आधी कोरोना टेस्ट, मगच उपचार ? हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू

03 Jun 2020 17:50:55
Kulkarni _1  H







धुंडिराज कुलकर्णी यांचे निधन



अंबरनाथ : ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष धुंडिराज कुलकर्णी (९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई , नातवंडे असा परिवार आहे. धुंडिराज कुलकर्णी यांना धुं. पु. डि. पी. कुलकर्णी अथवा नाना या नावाने ओळखत होते. धुंडिराज कुलकर्णी, त्यांचे प्रभाकर आणि रामचंद्र हे दोघे भाऊ असे तिघेही हवाई दलातून सेवानिवृत्त झाले होते. तिन्ही भाऊ सैन्यात सेवा बजावून निवृत्त झाले होते, हवाई दलातून निवृत्त झाल्यावर धुंडिराज यांनी टपाल खात्यात बावीस वर्षे सेवा केली. त्यानंतर भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर येथे नोकरी केली. टाटा ऍटोमिक पॉवर स्टेशन मधून ते निवृत्त झाले. हवाई दलात असताना दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता.



धुंडिराज हे अंबरनाथ मधील ज्येष्ठ नागरिक संघ, ब्राह्मण सभा, सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन, नागरिक सेवा मंडळ, सूर्योदय को ऑप क्रेडिट सोसायटी आदी अनेक सामाजिक संस्थांशी निगडीत होते. मागील पाच वर्षे त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. युवकांमध्ये रक्तदानाचे महत्व कळावे, रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने ते आपला वाढदिवस रक्तदान शिबिर भरवून साजरा करीत असत. 



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाही म्हणून त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यांना रात्री अचानक त्रास होऊ लागला तसे त्यांना अंबरनाथ येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना दाखल करून न घेता मुंबई येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्याप्रमाणे त्यांना बी ए आर सी च्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांची प्रथम कोविडची चाचणी करण्यात आली. आणि त्याचा अहवाल आल्यानंतर अन्य उपचार करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनानाने घेतला.




कोविडचा अहवाल येईपर्यंत धुंडिराज कुलकर्णी यांचे निधन झाले होते. त्यांना स्वतंत्र विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले असते तर कदाचित त्यांना जीवदान मिळाले असते. मात्र तसे झाले नाही असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यांचे वय झाले होते हे मान्य आहे. मात्र रुग्णालयात नेल्यावर प्रथम कोविडची चाचणी घेण्यात येते मगच अन्य उपचार करण्यात येतात हे चुकीचे आहे. या बाबत पंतप्रधान कार्यालय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन आणि पंतप्रधानांकडे ट्विटरच्या माध्यमातून म्हणणे मांडले असल्याचे त्यांचे चिरंजीव श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले.



Powered By Sangraha 9.0