पालघरमध्ये साधू संतांची हत्या झाली तेव्हा का गप्प बसलात? : कंगना राणावत

03 Jun 2020 18:33:10
Palghar_1  H x

अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येवर कळवळणाऱ्या बॉलीवूडकरांना संतप्त कंगनाचा सवाल 


मुंबई : काही दिवसांपुर्वी अमेरिकेत एका कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलीस कर्मचाऱ्याद्वारे करण्यात आलेल्या हत्येनंतर देशभरात हिंसाचार भडकला होता. यानंतर जगभरात #BlackLivesMatter मोहीम सुरू करण्यात आली. हॉलिवूड पाठोपाठ बॉलिवूड स्टार्स प्रियंका चोप्रा, करीना कपूर खान, दिशा पाटनी, करण जोहर या कलाकारांनी देखील या मोहिमेला पाठिंबा देत, सोशल मीडियावर कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येवर दुःख व्यक्त केले. यावरून चिडलेल्या अभिनेत्री कंगना राणावतने कलाकारांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावले आहे.


एका मुलाखतीदरम्यान कंगना म्हणाली की, काही आठवड्यांपुर्वी साधुंची हत्या करण्यात आली होती. मात्र त्यावर अद्याप कोणीही बोलले नाही. हे महाराष्ट्रात घडले, जेथे सर्वाधिक कलाकार राहतात. बॉलिवूड हे असेही हॉलिवूडकडून घेतलेले नाव आहे. हे कलाकार चर्चेत असलेल्या गोष्टीवर बोलतात. याद्वारे त्यांना दोन मिनिटांसाठी प्रसिद्धी मिळते. मात्र गोरे लोक हे कँपेन चालवत असतात. कदाचित त्यांच्यात स्वातंत्र्याच्या पुर्वीची गुलामी अजून आहे.


कंगना म्हणाली की, पर्यावरणाच्या मुद्यावर देखील हे कलाकार एका श्वेतवर्णीय मुलीला पाठिंबा देतात. मात्र अनेक महिला आणि मुले आहेत जे भारतात पर्यावरणासाठी कोणाचीही मदत न घेता अविश्वसनीय काम करत आहेत. काही जणांना तर पद्मश्री देखील मिळाला आहे. मात्र कलाकारांकडून त्यांना कधी पाठिंबा मिळत नाही. कदाचित साधू आणि आदिवासी लोक बॉलिवूड आणि त्यांच्या चाहत्यांसाठी आकर्षक नसतील.


अमेरिकेत हत्या झालेल्या व्यक्तीसाठी बॉलीवूडकरांना कळवळा आहे. मात्र जेव्हा महाराष्ट्रात, पालघरमध्ये निष्पाप साधू-संतांची हत्या झाली तेव्हा हे सगळे कुठे होते? तेव्हा हे का गप्प बसले असा सवाल संतप्त झालेल्या कंगनाने विचारला आहे.
Powered By Sangraha 9.0