कोरोनाची लस विकसीत करण्यासाठी पुण्यात ३० माकडांवर प्रयोग; वनमंत्र्यांची परवानगी

    दिनांक  03-Jun-2020 07:37:08
|
monkey _1  H x

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा माकडांवर प्रयोग होणार

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा ३० माकडांवर प्रयोग करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. या प्रयोगाकरिता वन विभागाने संस्थेला ३० माकडे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी दिले. यानुसार आता पुण्यातील वडगाव परिक्षेत्रामधून ही माकडे पकडून संस्थेकडे सुपूर्द केली जाणार आहेत.
 
 
 
 
कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी 'SARS COV- 2' ही लस तत्काळ विकसीत करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला ३० माकडांची आवश्यकता आहे. ही ३० माकडे राज्याच्या हद्दीतील घेण्यात येणार आहेत. या माकडांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा सर्वप्रथम प्रयोग करण्यात येईल. यासाठी ३० माकडे तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. राज्यात सध्या कोरोना विषाणुमुळे होत असलेला प्रादुर्भाव व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी राज्य सरकारला पत्र लिहले होते. ३० मे, २०२० रोजी हे पत्र शासनाची मान्यता देण्यासाठी पाठविण्यात आले होते.
 
 
 
 
या संस्थेला कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या प्रयोगासाठी ३ ते ४ वयोगटातील मादी प्रजातीची ३० माकडे आवश्यक होती. त्यानुसार पुण्यातील वडगाव परिक्षेत्रातून या माकडांना पकडून त्यांना या प्रयोगासाठी वापरण्यासंदर्भातील परवानगी देण्याची शिफारस आम्ही राज्य सरकारकडे केल्याची माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी दिली. अनुभवी मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणे, त्यांना सुरक्षितपणे बाळगणे, पकडलेल्या माकडांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना इजा तसेच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम विस्कळीत न होऊ देणे, प्रकल्पाचा व्यापारी तत्वावर उपयोग न करणे अशा अटी शर्तींच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.