कृतिशीलतेची जोडही हवी

03 Jun 2020 20:58:04

made in china boycott_1&n
चिनी उत्पादनांवर बहिष्काराची मोहीम बरोबरच आहे, पण त्यानंतर पुढे काय, हाही एक प्रश्न उभा राहतो. कारण, चीनने आज व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यात असा प्रवेश केला आहे की, त्याला बाहेर ठेवण्यासाठी दृढनिश्चय तर हवाच, पण त्यापुढचा विचार करण्याची तयारीही हवी.


कोरोनाचा उद्गाता असलेल्या चीनवर विषाणूसंसर्गाची माहिती दडवून ठेवल्यामुळे अमेरिकेसह अनेक देश निर्बंध लावण्याच्या तयारीत आहेत. भारतालाही कोरोना विषाणूने धडक दिली आणि देशभरातील रुग्णसंख्या तब्बल दोन लाखांवर पोहोचली. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशव्यापी ‘लॉकडाऊन’ ही जाहीर केला आणि सर्वच व्यवहार ठप्प पडल्याने त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेलाही बसला. त्यातूनच चीनविरोधी भावनाही प्रबळ होऊ लागली आणि तसे सूर विविध समाजमाध्यमांतून उमटू लागले. आरोग्य आणि आर्थिक क्षेत्रावर हल्ला करणार्‍या चीनला धडा शिकवण्याची इच्छा प्रत्येकजण व्यक्त करु लागला. अशावेळी चीनने नरमाईचे धोरण स्वीकारत आपली चूक कबूल करायला हवी होती, जेणेकरुन त्याच्याविरोधातील रोष कमी होईल. पण, आपल्या कथित ताकदीच्या जोरावर चिनी ड्रॅगनची शेपटी आणखी वळवळू लागली आणि त्याने एका बाजूला अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाशी पंगा घ्यायची तयारी चालवली. तसेच तैवान आणि हाँगकाँगसंबंधी निर्णय घेत तिथेही बळाचा वापर करणार असल्याचे चीनने जाहीर केले.


जागतिक पातळीवर या घडामोडी घडत असतानाच चीनने भारताला डिवचण्यासाठी नेपाळचा वापर केला आणि स्वतःदेखील लडाखमध्ये लष्करी हालचाली सुरु केल्या. चिनी सैनिकांशी भारतीय सैनिकांची दरम्यानच्या काळात झटापट झाली आणि चिनी अध्यक्षांनी आपल्या लष्कराला युद्धासाठी सज्ज राहा, असे आदेशही दिले. हे वृत्त येत नाही तोच नंतर चीनने भारताबरोबरील सीमावाद चर्चेच्या माध्यमातून सोडवू, असेही वक्तव्य केले. मात्र, इथे चीनचा दुटप्पीपणाही उघडा पडला. चर्चेचा राग आळवतानाच सीमेवर चिनी लष्कराची मोठी जमवाजमव सुरु असल्याची आणि चिनी हेलिकॉप्टर घिरट्या घालत असल्याची माहितीही समोर आली. भारतानेही या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही एक इंचही मागे सरकणार नाही असे सांगितले आणि अमेरिकेनेही चीनला तंबी देताना आम्ही भारताबरोबर असल्याची ग्वाही दिली. पण, या सगळ्या घटनाक्रमाचा भारतीयांवर निराळा परिणाम झाला आणि जनमत चीनविरोधात आक्रमक झाले.


