्तोत्रात देवनाथ महाराज यांनी केले आहे.

आषाढ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हणतात. धर्मग्रंथानुसार या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने पाताळात शयन करतात. या चार महिन्यांना ‘चतुर्मास’असेही म्हणतात. ‘चतुर्मास’ देवाच्या भक्तीचा काळ मानण्यात आला आहे. धर्मशास्त्रानुसार वामन रुपातील भगवंताने बळीराजाला यज्ञप्रसंगी तीन पावलं भूमी मागितली. भगवंताने पहिल्या पावलात पृथ्वी, आकाश आणि सर्व दिशा व्यापून टाकल्या, दुसर्‍या पावलात स्वर्गलोक व्यापले. तिसरे पाऊल आपल्या डोक्यावर ठेवावे, अशी बळीराजाने विनंती केली. या दानाने प्रसन्न होऊन भगवंताने बळीला पाताळाचा राजा बनविले आणि वर मागण्यास सांगितले. बळीराजाने विनंती केली की, भगवंताने सदैव त्याच्या महालात राहावे. बळीराजाच्या भक्तीचा मान राखत भगवंताने वर्षातून चार महिने तिथे निवास करण्याचे मान्य केले. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णु देवशयनी (आषाढी) एकादशीपासून देव प्रबोधिनी (कार्तिकी) एकादशीपर्यत पाताळलोकात बळीच्या महालात निवास करतात. याच काळाला ‘चतुर्मास’ म्हणतात. वर्षभरातील एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वत:च वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी. महाराष्ट्राच्या विविध भागांमधून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला पंढरपुरामध्ये आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची पालखी येते. पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारले. ही जी शक्तीदेवी तीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात. मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. ‘दक्षिणायन’ ही देवांची रात्र असून ‘उत्तरायण’ हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला ‘देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी, असे म्हणतात. अंजनगाव सुर्जीचे परब्रह्म महारुद्र जगद्गुरु श्रीदेवनाथ महाराज यांनी पंढरीनाथ पांडुरंग विठ्ठलावर अनेक पदे, धावा, कटाव, पोवाडे अशा रचना केल्या आहेत. पंढरीनाथ महाराजांची लीला वर्णन करताना देवनाथ महाराज म्हणतात,


पंढरपूरवासिनी विठाबाई....येई वो!
सावळीये आनंदे कीर्तनी विठाबाई येई वो...
माणकोजी बोधला भक्तभला शरणागत तुज आला
छळीता अविंधे रक्षिला वाढविले कीर्तीला
सुखपदी दिधला निजठाये पंढरपूरवासिनी...


माणकोजी बोधला हा धामणगावचा पाटील होता. हे धामणगाव पंढरपूर पासून दहा कोस अंतरावर आहे. माणकोजी मोठा भगवद्भक्त होता. माणकोजीला ममताई नावाची पत्नी आणि तीन मुले होती. तीन मुलांची नावे लखमोजी, यमाजी आणि विठोबा. याने आपले सर्व शेत लुटविले होते. पांडुरंगाने साईचे सोंग घेऊन माणकोजी बोधले यांची सून मागितली असता, त्याने मोठ्या आनंदाने यमाजीची बायको भागीरथी ही त्या साईच्या (सोंग घेऊन आलेला पांडुरंग) स्वाधीन केली. साई तिला गावाच्या वेशीपर्यंत घेऊन गेला आणि खरे रूप दाखवून विठ्ठलनाथ गुप्त झाले. मुस्लीम राजाने बोधले बुवांची कीर्ती ऐकून त्याला कपटाने फसविणाच्या हेतूने आपल्याकडे बोलावुन घेतले. मांसान्न शिजवून बोधले बुवांचा छळ करण्याच्या हेतूने ते खाण्याचा आग्रह करू लागला, तेव्हा माणकोजीने पंढरीनाथांचा धावा केला जो प्रस्तुत पदात देवनाथ महाराज वर्णन करीत आहेत. पुढे पंढरीनाथांच्या कृपेने त्या मांसान्नाची फुले झाली आणि अविंध राजा, माणकोजीच्या पायी जडला. याच पदात जगद्गुरु देवनाथ महाराज म्हणतात,


तुकारामाचे कीर्तनी उल्हाससी निजमनी
अद्भुत प्रभुराया तव करणी रक्षियले निदानी
पतितपावन हे ब्रीदमाये पंढरपूरवासिनी....

एकदा जगद्गुरू तुकाराम महाराजांचे कीर्तन चालले असताना तेथे शिवाजी महाराज कीर्तन ऐकण्याकरिता बसले होते. तोच मुघल सैन्याने महाराजांना पकडण्याकरिता कीर्तनाला वेढा घातला. तेव्हा पंढरीनाथ कृपेने अद्भुत नवल घडले आणि स्वराज्याच्या पोशिंद्याच्या रक्षणासाठी साक्षात पांडुरंग धावून आला. पंढरीनाथांनी शिवाजी महाराजांचे रूप घेऊन घोड्यावर बसून घोडा कीर्तनाच्या बाहेर काढला. हे पाहताच सर्व मुघल शिपाई त्या घोड्याच्या पाठीमागे पळत सुटले आणि याप्रमाणे स्वराज्यावरील संकट टळले.


हेची व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास।
पंढरीचा वारकरी। वारी चुको नेदी हरी॥

वारी... वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला ‘वारकरी धर्म’ असे म्हणतात. वारकरी धर्मालाच ‘भागवत धर्म’ म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते. पायी केल्या जाणार्‍या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रातील अनेक घरांत पिढ्यान्पिढ्या वारीची कुलपरंपरा आहे. सगुण सावळ्या परब्रह्म पांडुरंगाचे एका स्तोत्रात वर्णन करताना देवनाथ महाराजांनी ‘अभिमन्यूमामा’ असे रूपक वापरले आहे. नाथ महाराज म्हणतात,


भीमातटी कर कटी विलसे पहा की
ज्याची सदा सदय की श्रुती कीर्ती हांकी
ज्या नारदादि स्तविती स्मरताति नामा
तो नांदतो विटेवरी अभिमन्युमामा...


यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरी वारकरी पंढरीला निर्गुण रूपात पोहोचला आहे. पंढरीनाथ महाराजदेखील आपल्या भक्तांसाठी घराघरात पोहोचतील, असा दृढविश्वास सर्वांना आहे. सार्वभौम, सर्वसत्ताधीश सौख्यसिंधू, दीनवत्सल, दीनदयाघन अशी बिरुदावली लावून देवनाथ महाराज अनंतकरुणाघन पंढरीरायाला ‘पंढरपूरवासिनी माऊली विठाबाई’ म्हणून आर्तपणे हाकारीत आहेत. देवशयनी आषाढी एकादशीच्या पावनप्रसंगी आपणही पंढरीनाथ महाराजांना हृदयभावातून आळवुया.


करुणा ऐकुनिया ये आता रखमाबाईचे कांता
तारी देवनाथा अनाथा शरणागत तुज आता
हृदयी आठवितो तव पाये
पंढरपूरवासिनी विठाबाई....येई वो !
 

- डॉ. भालचंद्र हरदास

Powered By Sangraha 9.0