'निसर्ग'चा कोप

    दिनांक  03-Jun-2020 14:50:05
|
Mumbai _1  H x


मुंबई : पूर्व मध्य अरबी समुद्रातले 'निसर्ग' हे तीव्र चक्रीवादळ गेल्या सहा तासात उत्तर पूर्वेकडे ताशी १३ किलोमीटर वेगाने सरकले आहे. दुपारपर्यंत रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग जवळून ताशी १००-११० किमी वेगाच्या वाऱ्यासह वादळ दाखल झाले. मुंबई आणि गोवा इथल्या डॉप्लर वेदर रडारवर याचा सातत्याने वेध घेतला जात आहे.

कच्ची घरे आणि झोपड्याचे मोठे नुकसान होण्याची भीती असून काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले आहेत. वीज आणि दूरध्वनी तसेच संपर्क साधनांच्या तारांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रस्त्यांचे नुकसान आणि मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूकीवरही परिणाम होणार आहे. 


मोठ-मोठी झाडे, उन्मळून पडण्याची, फांद्या कोसळण्याच्या घटना दक्षिण मुंबईतील काही भागांमध्ये घडल्या आहेत. केळी, पपईच्या बागांचे नुकसान झाले आहे. किनारी भागात घेतल्या जाणारी पिके आणि मिठागरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे तीव्र चक्रीवादळ धडकल्यानंतर सहा तास त्याची तीव्रता कायम राहणार आहे. 

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुणे, अहमदनगर जिल्ह्यात ताशी ६०-७० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हा वेग ८० किमीपर्यंत जाऊ शकतो. बीड, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात ताशी ५५-६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या पुणे, अहमदनगर, नाशिक औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात नुकसान होण्याची शक्यता आणि त्यासंदर्भात घ्यायची काळजी मार्गदर्शकतत्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.