चीन विश्वास ठेवण्यालायक देश नाही, १९६२ साली चीनने केलेले आक्रमण, नंतर पाकिस्तानला केलेले सहकार्य, २०१९ मध्ये पसरवलेली कोरोना महामारी आणि आता हा देश आपल्या सीमेवर हल्ल्याची तयारी करत असल्याचे पाहून सर्वसामान्य भारतीयांनाही चीनशी लढण्यासाठी स्फुरण चढू लागले. पण प्रत्येकजण सीमेवर जाऊन युद्ध लढू शकत नसतो आणि याचेच भान ठेवून सीमेवर नाही तर आर्थिक आघाडीवर तर आपण नक्कीच लढू शकतो, असा विश्वास भारतीयांनी व्यक्त केला. त्यातूनच चिनी वस्तूंवर, मालावर बहिष्काराच्या मोहिमेने समाजमाध्यमांतून जोर धरला आणि गेल्या आठवड्याभरात, ‘बॉयकॉटचायना प्रॉडक्ट्स’ हा हॅशटॅग ट्विटर, फेसबुकवर अव्वल क्रमांकावर राहिला. लडाखमधील रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते शिक्षक सोनम वांगचूक यांनी या मोहिमेचा धडाडीने पुरस्कार केला आणि त्यांना बॉलिवडू सेलिब्रिटींपासून प्रत्येक स्वदेशभिमान्याचे समर्थन मिळाले.
चिनी वस्तू-उत्पादनांवर बहिष्काराची मोहीम रास्तच म्हटली पाहिजे. कारण, जो देश आपल्या सार्वभौमत्वाला नख लावण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या तिजोरीत आपण पैसा का ओतावा? तोच पैसा जर भारतीय वस्तू-उत्पादनांवर खर्च केला तर देशाची अर्थव्यवस्था वाढेल आणि त्यातून देशांतर्गत रोजगारातही वाढ होईल, हाही एक मुद्दा यातून पुढे आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करताना ‘व्होकल फॉर लोकल’चे आवाहन करत ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा केली होती. मोदींनी अप्रत्यक्षरित्या चिनी मालाच्या खरेदीपेक्षा भारतीय वस्तूच विकत घ्या, असा संकेत आपल्या संबोधनातून दिला होता. पंतप्रधानांच्या या संकेताची मोहीम होण्याची वेळ चीननेच आणली आणि आता ती सर्वच क्षेत्रात पसरत चालल्याचे दिसते. त्यातला एक भाग म्हणजे ‘टिकटॉक’सह ‘युसी ब्राऊझर’, ‘शेअरइट’ आदी मोबाईल अ‍ॅप अनइन्स्टॉल करण्याची चळवळ. त्यापुढे जाऊन चिनी मोबाईल फोन्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खेळण्या, पतंग, आकाशकंदिल, अशा सर्वचप्रकारच्या उत्पादनांवर बहिष्काराची भाषा भारतीय व्यक्ती करत आहे.
चिनी उत्पादनांवर बहिष्काराची मोहीम बरोबरच आहे, पण त्यानंतर पुढे काय, हाही एक प्रश्न उभा राहतो. कारण, चीनने आज व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यात असा प्रवेश केला आहे की, त्याला बाहेर ठेवण्यासाठी दृढनिश्चय तर हवाच, पण त्यापुढचा विचार करण्याची तयारीही हवी. जे शक्य असेल त्या चिनी वस्तू-उत्पादनांना भारतीय पर्यायही उभे राहिले पाहिजे. सध्या कोणत्याही क्षेत्राशी संबंधी चिनी मालात भरपूर पर्याय, विकल्प ग्राहकासाठी उपलब्ध असतात, तेही किफायतशीर किंमतीत. त्यामुळे बर्‍याचदा चिनी मालावरील बहिष्काराची मोहीम समाजमाध्यमांत चालते, मात्र ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात नाहीत. वर्षानुवर्षांपासून स्थानिक उद्योगधंद्यांना प्रोत्साहन न दिल्याचाही तो परिणाम असू शकतो, म्हणूनच चीनच्या तुलनेत भारतीय उत्पादनांत वैविध्य आढळत नाही. त्यामुळे चीनशी बहिष्काराच्या आणि त्याचवेळी स्वदेशी उत्पादनवृद्धीच्याही योजना आखल्या पाहिजेत. अधिक उत्पादन केल्याने त्यांच्या किंमतीही कमी होऊ शकतील आणि त्या वस्तू सर्वांच्या आवाक्यातही येतील.
भारतात सॉप्टवेअर क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रित केलेले आहे, पण विविध इलेक्ट्रिक वस्तूंसाठी गरजेच्या चिपचे उत्पादन करण्याबाबतही आपण स्वावलंबी व्हायला हवे. त्यासाठी अर्थातच प्रचंड गुंतवणुकीची गरज असेल, ती मिळवण्यासाठी चीनव्यतिरिक्त देशांशी ‘मेक इन इंडिया’अंतर्गत करारही करता येऊ शकतील. हे एक क्षेत्र झाले, अशी इतरही अनेक क्षेत्रे असतील, जसे की, औषधनिर्मिती, सौर-पवनऊर्जा आणि दुर्मिळ खनिजांवर आधारित उद्योगक्षेत्र. चीन दुर्मीळ खनिजांचा सर्वात मोठा उत्पादक आहे, पण तशी खनिजे भारताच्या कोणत्या भागात आहेत, याचाही शोध घेतला पाहिजे. जेणेकरुन भारतातूनच त्याचा पुरवठा होऊ शकेल. अशाप्रकारे केवळ बहिष्काराच्या माध्यमातून नव्हे, तर आपण स्वतःदेखील उत्पादन-निर्मितीक्षेत्रात उतरलो तर नक्कीच चीनवर मात करता येईल. जेणेकरुन ही मोहीम भावनेवर आधारित न राहता तिला कृतिशीलतेची जोडही मिळेल.
Powered By Sangraha 9.0